राज्यशासनाने सांगितल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा चालू होईल ! – रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

नवी देहली – लोकल प्रवासाविषयी राज्यशासनाने दायित्व स्वीकारले आहे. जेव्हा कधी राज्यशासनाला वाटेल की, कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे, रेल्वे सेवा चालू करायला हवी, तेव्हा राज्याने केंद्राला प्रस्ताव पाठवावा. त्यावर अभ्यास करून लोकल सेवा चालू करू, असे रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रीपदाचे दायित्व देण्यात आले आहे.

दानवे म्हणाले की, आजच मी खात्याचा कारभार स्वीकारला आहे. पुढची दिशा काय असेल, ते अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर सांगू शकीन. रेल्वे हे सर्वसामान्यांच्या गरजेचे वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सुविधा देण्यावर प्राधान्य असेल. मराठवाड्यासह महाराष्ट्राची आवश्यकता पहाता काय करता येईल, यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.