(म्हणे) ‘खोट्या आरोपाखाली मानवाधिकार कार्यकर्त्यांना कारागृहात टाकणे स्वीकारार्ह नाही !’

पंतप्रधान मोदी यांच्या हत्येच्या कटातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांच्या कारागृहातील निधनावरून संयुक्त राष्ट्रे आणि युरोपीय संघ यांचा थयथयाट !

  • स्टॅन स्वामी हे ख्रिस्ती असल्यामुळे संयुक्त राष्ट्रे आणि पाश्‍चात्य देशांतील संघटना त्यांच्या नावाने अश्रू ढाळत आहेत, हेच यातून स्पष्ट होते ! आतापर्यंत भारतातील पोलीस कोठडीत निरपराध हिंदूंवर अत्याचार होऊन त्यांचा मृत्यू झाला किंवा ते विकलांग झाले, त्याविषयी या संघटनांनी कधी तोंड का उघडले नाही ?
  • एका देशाच्या पंतप्रधानांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी असणार्‍याला त्या देशाचे  न्यायालयही जामीन नाकारते, यावरून घटनेचे गांभीर्य लक्षात येते. असे असतांना त्या आरोपांना खोटे ठरवण्याचा या संघटनांचा प्रयत्न म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेवर अविश्‍वास दाखवण्याचा संतापजनक प्रकार आहे ! अशांना त्यांची जागा दाखवण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
  • देशातील शहरी नक्षलवाद्यांचे जगात किती मोठ्या प्रमाणात समर्थक कार्यरत आहेत, हे लक्षात घ्या !

संयुक्त राष्ट्रे / लंडन – शहरी नक्षलवादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले ८४ वर्षीय फादर स्टेन स्वामी यांचे कारागृहात निधन झाले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार परिषद आणि युरोपीयन संघ यांनी दु:ख व्यक्त करत थयथयाट केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाच्या मेरी लॉलर यांनी म्हटले, ‘मानवाधिकार कार्यकर्ते असणारे फादर स्टॅन स्वामी यांना आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर ९ मासांनी त्यांचे निधन झाले. मानवाधिकार कार्यकर्त्यांना कारागृहात टाकणे स्वीकारार्ह नाही.’ याआधी त्यांनी स्वामी यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करत त्यांच्यावर विशेष उपचार करण्याचीही मागणी केली होती.

१. युरोपीयन संघाचे मानवाधिकार प्रतिनिधी इमॉन गिलमोर यांनी म्हटले, ‘फादर स्टॅन स्वामी हे आदिवासींच्या हक्कांसाठी झटणारे कार्यकर्ते होते. त्यांना ९ मास अटक करून कारागृहात ठेवण्यात आले होते. युरोपीय संघाकडून सातत्याने या प्रकरणी पाठपुरावा करण्यात येत होता.’

२. कोरेगाव भीमा-एल्गार परिषदेप्रकरणी अवैध कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत (यू.ए.पी.ए.अंतर्गत) अटक झालेले फादर स्टॅन स्वामी यांचे अटकेत असतांना ५ जुलै या दिवशी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते. त्यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप होता.

कायद्यानुसार स्टॅन स्वामी यांच्यावर कारवाई ! – भारत सरकारचे प्रत्युत्तर

स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या टीकेला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर देतांना ‘देशातील सर्व नागरिकांचे मानवी हक्कांचे संरक्षण करण्यास देश कटीबद्ध असून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील मानवी हक्क आयोग आणि स्वतंत्र न्यायिक यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन.आय.ए.ने) कायद्यानुसार स्टॅन स्वामी यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांच्या जामिनासाठीच्या याचिका रहित केल्या होत्या. संबंधित अधिकारी कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात पाऊल उचलतात आणि त्यांना रोखता येऊ शकत नाही. आम्ही कायद्याच्या विरोधात काहीच करत नाही. फादर स्टॅन स्वामी यांच्या उपचारांवर न्यायालयाचे लक्ष होते आणि त्यांची प्रकृती बिघडल्यानेच त्यांचा मृत्यू झाला’, असे म्हटले आहे.