
मुरगाव, ६ एप्रिल (पत्रक) – वास्को-द-गामा मतदारसंघाचे अधिकृत नामकरण ‘संभाजीनगर’ म्हणून करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ही मागणी गोवा, दमण आणि दीवच्या महसूल विभागाने २० नोव्हेंबर १९७० या दिवशी काढलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार आहे (Ref: RD/GAZ/321/70), ज्यामध्ये स्पष्टपणे ‘वास्को-द-गामा’ या नावाचा ‘संभाजी’ असा उल्लेख करण्यास सांगण्यात आले आहे.
तथापि या अधिसूचनेला ५४ वर्षे उलटूनही नावाचा अधिकृत वापर चालू झालेला नाही. निवडणूक आयोगासह अनेक शासकीय नोंदींमध्ये ‘वास्को’ असाच उल्लेख चालू आहे. आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा प्रमुख श्री. नितीन फळदेसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी याविषयी मुरगावचे साहाय्यक निवडणूक अन् महसूल अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केला आहे.
तत्कालीन निर्णय हा ब्रिटीश आणि पोर्तुगीज वसाहतींशी संबंधित स्थानांची नावे पालटून भारतीय इतिहासातील महान व्यक्तींची नावे स्थानांना ठेवण्याच्या धोरणाचा भाग होता. छत्रपती संभाजी महाराज यांनी पोर्तुगिजांना गोव्यातून जवळपास हाकलून लावले होते. त्यांच्या नावाचा सन्मान करण्यासाठी हा पालट सुचवण्यात आला होता.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
१. वर्ष १९७० च्या सरकारी अधिसूचनेला मान्यता द्यावी आणि त्याची कार्यवाही करावी.
२. सर्व निवडणूक सूची, मतदार ओळखपत्रे आणि इतर सरकारी नोंदी यांमध्ये ‘संभाजी नगर’ असा उल्लेख करावा.
३. पुढील सर्व सरकारी दस्तऐवज आणि निवडणुकीशी संबंधित कागदपत्रांमध्ये ‘संभाजी नगर’ हे अधिकृत नाव असावे.
अनेक इतिहासप्रेमींना वाटते की, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या योद्ध्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था यादेखील या विषयावर प्रतिक्रिया देत आहेत आणि योग्य निर्णय होण्यासाठी सरकारवर दबाव टाकत आहेत. गोव्याच्या जनतेचा असा विश्वास आहे की, जर सरकारने कायदेशीरपणे नाव पालटले असेल, तर निवडणूक आयोग, नगरपालिका आणि महसूल विभाग यांनीदेखील त्याची कार्यवाही करावी.
या संदर्भात श्री. नितीन फळदेसाई यांनी वर्ष १९७० च्या सरकारी अधिसूचनेची प्रत अधिकार्यांना दिली आहे आणि प्रशासनाने दायित्व स्वीकारून ही त्रुटी त्वरित सुधारावी, अशी मागणी केली आहे. मुरगावचे उपजिल्हाधिकारी हे प्रकरण तपासून संबंधित सरकारी संस्थांशी समन्वय साधतील, अशी अपेक्षा आहे.
मुरगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये या सूत्रावर चर्चा रंगल्या आहेत. #SambhajiNagarNow, #HonorSambhaji आणि #RenameVasco यांसारख्या हॅशटॅग्स (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) सामाजिक माध्यमांत प्रसारित होत आहेत.