फोंडा, ६ एप्रिल (वार्ता.) – गोमंतकात शिवशाही होती. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा दरारा आणि धाक होता. यामुळेच गोव्यातील काही तालुक्यांमध्ये पोर्तुगिजांकडून होणारा धार्मिक उन्माद अल्प होऊन धर्मांतराला आळा बसला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्याचे कार्य आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदान यांचे पडसाद गोमंतकियांसह संपूर्ण भारतियांच्या जीवनावर उमटलेले दिसतात, असे विधान इतिहासाचे अभ्यासक सचिन मदगे यांनी केले. सावईवेरे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गोमंतकातील पाऊलखुणा’, या विषयावरील व्याख्यानमालेत सचिन मदगे बोलत होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या फोंडा येथील आक्रमणानंतर पोर्तुगिजांचे दुर्भाटमार्गे पलायन
ते पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी नौदल उभारल्याने पोर्तुगिजांना त्याचा आपोआपच शह बसला. वर्ष १६६३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुडाळ प्रांत जिंकल्यानंतर त्यांचे गोव्यात पेडणे, डिचोली आणि सत्तरी येथे राज्य चालू झाले आणि गोमंतकात शिवशाही चालू झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर हा भाग आपोआपच छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याचा भाग बनला. पोर्तुगीज वर्ष १६८३ मध्ये गलबतातून दुर्भाट येथे आले आणि त्यांनी पुढे फोंड्याच्या दिशेने आगेकूच केली. त्यांनी फोंड्याला वेढा घातला; परंतु पावसामुळे पोर्तुगिजांचा दारूगोळा भिजला आणि तोफा बंद पडल्या. त्याच वेळी छत्रपती संभाजी महाराज फोंडा येथे आले. त्या वेळी पोर्तुगीज सैनिकांनी दुर्भाट येथे पलायन केले. इतिहासात कोणत्याही भारतीय राजाने अशा प्रकारे पोर्तुगिजांना मार दिलेला हा पहिला प्रसंग फोंडा महालातील दुर्भाट येथे झालेला होता.’’
छत्रपती शिवाजी महाराजांनी ३ पाद्र्यांचा शिरच्छेद केल्यानंतर धर्मांतराला आळा !
सचिन मदगे पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पोर्तुगिजांनी ‘गोमंतकियांनी बार्देश सोडून जावे’, असा हुकूम काढला. या हुकूमाच्या विरोधात महाराजांनी बार्देश तालुक्यावर स्वारी करून ३ पाद्र्यांचा शिरच्छेद केला. त्यामुळे पोर्तुगीज गव्हर्नर घाबरला आणि त्याने धर्मांतर करण्याचा हुकूम मागे घेतला. धर्म आणि राजकारण यांविषयी पोर्तुगिजांना जाब विचारणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते. महाराजांनी एप्रिल १६७५ मध्ये वरचा बाजार, फोंडा येथील किल्ला जिंकला. आताच्या अनेक जिज्ञासू व्यक्तींना ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा गोव्यात केवळ प्रभाव होता’, असे वाटते आणि हे चुकीचे आहे. गोव्यात शिवशाही होती आणि नाट्यकलाकारांनी ‘शिवाजी आणि गोवा’ या विषयावर नाटके सिद्ध केली पाहिजेत.’’