मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – विधानसभेत आमदार रवी राणा यांनी शेतकर्यांच्या सूत्रावरून गोंधळ घालत ६ जुलै या दिवशी ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आमदार राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेेश दिले.
आमदार राणा हे तालिका अध्यक्ष जाधव यांना निवेदन देण्यासाठी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत उतरले होते. या वेळी अध्यक्षांनी ‘अशा प्रकारे निवेदन देता येत नाही. तुम्ही ‘स्टंटबाजी’ करू नका. तुम्हाला योग्य वेळी बोलण्याची संधी दिली जाईल’, असे ठणकावून सांगितले; मात्र तरीही राणा यांनी ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अध्यक्षांनी आमदार राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले.
‘राजदंडा’चे महत्त्व काय आहे ?सभागृहामध्ये सर्वाधिक अधिकार हे अध्यक्षांकडे असतात. सभागृह सुरळीत चालू ठेवण्याचे दायित्वही अध्यक्षांवरच असते. पारंपरिक पद्धतीनुसार अध्यक्षांच्या आसनासमोर ‘राजदंड’ ठेवला जातो. सभा संपेपर्यंत ‘राजदंड’ तिथेच ठेवलेला असतो. ‘राजदंड’ हा सभागृहातील सर्वोच्च सन्मानाचे प्रतीक असल्याने तो उचलून सभागृहाबाहेर नेल्यास सभागृहाचे कामकाज थांबवावे लागते. स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी किंवा सभागृहाने ऐकून घ्यावे, या हेतूने अथवा एखादा ठराव आणि निर्णय न पटल्यास सदस्य ‘राजदंड’ पळवून सभागृहाबाहेर नेण्याचा प्रयत्न करत असतात. |