शाळेची फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना त्रास दिल्यास कठोर कारवाई करणार ! – आयुक्त राजेश पाटील

दिलेल्या आदेशाची कार्यवाही खासगी आणि महापालिकेच्या शाळांमध्ये खरेच होत आहे ना, याचा तपास करण्यासाठीही यंत्रणा राबवायला हवी. तरच शुल्काच्या संदर्भातील शाळांचा मनमानी कारभार थांबेल.

आयुक्त राजेश पाटील

पिंपरी – शाळेचे शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास देणार्‍या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे; मात्र आपत्कालीन परिस्थितीत अशा प्रकारे संवेदनाहीन वागणे समाजहिताच्या दृष्टीने चांगले नाही. विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्यामुळे त्यांचे दाखले देणे, त्यांचा निकाल अडवून ठेवणे, ‘ऑनलाईन’ शिक्षण सुविधा बंद करणे, शाळेतच वह्या, पुस्तके आणि गणवेश खरेदीची सक्ती करणे किंवा शाळेतून काढून टाकणे यांसारख्या गोष्टी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व खासगी शाळा व्यवस्थापनाविषयी शुल्काच्या संदर्भातील वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते.

सध्याच्या या संवेदनशील परिस्थितीचा विचार करून लोकसेवेला महत्त्व द्यावे, कुटुंबाच्या सर्वंकष परिस्थितीचा विचार करून शालेय शुल्कामध्ये सवलत द्यावी, आर्.टी.ई. अंतर्गत असलेले प्रवेश तात्काळ द्यावेत, तसेच पालकांशी संवाद साधून शुल्क संदर्भातील निर्णय घ्यावा. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमध्ये जनजागृती करण्यासाठी अचूक आणि योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी अशा सूचना आयुक्त पाटील यांनी बैठकीत दिल्या. काही व्यक्ती शाळेला हेतूपूर्वक त्रास देत असतील, तर महापालिका  प्रशासनाचे सहकार्य शाळा व्यवस्थापनाला असेल, असे सांगून पिंपरी-चिंचवड शहराचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पाटील यांनी या वेळी केले.