Nandini Ghee In Karnataka Temples : कर्नाटकातील सर्व मंदिरांमध्‍ये ‘नंदिनी तुपा’चा वापर अनिवार्य !

तिरुपती मंदिराच्‍या लाडवांच्‍या प्रकरणानंतर कर्नाटकाच्‍या धर्मादाय विभागाचा आदेश

बेंगळुरू (कर्नाटक) – तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्‍या लाडवांमध्‍ये प्राण्‍यांच्‍या चरबीचा वापर झाल्‍याचे आढळून अल्‍यानंतर कर्नाटकाच्‍या धर्मादाय विभागाने राज्‍यातील सर्व मंदिरांमध्‍ये नंदिनी तुपाचा वापर अनिवार्य करण्‍याचा आदेश दिला आहे. धर्मादाय विभागाचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. यात  धर्मादाय विभागाच्‍या अंतर्गत येणार्‍या मंदिरांच्‍या दीपांमध्‍ये, प्रसाद बनवण्‍यासाठी आणि अन्‍नदान भवनात नंदिनी तुपाचा वापर अनिवार्य केला आहे.

नंदिनी तुपाची निर्मिती ‘कर्नाटक सहकार महासंघा’कडून करण्‍यात येते. हे तूप  गायीच्‍या दुधापासून बनवलेले आहे. हे तूप पारंपरिक पद्धतीनुसार बनवले जाते. त्‍याला ‘एगमार्क’ (कृषी खात्‍याकडून देण्‍यात येणारे प्रमाणपत्र) प्रमाणपत्र आहे आणि त्‍यात कोणताही कृत्रिम रंग मिसळला जात नाही.