शिमला : अवैध संजौली मशिदीच्‍या विरोधात झालेले ऐतिहासिक राज्‍यव्‍यापी आंदोलन अराजकीय !

  • हिमाचल प्रदेशातील संजौली येथील मशिदीच्‍या विरोधात राज्‍यव्‍यापी आंदोलन उभारणारे कमल गौतम यांची माहिती

  • काँग्रेस आणि भाजप पक्षांतील धर्मप्रेमी हिंदूही सहभागी !

शिमला (हिमाचल प्रदेश) – ५ सप्‍टेंबरला येथील अवैध संजौली मशिदीच्‍या विरोधात हिंदूंनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्‍या वेळी सरकारने काही हिंदूंना एकत्रित करून एक कथित आंदोलन केल्‍याचे षड्‍यंत्र रचले होते. प्रत्‍यक्षात आमच्‍या आंदोलनात ५ सहस्र ते ६ सहस्र हिंदू सहभागी झाले. त्‍यामुळे या सरकारी आंदोलनाचा फज्‍जा उडाला, असे वक्‍तव्‍य येथील प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ नेते कमल गौतम यांनी ‘सनातन प्रभात’शी बोलतांना केले. या वेळी ते म्‍हणाले की, हे संपूर्ण आंदोलन अराजकीय असून काँग्रेस आणि भाजप या दोन्‍ही पक्षांतील धर्मप्रेमी हिंदू या आंदोलनात एक हिंदू म्‍हणून सहभागी झाले आहेत.

अवैध मशिदींच्‍या विरुद्ध चालू असलेल्‍या राज्‍यव्‍यापी आंदोलनाचे नेतृत्‍व करणारे गौतम पुढे म्‍हणाले की,

१. ११ सप्‍टेंबरला निर्णायक आंदोलन करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. त्‍या वेळी तब्‍बल २ सहस्र पोलिसांच्‍या ६ तुकड्या तैनात करण्‍यात आल्‍या होत्‍या.

२. तेव्‍हा मला कह्यात घेण्‍यात आल्‍याने हे आंदोलन चांगलेच चिघळले. संतापलेल्‍या हिंदु धर्मप्रेमींनी मशिदीसमोरील अडथळे (बॅरिकेड्‍स) तोडले.

३. सर्वसामान्‍य हिंदूंच्‍या धर्मनिष्‍ठेचा प्रत्‍यय या वेळी आला. मशिदीपासून ८-१० किमी दूरच सर्व वाहनांना थांबवण्‍यात आले होते. संपूर्ण परिसराने छावणीचे रूप घेतले होते. एवढे होऊनही १२ सहस्र ते १५ सहस्र हिंदू आंदोलनस्‍थळी चालत आले.

४. आंदोलनाची वाढत चाललेली उग्रता पाहून पोलिसांनी आम्‍हा हिंदूंवर लाठीमार करण्‍यासह पाण्‍याचा माराही केला. यामुळे ११ आणि १२ सप्‍टेंबरला ‘शिमला बंद’ची, तर १४ सप्‍टेंबरला संपूर्ण राज्‍य बंद ठेवण्‍याची हाक देण्‍यात आली. संपूर्ण हिंदु समाजाने यास पाठिंबा देत बंद पाळला.

५. या सर्व प्रकारामुळे माझ्‍यावर भारतीय न्‍याय संहितेच्‍या अत्‍यंत कठोर कलमांखाली गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. माझ्‍यासह ५० हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या विरुद्धही गुन्‍हा नोंदवला गेला.

६. शिमल्‍यात चालू झालेले आंदोलन पुढे मंडी, सोलन, पालमपूर, बिलासपूर, सुनी, नेरवा आदी शहरांमध्‍ये पसरले. सोलन आणि मंडी येथे तर हिंदूंनी अवैध मशीद तोडायलाही आरंभ केला होता. या प्रत्‍येक शहरात अवैध मशिदी उभ्‍या आहेत.