पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय संस्कृती’ हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार असणे, भारतीय संस्कृती मनुष्याच्या जीवनाच्या वास्तवावर प्रकाश टाकत असणे आणि ‘आत्मा’ मनुष्याच्या शरिरात अव्यक्त आणि इंद्रियातीत रूपाने विद्यमान असल्याचे ज्ञान वेदांतून प्राप्त होणे याविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील लेख पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/490341.html |
(भाग ३)
१. विषय प्रवेश
१ घ. अंतःकरण शुद्ध करणार्या शिक्षणाची आवश्यकता !
१ घ १. मनुष्य आत्म्याविषयी अनभिज्ञ असणे, आत्म्याचे अस्तित्व अनेक पुरावे, तर्क, उदाहरणे इत्यादींद्वारे सप्रमाण सिद्ध करता येऊ शकणे आणि भारतीय संस्कृतीत अंतर्भूत असलेल्या आध्यात्मिक विद्यांमध्ये आत्मतत्त्वाची स्थुलातून अनुभूती येण्यासाठी अनेक उपाय असणे : ‘अधिकतर समाजाचे आत्म्याविषयीचे अज्ञान, तसेच त्याविषयी जाणून घेण्याच्या जिज्ञासेचा अभाव’, हीच आधुनिक युगाची सर्वांत मोठी समस्या आहे. डोळे मनुष्याच्या अत्यंत निकट असतात. डोळा हा अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त अवयव असतो; परंतु जोपर्यंत डोळ्यांना काही त्रास होत नाही, तोपर्यंत मनुष्याचे अनेक आठवडे अन् अनेक मास त्यांच्याकडे लक्षही नसते. त्याचप्रमाणे मनुष्य आत्म्याविषयी अनभिज्ञच रहातो. आत्मा तर मनुष्याने कधी पाहिलेलाही नसतो किंवा त्याचा अनुभवही त्याने घेतलेला नसतो. अशा स्थितीत ‘त्याच्याविषयी काही ज्ञान नसणे’, यात आश्चर्यजनक असे काहीच नाही. याच ‘आश्चर्यजनक नसण्याला’ शास्त्रांनी सर्वांत मोठे आश्चर्य मानले आहे. मनुष्याने जर एखादा विशिष्ट पदार्थ पाहिला नसेल किंवा त्याला त्याची माहितीच नसेल, तर त्याचा अर्थ ‘तो पदार्थ अस्तित्वातच नाही’, असे होत नाही. आत्म्याचे अस्तित्वही अनेक पुरावे, तर्क, उदाहरणे इत्यादींद्वारे सप्रमाण सिद्ध करता येऊ शकते. भारतीय संस्कृतीत अंतर्भूत असलेल्या आध्यात्मिक विद्यांमध्ये आत्मतत्त्वाची स्थुलातून अनुभूती येण्यासाठी अनेक उपाय आहेत. यांचा ऊहापोह प्रस्तुत ग्रंथात केला आहे.
१ घ २. मनुष्याच्या बुद्धीत योग्य प्रकारे माहिती घातली जाऊ शकणे आणि याच माहितीच्या आधारे मनुष्याने तर्क-वितर्काद्वारे संशोधन करून ज्ञान प्राप्त करणे : ‘मनुष्य बुद्धीद्वारे ज्ञान कसे प्राप्त करतो ? म्हणजेच बुद्धीद्वारे ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया कशी असते ?’, हे प्रश्नसुद्धा विचारात घेण्यासारखे आहेत. भौतिक शिक्षणतज्ञांचे मत आहे की, ज्याप्रमाणे रिकाम्या घड्यात पाणी भरले जाते, त्याचप्रमाणे मनुष्याच्या बुद्धीतही योग्य प्रकारे माहिती घातली जाऊ शकते. याच माहितीच्या आधारे मनुष्य तर्क-वितर्काद्वारे संशोधन करून ज्ञान प्राप्त करू शकतो.
१ घ ३. भारतीय संस्कृती अंतःकरण शुद्ध करणार्या शिक्षणावर भर देत असणे : वरील प्रश्नाचे उत्तर भारतीय संस्कृती अगदी वेगळ्या आणि विलक्षण प्रकारे देते. भारतीय संस्कृतीनुसार बुद्धीमध्ये ज्ञानेंद्रियांद्वारे (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांद्वारे) समक्ष असलेल्या पदार्थाच्या अंतःप्रेरणा (वृत्ती) बुद्धीमध्ये निर्माण होतात. त्यानंतर या अंतःप्रेरणांवर आत्म्याचे प्रतिबिंब (प्रकाश अथवा प्रभाव) पडते, ज्यामुळे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे समस्त बौद्धिक ज्ञान म्हणजे आत्म्याचा प्रकाश आहे, जे बुद्धीद्वारे प्रतिबिंबित होते. त्याला मनुष्य ‘ज्ञानप्राप्ती’ असे म्हणतो. प्रकृतीच्या सत्त्वगुणाचा अंश अंतःकरणात (बुद्धीत) अधिक असल्यामुळे बुद्धीमध्ये अंतःप्रेरणा निर्माण होण्याची क्षमता आहे. अन्य कशातही ही क्षमता नसते. जसे चमकदार स्वच्छ आरशामध्येच (‘मिरर’मध्येच) सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करण्याची क्षमता असते, तसेच हेही आहे. अंतःकरण जितके अधिक शुद्ध असेल, तितकाच आत्मतत्त्वाचा (चेतनाशक्तीचा) प्रभाव त्यावर अधिक झाल्यामुळे बुद्धीची क्षमता वाढेल, बुद्धीच्या दिव्य शक्ती जागृत होतील आणि अपरोक्ष ज्ञानाची अनेक सामर्थ्ये प्रकाशात येतील. यासाठी भारतीय संस्कृती अंतःकरणशुद्धी करणार्या शिक्षणावर अधिक भर देते आणि त्यावर विविध उपायही सांगते.
१ च. शिक्षणाचा व्यापक दृष्टीकोन
१ च १. मानवी बुद्धीचे दोष न्यून करून गुण वाढवणारे शिक्षण हवे ! : शिक्षण सार्थक, भव्य-दिव्य, मनोरंजक आणि श्रेष्ठ तेव्हाच होऊ शकते, जेव्हा आपला जीवनाप्रतीचा दृष्टीकोन व्यापक असतो आणि शिक्षणात ही व्यापकता स्पष्ट रूपाने झळकतांना दिसते. व्यापक दृष्टीकोनाच्या अंतर्गत विविध विचारही समाविष्ट आहेत. ‘ज्ञान केवळ प्रत्यक्ष (ज्ञानेंद्रियांद्वारे प्राप्त) आणि परोक्षच (पुस्तक वाचून किंवा ऐकून प्राप्त) असते किंवा अन्य प्रकारेसुद्धा होते’, हे शिक्षणासाठी जाणून घेणे आवश्यक आहे. मनुष्याला निसर्गदत्त जीव म्हटले जाते. त्याचे तात्पर्य आहे, ‘प्रकृती काय आहे ? प्रकृतीचे गुण कोणते आहेत ? ते (गुण) मनुष्याला कशा प्रकारे प्रभावित करतात ?’, हे जाणणे आवश्यक आहे अन् त्यानुसार शिक्षण द्यायला पाहिजे.’ ‘पुनर्जन्म होतो कि नाही ?’, हे जाणून घेणे आवश्यक आहे; कारण पुनर्जन्माचे सत्य मान्य केल्यामुळे शिक्षणाच्या स्वरूपात पालट होईल. सुख-दुःखांचे विस्तृत विश्लेषण व्हायला पाहिजे आणि ‘सुख-दुःख स्वाभाविक आहेत कि अस्वाभाविक ?’, हे जाणून घेतले पाहिजे. जर सुख-दुःखे अस्वाभाविक असतील, तर ‘कोणत्या प्रकारच्या शिक्षणाद्वारे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकते ?’, हे जाणून घेणे आवश्यक होते. ‘मानवी बुद्धीचे गुण-दोष कोणते आहेत आणि कोणत्या प्रकारच्या शिक्षणाद्वारे बुद्धीचे दोष क्षीण केले जाऊ शकतात अन् गुणांची वृद्धी केली जाऊ शकते ?’, या महत्त्वपूर्ण गोष्टीचे ज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे.
१ च २. मानवी जीवनाच्या बंधनांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे शिक्षण हवे ! : मनुष्याच्या शरिरात अथवा विश्वात या अव्यक्त आणि अतींद्रिय शक्ती विद्यमान आहेत कि नाहीत ? जर असतील, तर ‘कोणत्या प्रकारच्या शिक्षणामुळे त्यांची उपयुक्तता सिद्ध केली जाऊ शकते ?’, याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मानवी जीवनाची बंधने कोणती आहेत ? या बंधनांचे ज्ञान झाल्यावर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. जगात भिन्न-भिन्न गुणांची माणसे असतात, कुणी विद्वान आणि शूरवीर असतो अन् कुणी मंदबुद्धीचा आणि दुर्बळ असतो; म्हणून शिक्षण असे असायला पाहिजे, जे याच्या खर्या कारणांचे ज्ञान करवून देईल आणि मनुष्याला खर्या अर्थाने विद्वान अन् शूरवीर बनवू शकेल. हे सर्व विचार व्यापक दृष्टीकोन प्रदर्शित करतात. व्यापक दृष्टीकोन आत्मसात केल्यावर शिक्षणाचे स्वरूप पालटते. त्याचे दिग्दर्शन प्रस्तुत ग्रंथात करण्यात आले आहे.
१ छ. आधुनिक शिक्षणपद्धतीतील गुण-दोष जाणून शिक्षणात सुधारणा करणे आवश्यक असणे : आपण जेथे आहोत, तेथपासूनच नेहमी यात्रा आरंभ केली जाते. जेथे आपल्याला पोचायचे आहे, त्या गंतव्यापासून यात्रेचा आरंभ कधीच होत नसतो. त्यामुळे शिक्षणात सुधारणा करण्यासाठी सर्वप्रथम आधुनिक शिक्षणाचे गुण-दोष समजून घेतले पाहिजेत. या गुण-दोषांच्या मर्यादा आणि त्यांची कारणेसुद्धा जाणून घेतली पाहिजेत. प्रस्तुत ग्रंथात आम्ही प्रश्न केला आहे, ‘कोणते शिक्षण असायला पाहिजे ?’, याचा निर्णय मनुष्याची बुद्धी घेऊ शकते का ? हा प्रश्न आधुनिक भौतिकवाद्यांना विचित्रसुद्धा वाटू शकतो. या प्रश्नाचे उत्तरही प्रस्तुत ग्रंथात देण्यात आले आहे. शिक्षणाची धोरणे पुराव्यांवर आधारित असायला हवीत आणि शिक्षणाचे उद्देश अन् ते शिक्षण प्राप्त करण्याच्या उपायांची स्पष्ट व्याख्या असायला पाहिजेत. प्रस्तुत ग्रंथात आधुनिकतेने पछाडलेल्या युवकांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि ग्रंथाच्या अंतिम खंडात आधुनिक विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचे निराकरण केले आहे.
१ ज. ग्रंथातील प्रकरणांची निवड : प्रस्तुत ग्रंथाचे शीर्षक अर्थपूर्ण करतांना प्रकरणांची निवड पुढील प्रकारे केली आहे. आधुनिक शिक्षणातील दोषांचे कारण आधुनिक समाजाच्या मान्यताप्राप्त सभ्यतेच्या संकल्पना आहेत. त्यांचे वर्णन पुढील ‘प्रकरण २’मध्ये केले आहे. शिक्षणाच्या दोषांचे वर्णन प्रामुख्याने ‘प्रकरण ३’मध्ये करण्यात आले आहे. ‘व्यावहारिक बुद्धीच शिक्षणासाठी उपयुक्त समजली जाणे’ (प्रकरण ४ आणि ५), हा सुद्धा निर्णय आधुनिक शिक्षणाचा दोषच म्हणावा लागेल. सर्वोत्तम शिक्षण त्यालाच म्हटले जाईल, ज्यामध्ये पुराव्याचा आधार असेल (प्रकरण ६), व्यापक दृष्टीकोन असेल (प्रकरण ७), शिक्षणाचे उद्देश योग्य आणि स्पष्ट निर्धारित केलेले असेल (प्रकरण ८) आणि या उद्देशांच्या पूर्तीचे व्यावहारिक उपाय सांगितले असतील (प्रकरण ९), ज्यामुळे सामाजिक आणि व्यक्तीगत लाभ व्हावेत (प्रकरण १०). सर्वोत्तम शिक्षणाचा गुण हासुद्धा असायला पाहिजे की, जो आधुनिकतेने पछाडलेल्या युवकांच्या प्रश्नांना समयोचित उत्तरे देऊ शकेल (प्रकरण ११) आणि स्वार्थांधतेमुळे विद्यार्थ्यांत उत्पन्न झालेल्या अज्ञानाचे निवारण करील (प्रकरण १२).’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/493877.html |
– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक
(साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)