संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अलौकिक कार्यातील साम्य दर्शवणारी सूत्रे !

‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मंजुळ आवाजात ‘मोगरा फुलला’ हा अभंग ऐकतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण आली. तेव्हा गुरुमाऊली आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या अलौकिक कार्यातील साम्य पुढील अभंगांच्या अर्थातून माझ्या लक्षात आले. त्याविषयी येथे दिले आहे. 

समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर !

१. मोगरा फुलला मोगरा फुलला । फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ।।  

१ अ. चंद्रभागेच्या तिरी ज्ञान आणि भक्ती यांचे पहिले मिलन घडले, ही परंपरा आषाढी अन् कार्तिकी एकादशीला आजही चालू असणे : ‘ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे यांना आपेगाव, नेवासे, अलंकापुरी (आळंदी) येथे भिक्षा मागत फिरत असतांना पुष्कळ हालअपेष्टा भोगल्या. आत्मानुभावाच्या स्फुल्लिंगातूनच या मोगर्‍याच्या रोपाचा, म्हणजेच ‘पंढरीच्या वारीचा’ जन्म झाला. ज्ञानेश्वर माऊलींनी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला चंद्रभागेच्या तिरावर संत मेळावा भरवण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरला निघाले. समवेत निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, चांगदेव आणि त्यांचे सहस्रो शिष्यगण अन् अन्य भक्त होते. पंढरपूर येथे संत नामदेव, संत जनाबाई, संत गोरा कुंभार त्यांना येऊन मिळाले. चंद्रभागेच्या तिरी ज्ञान आणि भक्ती यांचे मिलन घडले. भजन कीर्तनाची धुमाळी उडाली, अशी ही पहिली वारी झाली.

आजच्या घडीला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अनेक दिंड्या अन् लक्षावधी वारकरी पंढरीत जमतात. सारा परिसर पांडुरंगाच्या गजराने दुमदुमतो. भक्तीचा सुगंध आसमंतात पसरतो. त्या वेळी ‘फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ।।’, या ओळीची प्रचीती येते.

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सनातन संस्थेचे’ रोप लावणे आणि त्यावर साधकरूपी फुले बहरून येणे अन् अजूनही या वेलीवर कळ्या उमलतच असणे आणि आपल्या गुणरूपी गंधांनी ही फुले आसमंत भारून टाकत असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९९ मध्ये ‘सनातन संस्थेचे’ रोप लावले. त्यावर राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रेमाच्या भगव्या रंगाची साधकरूपी फुले बहरून आली अन् अजूनही या वेलीवर कळ्या उमलतच आहेत. आपल्या गुणरूपी गंधांनी ही फुले आसमंत भारून टाकत आहेत. तेव्हा ‘फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ।।’’, याची प्रचीती येते.

२. इवलेंसे रोप लावियलें द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावेरी ।। २ ।।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२ अ. लक्षावधी वारकरी स्वेच्छेने एकत्र येत असल्याचे पाहून देश-विदेशात वारीचा डंका वाजत असणे आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’, म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’, ही जाणीव जगाच्या कानाकोपर्‍यात निर्माण होणे : ज्ञानेश्वर माऊलींनी पंढरपूरच्या वारीचे इवलेसे रोप लावले होते. आज दिंड्या आणि पताका घेऊन लक्षावधी वारकरी पंढरपूरला धाव घेतात. ‘एवढा समुदाय स्वेच्छेने एकत्र येतो. सर्व नियमांचे पालन करतो’, हे पाहून जगभरातील लोकांचे डोळे विस्फारले आहेत. देश-विदेशांत वारीचा डंका वाजत आहे. भक्तीरसाची गोडी विदेशांतही चाखली जात आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’, म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’, ही जाणीव जगाच्या कानाकोपर्‍यात निर्माण होत आहे, म्हणजेच इवलेंसे रोप लावियलें द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावेरी ।। २ ।। ’, याची प्रचीती येत आहे.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सनातन संस्थेचे’ इवलेसे रोप लावले असणे आणि सर्वत्रचे जिज्ञासू अन् साधक ‘सनातन संस्थेकडे’ आकर्षित होत असणे आणि ‘हे विश्वची माझे घर’ या बोधवाक्याने प्रभावित होत असणे : तद्वत्च गुरुमाऊलीने ‘सनातन संस्थेचे’ इवलेसे रोप आपल्या दारी लावले होते. आज सर्वत्रचे जिज्ञासू आणि साधक सनातन संस्थेकडे आकर्षित होत आहेत. जगभरातील विद्वान आणि अन्य धर्मीय ‘हे विश्वची माझे घर’ या बोधवाक्याने प्रभावित होत आहेत. ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होणार’, हे निश्चित आहे. यातून ‘इवलेंसे रोप लावियलें द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावेरी ।। २ ।। ’, याची प्रचीती आपल्याला येत आहे.

३. मनाचिये गुंती गुंफियेला शेला । बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ।। 

श्री. विलास महाडिक

३ अ. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांच्या साहाय्याने ज्ञानेश्वर माऊलींनी ‘वारी’रूपी सुंदर शेला गुंफला असणे आणि तो विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला असणे : ‘संन्याशांची मुले’ म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे (संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई) असह्य हालअपेष्टा सोसत होती. एका प्रसंगाने कडेलोट केला. माऊलीने उद्वेगाने स्वतःला झोपडीत बंद केले. त्यांच्या मनात असंख्य भावनांचा गुंता झाला होता; पण लहानग्या मुक्ताईने त्यांच्या मनाच्या गाठी सोडवल्या आणि ताटी उघडली गेली. मनाचा गुंता सोडवल्यानंतर ‘ज्ञान, भक्ती आणि वैराग्य’ यांचे धागे त्यांच्या हाती आले. या धाग्यांच्या साहाय्याने त्यांनी ‘वारी’रूपी सुंदर शेला गुंफला आणि तो ‘बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ।।’

विठू माऊलीने ज्ञानेश्वर माऊलींचे अंतरंग ओळखले. ‘अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।’, म्हणजे ‘सगळा (परमार्थरूपी) संसार सुखाने करून तीनही लोक आनंदाने भरून टाकीन.’ प्रसन्न झालेल्या विठूमाऊलीने ज्ञानेश्वर माऊलीला पसायदान (अभंग) दिले आणि माऊली सुखी झाली.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना चित्तातील स्वभावदोष आणि अहं यांचा गुंता सोडवण्यासाठी प्रक्रिया सांगणे, त्यानंतर राष्ट्रभक्ती अन् धर्मप्रेम यांच्या धाग्यांनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा सुंदर शेला गुंफला असणे अन् तो प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी अर्पण केला असणे : परात्पर गुरुमाऊलींनी असेच महान कार्य केले आहे. त्यांनी अनेक अडचणी असतांनाही ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. त्यासाठी आपल्या सेनेचे (साधकांचे) आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी साधकांना चित्तातील स्वभावदोष आणि अहं यांचा गुंता सोडवण्यासाठी प्रक्रिया सांगितली. हा गुंता सुटल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या हाती साधकांमधील राष्ट्रभक्ती आणि धर्मप्रेम यांचे अनंत धागे हाती लागले. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या धाग्यांनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा सुंदर शेला गुंफला आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी अर्पण केला.

४. ‘माझा मराठाचि बोलु कौतुकें । 
परि अमृतातेंहि पैजां जिंके । 
ऐसीं अक्षरें रसिकें । 
मेळवीन ।। (ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी १४) 

४ अ. ज्ञानेश्वर माऊलींनी गुरूंच्या आज्ञेने ‘ज्ञानेश्वरी’ लिहिणे आणि गीता मराठी भाषेत अवतरणे : आजपर्यंत सगळा परमार्थ संस्कृत भाषेत लिहिला गेला. त्यामुळे भोळे-भाबडे जीव परमार्थापासून दूर राहिले. ‘परमार्थ विचार मराठीत आण’, अशी आज्ञा माऊलीला त्यांच्या गुरूंनी (संत निवृत्तीनाथांनी) केली.

‘‘माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंहि पैजां जिंके । ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ।। (ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी १४) , म्हणजे ‘माझे हे प्रतिपादन मराठी आहे खरे; पण अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल, अशा तर्‍हेची रसभरीत शब्दरचना मी करीन.’ नंतर ‘ज्ञानेश्वरी’ रूपाने गीता मराठी भाषेत अवतरली.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरूंच्या आज्ञेने वैज्ञानिक भाषेत ग्रंथांची रचना केली असणे : गुरुमाऊलीने गुर्वाज्ञेचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) पालन करून विज्ञानयुगातील लोकांना समजतील अशा वैज्ञानिक भाषेत ग्रंथांची रचना केली आहे. अध्यात्मातील प्रत्येक कृतीविषयी ‘का अन् कसे’ यांची शास्त्रीय उत्तरे देणारी आणि तात्त्विक विवेचन नव्हे, तर साधना कृतीत आणण्याविषयी मार्गदर्शन करणार्‍या ग्रंथांचे लिखाण केले आहे.

५. ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि ज्ञानप्रकाशाने समाजाचे डोळे उघडले. तद्वत्च गुरुमाऊलीने असेच अफाट कार्य केले आहे. त्यांनी अडाणी, अशिक्षित आणि अल्पमती अशा साधकांकडून अध्यात्माचा प्रचार प्रभावीपणे करून दाखवला आहे.

– श्री. विलास महाडिक (वय ७४ वर्षे), अंधेरी, मुंबई.