पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. ४ जुलै २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय संस्कृती’ हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार असणे, भारतीय संस्कृती मनुष्याच्या जीवनाच्या वास्तवावर प्रकाश टाकत असणे आणि मानवी जीवनाच्या बंधनांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे शिक्षण हवे याविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील लेख पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/492063.html |
(भाग ४)
२. आधुनिक समाज, सभ्यतेच्या संकल्पना आणि दोष
‘आधुनिक समाजाच्या सभ्यतेच्या संकल्पना आणि सामाजिक व्यवस्था यांना पुष्टी देणारे अनुकूल शिक्षण प्रचलित आहे. त्यामुळे आताच्या शिक्षणाचे स्वरूप समजून घेण्यासाठी आधुनिक समाज आणि त्याच्या सभ्यतेविषयीच्या संकल्पना यांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. वर्तमान परिस्थितीत प्रचलित सामाजिक व्यवस्था आणि सभ्यतेच्या संकल्पना यांच्याशी आपण सर्व जण सुपरिचित असल्यामुळे त्यांचे अत्यंत संक्षिप्त विवरण या खंडात प्रस्तुत करण्यात आले आहे.
२ अ. समाजव्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी प्रत्येक मनुष्याने राष्ट्र्र आणि समाज यांद्वारे बनवल्या गेलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणे : मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजाची रचना अशी असायला पाहिजे की, जिच्यामुळे प्रत्येक मनुष्याला न्यूनतम एवढ्या तरी भौतिक सुखसोयी अवश्य मिळायला हव्यात, ज्यांच्यामुळे त्याचे जीवन चांगल्या रितीने व्यतीत होत राहील. प्रत्येक मनुष्याला स्वतःच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळायला पाहिजे. ‘समाजातील लोकांना विविध प्रकारच्या वर्गांत (उच्च-नीच, काळे-गोरे इत्यादी वर्गांमध्ये) विभाजित करू नये’, असा आदर्श सांगितला जातो; परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र समाज धनसंपत्ती, भाषा, प्रांत आणि रंग यांच्या आधारावर विभागला गेल्याचे स्पष्ट दिसून येते. आपापल्या सोयीसुविधा आणि योग्यता यांनुसार सर्वांना धन (धनसंपत्ती) मिळवण्यासाठी अन् इच्छेची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. या कार्यासाठी मनुष्याचे समाजात कोणत्याही प्रकारचे वर्गीकरण केले गेलेले नाही; परंतु आपापल्या कार्यानुसार (राजकीय, नोकरी, चिकित्सा, व्यापार इत्यादी) समाज विविध वर्गांत स्वतःच विभागला जातो. समाजव्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी प्रत्येक मनुष्याने राष्ट्र्र आणि समाज यांद्वारे बनवल्या गेलेल्या नियमांचे पालन करायला पाहिजे. नियमांचे उल्लंघन केल्यावर मनुष्य दंड मिळण्यास पात्र ठरतो.
२ आ. आधुनिक मान्यता आणि दोष : धारणा आणि दोष यांचे वर्णन पुढीलप्रमाणे वेगवेगळे केले आहे. येथे प्रत्येक मान्यतेसह तिच्यातील दोषांचेसुद्धा वर्णन आहे.
२ आ १. या जगात प्रत्यक्ष पदार्थांचेच अस्तित्व आहे ! : जगात ज्या पदार्थांचे अस्तित्व ज्ञानेंद्रियांद्वारे प्रत्यक्ष रूपाने समजून घेऊ शकतो, तेवढेच पदार्थ अस्तित्वात आहेत, अन्य कशाचेही अस्तित्व नाही.
२ आ १ अ. या धारणेतील दोष : ही मान्यता समजण्यास सोपी आहे; परंतु दोषपूर्ण आहे; कारण अतींद्रिय सत्तांचेसुद्धा अस्तित्व असते, उदा. मनुष्याला होणार्या पुष्कळशा शारीरिक आजारांचा आरंभ अव्यक्त पदार्थांपासून होतो. पुष्कळसे आजारसुद्धा आपल्या अत्यंत प्रारंभिक अवस्थेत अव्यक्त रहातात, ज्यांची जाणीव ज्ञानेंद्रियांद्वारे होऊ शकत नाही. आणखीही पुष्कळ उदाहरणे प्रस्तुत केली जाऊ शकतात.
२ आ २. निसर्गच (Nature) सर्वकाही आहे ! : हे जग निसर्गाचा विस्तार आहे आणि मनुष्यसुद्धा निसर्गदत्त जीव आहे. या जगात निसर्गाव्यतिरिक्त अन्य काहीच नाही.
२ आ २ अ. या धारणेतील दोष : निसर्ग जड पदार्थ आहे. जोपर्यंत निसर्गाच्या समवेत कोणती चेतनाशक्ती नसते, तोपर्यंत तो स्वतःहून काहीच करू शकत नाही. जड शक्तीची नियमबद्धता चेतनाशक्तीमुळे असते. मनुष्य केवळ निसर्गदत्त पदार्थ नाही, तर त्याच्यामध्ये चेतनाशक्तीसुद्धा असते.
२ आ ३. निसर्ग केवळ मनुष्याच्या भोगासाठी आहे ! : निसर्गातील सर्व पदार्थ मनुष्याच्या भोगासाठी आहेत. मनुष्य आपल्या सामर्थ्यानुसार त्याची जेवढी इच्छा आहे, तेवढा त्याचा उपभोग घेऊ शकतो.
२ आ ३ अ. या धारणेतील दोष : निसर्गातील पदार्थ मनुष्याच्या भोगासाठी असल्याचे समजल्यामुळे मनुष्य अधिकाधिक नैसर्गिक पदार्थ शोधून काढेल, ज्यामुळे त्यांचा भरपूर उपभोग घेता येईल. निसर्गाला भोगण्याच्या शर्यतीत ‘नैसर्गिक संपत्ती मर्यादित प्रमाणात आहे आणि ती समाप्त किंवा विकृत झाल्यानंतर मनुष्याची काय दशा होईल ?’, या विचाराची अवहेलना होईल. भौतिक संपत्ती प्राप्त करण्यासाठी मनुष्य कठोर परिश्रम करील. आपल्या प्रयत्नांत यशस्वी झाल्यावर मनुष्य सुख आणि संतुष्टता अनुभवेल अन् त्याला भौतिक ऐश्वर्याची प्राप्तीसुद्धा होईल; परंतु त्यानंतर अधिकाधिक प्राप्त करण्याची त्याची लालसा बळावत जाईल, जी त्याचे सुख आणि संतोष न्यून आणि क्षीण करील; कारण ही तहान (लालसा) दुःखदायक असते. साठवलेली नैसर्गिक संपत्ती मनुष्य आणि समाज यांच्या अहंकाराला पुष्टी देईल. हा अहंकार मनुष्य आणि समाज यांच्यामध्ये असलेल्या विविध समस्यांचे एक प्रमुख कारण आहे.
‘निसर्ग केवळ मनुष्याच्या भोगासाठी आहे’, हा विचार योग्य नाही. मनुष्याने जर तप केले, तर निसर्ग मनुष्याला दिव्य शक्ती प्रदान करतो. निसर्ग हे मनुष्याच्या मोक्षाचे साधनही आहे. निसर्गानेच प्रेम करण्यासाठी मनुष्याला हृदय दिले आहे.
२ आ ४. मनुष्याच्या अस्तित्वाचा काळ त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच असतो ! : मनुष्याचा जन्म आणि मृत्यू होत असतो. मनुष्याच्या जीवनाचा काळ याच दोन बिंदूंच्या मधला काळ आहे. जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर त्या मनुष्याचे अस्तित्व कोणत्याही रूपाने उरत नाही.
२ आ ४ अ. या धारणेतील दोष : मनुष्याच्या अस्तित्वाच्या विषयासंबंधी वरील विचार निराधार आहे. जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर, या दोन्ही स्थितींत त्या मनुष्याचे अस्तित्व कोणत्या ना कोणत्या तरी रूपात विद्यमान असते. पुनर्जन्माची संकल्पना, जी खर्या अर्थाने सत्य असल्याचे आढळून येते, ती हे सिद्ध करते की, मनुष्याचे अस्तित्व जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतरसुद्धा सूक्ष्म रूपात असते. सत्यकार्यवाद सिद्धांत आणि कर्मफल सिद्धांत, हे दोन्हीही पुनर्जन्माच्या सिद्धांताला पुष्टी देतात. मनुष्याचा जीवनकाळ मर्यादित असल्याचे समजल्याने भोगवादी प्रवृत्तीवरील निष्ठा वाढेल आणि मनुष्य सहजतेने स्वाभाविक (नैसर्गिक) प्रवृत्तींशी संलग्न आणि आसक्त राहील. या स्वाभाविक प्रवृत्ती चार आहेत – आहार (भोजन), निद्रा (विश्राम), भय आणि मैथुन (कामवासना). या चारही प्रवृत्ती मनुष्य आणि पशू यांच्यामध्ये समान प्रमाणात आढळतात. जर आपण विचार करून पाहिले, तर लक्षात येते की, मनुष्याची बुद्धी याच प्रवृत्तींशी संबंधित कार्य करण्यात अधिकांशरित्या संलग्न असते. या प्रवृत्तींमध्ये आसक्त राहून मनुष्य आपल्या बुद्धीद्वारे पाशवी वृत्ती अलंकृत करील.
२ आ ५. मनुष्य सामाजिक प्राणी आहे ! : मनुष्य हा समाजात उत्पन्न झाला आहे; म्हणून तो सामाजिक प्राणी आहे. समाजाचे सुरळीतपणे संचालन होण्यासाठी त्याने नैतिक जीवन जगले पाहिजे आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्याने कार्यरत रहायला पाहिजे.
२ आ ५ अ. या धारणेतील दोष : मनुष्याला सामाजिक प्राणी मानणे योग्य आणि व्यावहारिक वाटते; परंतु या विचारावर असलेल्या अधिक निष्ठा त्याच्या स्वतःच्या संपूर्ण विकासामध्ये बाधकसुद्धा आहेत. सामाजिक प्राणी होण्याच्या नात्याने त्याचे केवळ हेच प्रमुख दायित्व राहील की, समाजात राहून चांगला नागरिक व्हावे, समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत रहावे आणि नैतिक मूल्यांचे पालन करत रहावे. त्यामुळे तो सामाजिक कार्यांतच मग्न राहील. तो आपल्या वैयक्तिक जीवनाच्या उन्नतीपासून वंचित राहील आणि ‘पूर्ण विकसित व्यक्तीमत्त्व काय आहे ? मनुष्याची स्वतःची परिपूर्णता कशामध्ये आहे ?’, हेसुद्धा तो प्रगल्भपणे समजून घेणार नाही.
२ आ ६. मनुष्य सर्वश्रेष्ठ प्राणी आहे ! : जगात मनुष्यच सर्वश्रेष्ठ प्राणी आहे आणि मनुष्यदेहातील अत्यंत महत्त्वपूर्ण अन् सर्वोत्तम पदार्थ बुद्धी हा आहे.
२ आ ६ अ. या धारणेतील दोष : बुद्धीला प्रधानता दिल्यामुळे मनुष्य अन्य संवेदनशील भावना, उदा. करुणा, क्षमा, दया, धैर्य, साहस, श्रद्धा इत्यादींच्या महत्त्वाला न्यून करून टाकेल आणि जर त्याचे शुभचिंतक (आई, वडील, बंधू इत्यादी) अधिक बुद्धीमान अन् धनवान नसतील, तर तो त्यांची अवहेलना करू शकतो. बुद्धीला महत्त्व आहे; परंतु जीवनातील पुष्कळशा गोष्टी समजून घेणे बुद्धीपलीकडचे आहे; कारण सांसारिक मानवाची बुद्धी दोषयुक्त आणि मर्यादित क्षमतेची असते. त्यामुळे मनुष्याचा जीवनसंग्राम संकुचित राहील. ‘विकसित जीवन काय असते ?’, याची त्याला जाणीवही होणार नाही. असे म्हणणेसुद्धा योग्य नाही की, जगात मनुष्य सर्वश्रेष्ठ प्राणी आहे; कारण सृष्टीमध्ये देवता मनुष्यापेक्षा श्रेष्ठ असतात. काही पशू-पक्ष्यांची इंद्रिये मनुष्याच्या इंद्रियांपेक्षा अधिक कुशल असतात. मनुष्याच्या शरिरात आत्मा हा सर्वोत्तम पदार्थ आहे. मानवी बुद्धी मनुष्याच्या शरिराच्या आत व्याप्त असलेल्या सूक्ष्म शरिराचा एक भाग आहे, जिचे अस्तित्व आत्मतत्त्वामुळे (आत्म्यामुळे) आहे.
२ आ ७. ‘अन्न, वस्त्र आणि निवारा’ या मनुष्याच्या मूलभूत आवश्यकता आहेत ! : प्रत्येक मनुष्याला खाण्यासाठी अन्न, परिधान करण्यासाठी वस्त्र आणि रहाण्यासाठी निवारा (घर) पाहिजे. या न्यूनतम आवश्यकतांची पूर्ती समाजाची स्थिरता (Stability) आणि विकास यांच्यासाठी आवश्यक आहे.
२ आ ७ अ. या धारणेतील दोष : ही विचारसरणी चुकीची आहे की, मनुष्याच्या भौतिक आवश्यकतांची (अन्न, वस्त्र आणि निवारा यांची) पूर्तता झाल्यावर परस्पर कलहाचे वातावरण निर्माण होणार नाही. याचे कारण हे आहे की, मनुष्यामध्ये असलेली भोग भोगण्याची आणि संग्रह करण्याची वासना सहजासहजी शांत होत नाही. तृष्णा वाढतच जाते. आरंभी मनुष्य लहानसे घर मिळाल्यावर प्रसन्न होतो; परंतु काही वेळानंतर त्याला मोठ्या घरात रहाण्याची इच्छा होऊ लागते. त्यानंतर त्याला बंगला पाहिजे. नंतर बागेतील घर (Farm House) पाहिजे. त्यानंतर अशीच सुखसुविधा मोठ्या शहरात किंवा अन्य रमणीय ठिकाणी पाहिजे इत्यादी. ज्याप्रमाणे घराच्या संदर्भातील मनुष्याच्या इच्छा वाढतच जातात, त्याचप्रमाणे अन्न आणि वस्त्र यांच्या संदर्भातील मनुष्याच्या वासनाही वाढतच जातात अन् त्याला शांती कधीच मिळत नाही. वासना वृद्धिंगत करण्याची मनुष्याची तृष्णाच समाज आणि मानव यांच्या जीवनात परस्पर कलहाचे कारण बनते, जे आजकाल सर्वत्र स्पष्टपणे दिसते अन् ऐकू येते. ‘दोन अत्यंत धनाढ्य कुटुंबे किंवा दोन देश यांमध्ये भयंकर कलह होणे’, ही आजकाल काही विशेष गोष्ट राहिली नाही; म्हणून हा विचार अत्यंत त्रुटीपूर्ण आहे की, अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या न्यूनतम आवश्यकतेची पूर्तता केल्यावर मानवी किंवा सामाजिक समस्या सुटू शकतील.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक
(साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)