ज्येष्ठ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

साप्ताहिक शास्त्रार्थ

‘११.६.२०२१ या दिवसापासून ज्येष्ठ मासाला आरंभ झाला. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. ४.७.२०२१ ते १०.७.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, ग्रीष्मऋतू, ज्येष्ठ मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

सौ. प्राजक्ता जोशी

२ अ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ४.७.२०२१ या दिवशी सकाळी ९.०५ पर्यंत आणि ५.७.२०२१ या दिवशी दुपारी १२.१२ पासून रात्री १०.३१ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. ४.७.२०२१ या दिवशी सकाळी ६.४१ पासून सायंकाळी ७.५६ पर्यंत आणि ७.७.२०२१ या दिवशी उत्तररात्री ३.२१ पासून ८.७.२०२१ या दिवशी सायंकाळी ४.२२ पर्यंत विष्टी करण आहे.

२ इ. योगिनी एकादशी : ज्येष्ठ कृष्ण पक्ष एकादशीला ‘योगिनी एकादशी’ म्हणतात. ५.७.२०२१ या दिवशी योगिनी एकादशी आहे. ‘योगिनी एकादशीच्या दिनी श्रीविष्णूच्या नारायण रूपातील पूजनाने घरात सुखसमृद्धी येते आणि आजार नष्ट होतात’, असे मानले जाते. या एकादशीच्या व्रताने सहस्र ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळते. या दिवशी श्रीविष्णुसहस्रनाम वाचावे.

२ ई. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. ५.७.२०२१ या दिवशी सोमवार असून रात्री १०.३१ पर्यंत एकादशी तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे.

२ उ. सौैम्यवार प्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. बुधवारी येणार्‍या प्रदोष तिथीला ‘बुधप्रदोष’ किंवा ‘सौम्यवार प्रदोष’ म्हणतात. ७.७.२०२१ या दिवशी बुधप्रदोष आहे. शिक्षण, ज्ञानप्राप्ती आणि मनोकामना यांच्या पूर्तीसाठी ‘सौम्यवार प्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. गतजन्मी केलेल्या पापामुळे लागलेल्या विविध प्रकारच्या दोषांचे निवारण करण्यासाठी, तसेच भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सायंकाळी हे व्रत करतात. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे. शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.

२ ऊ. दर्श अमावास्या : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्‍या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) हे ‘दर्श’ संज्ञक मानतात. शुक्रवार, ९.७.२०२१ या दिवशी पहाटे ५.१७ पासून १०.७.२०२१ या दिवशी सकाळी ६.४७ वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१३.६.२०२१)

टीप : घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), एकादशी, दग्ध योग, प्रदोष, शिवरात्री आणि अन्वाधान यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.