नांदेड जिल्ह्यातील मुलींना फूस लावून पळवून नेणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन छेडू ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

असे निवेदन हिंदुत्वनिष्ठांना का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये पुढाकार का घेत नाही ?

नांदेड, २ जुलै (वार्ता.) – ‘जम्मू-काश्मीर येथील शीख समाजातील २ मुलींना बंदुकीचा धाक दाखवून त्यांचे बळजोरीने धर्मांतर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरासह जिल्ह्यात मुसलमान समाजातील धर्मांधांकडून मुलींना फूस लावून बळजोरीने पळवून नेण्यात येत आहे. अशा गंभीर घटना घडत असतांना याची पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची नोंद घेतली जात नाही. तरी पोलिसांनी मुलींना पळवून नेणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी २ जुलै या दिवशी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे. विश्व हिंदु परिषदेच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय सिख संगत आणि हिंदु जागरण संघटनेतील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री कृपालसिंह हबुरीया, गणेश कोळुलवार, गणेश यशवंतकर, अक्षय पाटील भोयर, गजानन सिंह, नागू महाराज, अधिवक्ता जगदीश हाके, दत्ता कुलकर्णी, अधिवक्ता विजयेंद्रसिंह रागी आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, उत्तरप्रदेश राज्यात १ सहस्र हिंदूंना फूस लावून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते. तेथील ‘दहशतवादविरोधी पथका’ने (ए.टी.एस्.) धर्मांतर करणार्‍या धर्मांधांवर गुन्हे नोंद करून बर्‍याच अपप्रवृत्तीच्या लोकांना अटक केली आहे. महाराष्ट्रातही अशा धर्माधांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू करून गुन्हेगारांना शिक्षा करावी, तसेच मुलींना अत्याचारापासून वाचवण्यात यावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.