‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) !

‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या पुणे येथील सनातनच्या ८५ व्या समष्टी संत पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

आज आपण सनातनच्या ८५ व्या समष्टी संत पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पाहूया.                     

(भाग १)

पू. (सौ.) संगीता पाटील

जन्मदिनांक : २९.६.१९५९

वाढदिवस : आषाढ पौर्णिमा (२३ जुलै २०२१) या दिवशी आहे.

संतपदी विराजमान : ३० मार्च २०१९

बालपणापासूनच कष्टप्रद जीवन जगणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील यांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांची देवावरील श्रद्धा मुळीच ढळली नाही. लहानपणी अनेक मंदिरांत भावपूर्ण सेवा केल्याने त्यांची श्रद्धा वृद्धींगत झाली आणि देवावरील त्यांच्या अतूट श्रद्धेमुळे श्री गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या कृपाप्रसादे त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. नंतर सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावरही त्यांना पदोपदी गुरुकृपा अनुभवता आली. त्यांच्या भावबळामुळेच जीवनातील अत्यंत खडतर प्रसंगी, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातही प्रभूला त्यांच्या समवेत यावे लागले. त्यांना डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसूनही गुरुकार्याची तळमळ, भाव आणि गुरूंवरील अढळ श्रद्धा या गुणांच्या बळावर त्यांनी ‘संतपद’ प्राप्त केले. त्यांची गुरूंवरील अपार श्रद्धा आणि गुरुकार्याची तळमळ सर्वच साधकांना साधनेत प्रोत्साहन देणारी आहे.

१. बालपण

१ अ. जन्मानंतर काही दिवसांतच आई-वडिलांचे छत्र हरपणे

‘माझ्या जन्मानंतर ४ दिवसांतच माझ्या आईचे बाळंतपणातील आजारामुळे निधन झाले. नंतर लगेचच ३ मासांनी सकाळी तुळशीला पाणी घालत असतांना अकस्मात् माझ्या वडिलांचे निधन झाले.

१ आ. आजोबांच्या परिचयातील ब्राह्मण कुटुंबाने सांभाळ करणे

१ आ १. वडिलांनी मृत्यूपूर्वी ३० एकर भूमी एका ब्राह्मणाला देऊन त्यांना मुलीचा सांभाळ करण्यास सांगणे : माझ्या आजोबांचे गावातील एका ब्राह्मण व्यक्तीशी घरगुती संबंध होते. निधनापूर्वी वडिलांनी त्या ब्राह्मण व्यक्तीला सांगितले होते, ‘‘तुम्ही आमची ३० एकर भूमी घ्या आणि माझ्या मुलीला सांभाळा. मी पंढरपूरला जातो.’’ वडिलांच्या मृत्यूनंतर त्या ब्राह्मणाने माझा सांभाळ केला.

१ आ २. त्या ब्राह्मण कुटुंबालाच स्वतःचे कुटुंबीय मानणे : त्या ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तींना मी नातेवाइकांसमान मानत असे. मी त्या उभयतांनाच माझे आई-वडील मानत होते. त्यांना २ मुली आणि २ मुलगे होते.

माझ्या वयाच्या एक वर्षापर्यंत त्या ब्राह्मणाने (मी त्यांना ‘बाबा’च म्हणत असे.) माझे संगोपन करण्यासाठी घराजवळील मातंग समाजाच्या एका शेजार्‍याजवळ ठेवले होते आणि नंतर २ वर्षे मला बाल-आश्रमात (अनाथ आश्रमात) ठेवले.

१ आ ३. आईच्या जाचामुळे घरातील सर्व कामे करावी लागत असल्याने शाळेत जायला उशीर होणे : ३ वर्षांनंतर बाबांनी (त्या ब्राह्मण गृहस्थांनी) मला घरी आणले आणि मला शाळेतही घातले. मला माझी ती आई पुष्कळ त्रास द्यायची. मला सकाळी उठल्यावर घरातील केर काढणे, सडा घालणे, गोवर्‍या थापणे, सकाळ-दुपारची भांडी घासणे, कपडे धुणे इत्यादी कामे प्रतिदिन करावी लागत. मला ही सर्व कामे करून शाळेत जायला उशीर होत असे. शाळेची वेळ सकाळी ११ वाजताची असतांना मी मात्र दुपारी १.३० वाजता शाळेत जात असे.

१ आ ४. काही वेळा दिवसातून एकदाच जेवायला मिळणे आणि कधी कधी पुष्कळ भूक लागल्यास जवळच्या मंदिरातील देवीसमोर ठेवलेला प्रसाद खाणे : मी एवढी सर्व कामे करूनही आई मला कधीच वेळेवर जेवायला देत नसे. ती मला अनेकदा जेवण म्हणून भावंडाचे उरलेले उष्टे अन्न द्यायची. मला कधी कधी दिवसातून एकदाच तेही थोडेसेच खायला मिळत असे. मला पुष्कळ भूक लागल्यास मी जवळच्या दुर्गादेवीच्या मंदिरात देवीसमोर ठेवलेला प्रसाद (केळे, नारळ, नैवेद्य इत्यादी) खाऊन भूक भागवत असे.

अशा स्थितीतही माझे सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले.

२. बाबांची शेगावच्या श्री गजानन महाराज मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती होणे

२ अ. घरकामामुळे आणि मंदिरात सेवा करावी लागत असल्याने शाळेत जाणे बंद होणे : नंतर माझ्या बाबांची शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे ते कुटुंबीय पांढरकवडा या आमच्या गावातून शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिराच्या परिसरात रहायला आले. त्यांनी मलाही त्यांच्या समवेत शेगावला नेले. ते त्या मंदिरात ६ वर्षे पुजारी होते. तेथे मी घरकाम, तसेच मंदिरातील स्वच्छता करणे, पूजेची उपकरणे धुणे आदी सेवा करत असे. तेव्हापासून माझी शाळा सुटली.

२ आ. श्री गजानन महाराजांच्या मंदिरात सेवा करतांना आलेल्या अनुभूती

२ आ १. गाभार्‍यात गेल्यावर ‘श्री गजानन महाराज चालत येत आहेत’, असे जाणवणे : मी तेथेच रहात असल्यामुळे मला मंदिरात गाभार्‍यापर्यंत जाण्याची मुभा होती. मी पूजेची उपकरणे धुऊन महाराजांच्या मूर्तीजवळ जात असतांना ‘श्री गजानन महाराज चालत येत आहेत’, असे मला जाणवायचे.

२ आ २. शिक्षा म्हणून दिवसभर आईने खायला न देणे, रात्री उपाशी झोपल्यावर श्री गजानन महाराजांनी हाका मारून उठवणे आणि ताटात नैवेद्य ठेवलेला दिसणे : एके दिवशी मी सकाळची भांडी घासली नाहीत; म्हणून आईने मला पुष्कळ मारले. तिने मला दिवसभर काही खायला दिले नाही. त्या रात्री मी उपाशी झोपले होते. ‘श्री गजानन महाराजांनी मला ३ वेळा हाक मारली आणि ‘तेथे नैवेद्य ठेवला आहे. उठून खा’, असे सांगितल्याचे जाणवले. मी उठून पाहिल्यावर मला तेथे ताटात जेवण आणि लाडू असे पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवलेले दिसले.

२ आ ३. आईने रागावून घराजवळच्या विहिरीत ढकलून देणे, त्या वेळी श्री गजानन महाराजांनी मुलाच्या रूपात येऊन विहिरीतून बाहेर काढणे : एके दिवशी मी आईला बाजारातून गूळ आणून दिला नाही; म्हणून आईने रागावून मला घराजवळच्या विहिरीत ढकलून दिले. तेव्हा अकस्मात् तेथे ७ वर्षांचा एक मुलगा आला. त्याने मला ओढून वर काढले. नंतर मी त्या मुलाला शोधण्याचे पुष्कळ प्रयत्न करूनही तो सापडला नाही. (त्या वेळी ‘श्री गजानन महाराजच त्या मुलाच्या रूपात मला वाचवण्यासाठी आले होते’, असे मला जाणवले.)

अशा प्रकारे देवाने मला कठीण प्रसंगांत पुष्कळ साहाय्य केले. त्यामुळे माझा देवावरील विश्वास दृढ झाला. त्यामुळे ‘माझे चांगलेच होणार आहे’, या श्रद्धेने मी आतापर्यंत जीवन जगले.

२ आ ४. मंदिराच्या भिंतीतून ‘पुढे तुला महान माऊली मिळणार आहे’, असा आवाज ऐकू येणे आणि प्रत्यक्षातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखी महान आणि दयाळू गुरुमाऊली भेटणे : मला बर्‍याच वेळा मंदिराच्या भिंतीतून ‘पुढे तुला एक महान माऊली मिळणार आहे’, असा आवाज ऐकू येत असे. त्याप्रमाणे मला आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखी महान आणि दयाळू गुरुमाऊली भेटली आहे. (क्रमश:)

– (पू.) सौ. संगीता पाटील, भोसरी, पुणे. (२४.३.२०१९)

साधकांनो भाववृद्धीसाठी प्रयत्न करा !

१. साधकांनी भाववृद्धीसाठी प्रयत्न करावेत. आपल्यात भाववृद्धी झाल्यावर देव लगेच आपल्या साहाय्याला येतो. एखाद्या दगडावर दिवसभर पाणी ओतत राहिले, तरी दगड कोरडाच रहातो, तसे दगडासारखे मन होऊ देऊ नका.

२. भाववृद्धीसाठी मानस नमस्कार आणि मानसपूजा करा. तुमच्या मनात श्रद्धेचे स्थान निर्माण करा. ५ रुपयांची फुले आणून गुरुदेवांच्या छायाचित्राला वहाण्याऐवजी तुम्ही मनाचे फूल वहा.  या फुलात पुष्कळ सुगंध आहे.

– (पू.) सौ. संगीता पाटील  (२४.३.२०१९)

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि त्यांच्या अनुभूतीच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संतांनी स्वत:चे साधनापूर्व जीवन, साधनाप्रवास, त्यांनी साधक आणि जिज्ञासू यांना केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन इत्यादी सर्व लिखाण शक्य तितक्या लवकर पाठवावे (यापूर्वी जे लिखाण पाठवले असेल, ते कृपया पुन्हा पाठवू नये.), तसेच वाचक आणि साधक यांनी त्यांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected]

पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग २ पहाण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/492258.html