पुणे – येथील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत मृतदेहांचे अवैधरित्या दफन केले जात आहे. देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील मुसलमान कबरस्तानशेजारील जागेतही अशाच पद्धतीने कागदपत्रांविना उघडपणे मृतदेहांचे दफन केले जात आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी, तसेच देहूरोड आणि परिसरातील काही समाजबांधवांना स्वतंत्र दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड, मावळचे तहसीलदार यांच्यासह संबंधित शासकीय विभागांच्या प्रमुखांना निवेदन पाठवले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याजवळ काही लोक विनाअनुमती, मृत व्यक्तीची कोणतीही शासकीय नोंद न करता, तसेच स्मशान दाखला नसतांनाही दफनविधी करत आहेत. हा प्रकार मी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहिला आहे. रात्रीच्या वेळी दफनविधी चालू असल्याने हे संशयास्पद वाटत आहे.
२. कोरोना संकटाच्या परिस्थितीत कोणत्याही कागदपत्रांविना किंवा मृत्यूचे कारण दाखल्याविना मृतदेहाचे दफन करणे गंभीर आहे.
३. मृतदेहांचे दफन कायदेशीर पद्धतीने व्हावे, यासाठी विशिष्ट समाजघटकांना दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांना कायदेशीररित्या दफनविधी करता यावे, यासाठी योग्य कागदपत्रे, वैद्यकीय प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे मृत्यूची अधिकृत नोंद होण्यास साहाय्य होईल. यासह भविष्यात गंभीर गुन्हे घडण्यास आळा बसेल.