भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका जुलै २०२२ मध्ये कार्यान्वित होणार ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (मध्यभागी) युद्धनौकेवरील अधिकाऱ्यांसोबत

कोचीन (केरळ) – भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका पुढील वर्षी जुलै मासामध्ये कार्यान्वित होईल, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे दिली. सिंह यांनी कोचीन बंदराजवळ अर्नाकुलम् येथे भेट दिल्यानंतर या युद्धनौकेची पहाणी केली.

सिंह या वेळी म्हणाले की, भारतासाठी ही युद्धनौका अभिमानास्पद असून ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. पुढील वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असतांना ही युद्धनौका बनणे एक महत्त्वाची गोष्ट आहे. या युद्धनौकेची मारक क्षमता मोठी असून ती वैविध्यपूर्ण आहे. भारताच्या संरक्षण क्षमतेत त्यामुळे भरच पडणार आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास ही युद्धनौका सज्ज असेल.