कोल्हापूर, २५ जून (वार्ता.) – विमानतळ विस्तारीकरणामध्ये गड-मुडशिंगी, उंचगाव, सरनोबतवाडी, नेर्ली, तामगांवा, गोकुळ शिरगाव अशा गावांची, त्या गावातील वैयक्तिक, तसेच ग्रामपंचायतीच्या कह्यात असलेली ७५० एकर भूमी संपादन करण्यात आली आहे. तरी उजळाईवाडी (कोल्हापूर) येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या ठिकाणी तेथील स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार देण्यात यावा, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपादित होणार्या नवीन ६४ एकर भूमीत १०० वर्षांपासून लक्ष्मीवाडी (मातंग) वसाहत आहे. तेथील नागरिकांचे पुनर्वसन करावे आणि त्यांच्या भूमीचा मोबदला मिळावा. विमान विस्तारिकरणामध्ये परत मुडशिंगी गावातील ६५ एकर भूमी संपादित होणार आहे. तशी मोजणीप्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरी तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन सध्याच्या चालू बाजारभावाच्या पाचपट दर मिळाला पाहिजे. या मागण्यांचा संबंधित विभागाने गांभीर्याने विचार करून न्याय द्यावा; अन्यथा विमानतळावरील प्रवाशांना रोखण्यात येईल. या वेळी शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख राजू यादव, सर्वश्री पोपट दांगट, विनोद खोत, विराज पाटील, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव उपस्थित होते.