सांगली, २४ जून (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापूर आणि कोरोना काळात लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे. सांगलीत आलेल्या महापुरात अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी भोजनासह अन्यधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे साहाय्य केले. असे असतांना प्रतिव्यक्ती ३०० ते ३५० रुपये भोजनाची देयके दाखवण्यात आले. यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कोरोना काळात आर्थिक अडचण असतांनाही ‘कन्टेंटमेंट झोन’च्या नावाखाली पत्रे घालण्यासाठी १ कोटी ४१ लाख रुपयांचे देयक देण्यात आले. तरी सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे आणि सांगली जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी निवेदनाद्वारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.