शस्त्राचा धाक दाखवून अल्पवयीन मुलांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

मुलगी ७ मासाची गर्भवती

पालकांनी मुलांवर संस्कार करणे आणि ती काय करतात याकडे लक्ष ठेवणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !


सातारा, २० जून (वार्ता.) – जावळी तालुक्यातील १४ वर्षीय मुलीवर शस्त्राचा धाक दाखवून तिच्याच वर्गातील २ अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संबंधित मुलगी ७ मासाची गर्भवती असल्याची माहिती आरोग्य तपासणीमध्ये समोर आली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच मुलांना सातारा येथील बालसुधारगृहामध्ये भरती करण्यात आले आहे.

१४ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबियांसमवेत शेतामध्ये रहात होती. घरात कुणी नाही हे पाहून मुलांनी तिला चाकू दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच याचे भ्रमणभाषवर चित्रीकरण केले. घरात कुणी नसल्याचा अपलाभ उठवत अल्पवयीन मुलीवर मुलांनी १ मास सतत बलात्कार केला, असे मुलीने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेल्यानंतर तिच्या पोटामध्ये ७ मासाचा गर्भ असल्याचे लक्षात आले. कुटुंबियांनी याविषयी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. तक्रारीनुसार तपास केला असता संबंधित अल्पवयीन मुले दोषी आढळून आली.