हिंदु राष्ट्राची आध्यात्मिक स्तरावर मांडणी करून त्याचा संकल्प करणारे राष्ट्रोद्धारक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

अद्वितीय घटनांचा उच्चार त्या घडण्यापूर्वीच होतो. वाल्मिकी रामायण रचल्यानंतर ऐतिहासिक ‘रामराज्य’ पृथ्वीतलावर अवतरले. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापूर्वी झालेल्या दैवी आकाशवाणीनंतर श्रीकृष्णाने धर्मसंस्थापना केली आणि पुनश्च पृथ्वीवर ‘धर्मराज्य’ अवतरले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वप्रथम वर्ष १९९८ मध्ये ‘भारतात वर्ष २०२३ मध्ये ‘ईश्वरी राज्य’ म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित होईल’, असा विचार द्रष्टेपणाने मांडला होता. या विचारांत आगामी काळातील आदर्श राष्ट्ररचनेचे, म्हणजेच धर्मसंस्थापनेचे बीज रोवलेले आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना ‘हिंदु राष्ट्रा’विषयी सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण काळाची पावले ओळखणार्‍या संतांना त्या उज्ज्वल भविष्याची चाहूल लागली आहे आणि आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, ही आपली साधना आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘हिंदु राष्ट्रा’ची आध्यात्मिक दृष्टीकोनातून मांडणी केली आहे. विश्वकल्याणाची व्यापक आध्यात्मिक शिकवण देणार्‍या भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे, ही आध्यात्मिक प्रक्रिया आहे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले केवळ भारतातील हिंदूंची संघटना करून इतरांप्रमाणे सत्ता मिळवण्याचा आणि त्याद्वारे हिंदु राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत नसून अखिल विश्वातील प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे, सर्व जिवांची उन्नती होऊन त्यांना ईश्वरप्राप्ती व्हावी, या उद्देशाने त्यांनी हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडली आहे.

आता पृथ्वीवर जन्माला येत असलेली दैवी बालके हिंदु राष्ट्राची घडी बसवतील !

काही दैवी बालके उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला येत आहेत. त्यांची आध्यात्मिक पातळी मूलतःच चांगली आहे. त्यांची जाण, प्रगल्भता, हुशारी, कलात्मतेची जाण, तत्त्वनिष्ठता, देव आणि साधना यांची ओढ हे पाहिल्यावर थक्क व्हायला होते. ही दैवी बालके पुढे धर्मनिष्ठ म्हणजेच तत्त्वनिष्ठ कारभार असणार्‍या हिंदु राष्ट्राची घडी बसवणार आहेत !