भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती !

भारतीय वंशाचे सत्या नाडेला

नवी देहली – ‘मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन’ या जगातील सर्वांत मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्या आस्थापनाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ५३ वर्षीय नाडेला यांची वर्ष २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) पदी नेमणूक करण्यात आली होती. आस्थापनाला त्यांच्या नेतृत्वामुळे मोठी प्रगती करता आल्यामुळे त्यांना त्याचे आता बक्षीसच मिळाले आहे. नाडेला यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सचे मूल्य ७ पटींहून अधिक वाढले.


सत्या नाडेला यांचा जन्म भाग्यनगरमध्ये झाला आणि प्रारंभीचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले. त्यानंतर त्यांनी मनिपाल विद्यापिठातून आयटी अभियांत्रिकीची पदवी घेतली. तसेच अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापिठातून ‘मास्टर ऑफ सायन्स’ (अभियांत्रिकीतील पदव्युत्तर शिक्षण) आणि शिकागो विद्यापिठातून ‘एम्बीए’ पूर्ण केले. वर्ष १९९२ मध्ये ते मायक्रोसॉफ्टमध्ये कामाला लागले.