उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मोक्षदा पाटील हि आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
रामनाथी आश्रमातील कु. मोक्षदा पाटील हिचा ज्येष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी (१७.६.२०२१) या दिवशी ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. (‘वर्ष २०१९ मध्ये कु. मोक्षदाची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के होती.’ – संकलक)
कु. मोक्षदा हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
प्रेमळ, व्यष्टी साधनेचे गांभीर्य आणि परात्पर गुरुदेवांप्रती भाव असलेली कु. मोक्षदा पाटील (वय ८ वर्षे) !१. प्रेमळ‘कु. मोक्षदा प्रेमळ आहे. मी बाहेर जातांना ती माझा हात धरून मला नेते. ‘आजीची त्वचा किती मऊमऊ आहे’, असे म्हणत ती सतत माझा हात हातात घेते. ती खोलीत सर्वांशी प्रेमाने वागते. २. व्यवस्थितपणाइतक्या लहान वयात तिला पुष्कळ कळते. तिची आई लवकर उठून सेवेला जाते. तेव्हा ती झोपलेली असते; पण एवढी लहान असूनही ती स्वतःचे अंथरूण-पांघरूण घडी घालून व्यवस्थित ठेवते. मी घालायला गेले, तर मला घडी घालू देत नाही. ३. स्वावलंबीतिचा स्वतःची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न असतो. इतक्या लहान वयातही ती स्वावलंबी आहे. ४. इतरांचा विचार करणेतिला देवाची गाणी पुष्कळ आवडतात आणि मलाही आवडतात; म्हणून ती नेहमी भ्रमणभाषमधून मला गाणी ऐकवते. ‘मला ऐकायला न्यून येते’, याची तिला जाणीव आहे; म्हणून माझ्याजवळ भ्रमणभाष ठेवायला हवा, हे तिच्या लक्षात येते. आई दमलेली असेल; म्हणून आई रात्री स्वयंपाकघरातून येण्यापूर्वी मोक्षदा दोघींचे अंथरूण घालून ठेवते. ५. व्यष्टी साधनेचे गांभीर्यतिच्यात व्यष्टी साधनेचे गांभीर्य आहे. तिची अंघोळ झाली की, ती नामजप करत असते. तसेच मंत्रपठणालाही जाते. ६. परात्पर गुरुदेवांप्रती भावप.पू. गुरुदेवांप्रती तिच्या मनात अपार भाव आणि प्रेम आहे. तिच्या बोलण्यातून ते सतत जाणवत असते. तिला सनातन संस्थेविषयी पुष्कळ प्रेम आहे. ७. ‘दैवी गुण असलेल्या मुलीचा सहवास असल्याने आनंद वाटून हे देवाचे नियोजन आहे’, असे वाटणेतिच्यामध्ये प्रेमळपणा, हुशारी, दुसर्याचा आदर करणे, तत्परता हे गुण एवढ्या लहान वयात आहेत. तिच्यातील एवढे गुण पाहून ‘ती दैवी बालक आहे’, हे मला जाणवते. अशी मुलगी माझ्या सहवासात आहे, त्याचा मला पुष्कळ आनंद वाटतो. ‘हे देवाचे नियोजन आहे’, असेच मला वाटते. ‘परात्पर गुरु डॉक्टर, तुम्हाला अपेक्षित अशी कु. मोक्षदाची उत्तरोत्तर प्रगती होवो’, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करते.’ – पू. (श्रीमती) निर्मला दाते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०२१) |
१. नीटनेटकेपणा
‘कु. मोक्षदा स्वतःच्या आणि माझ्या काही कपड्यांच्या घड्या घालतांना एक हात कपड्यांवर इस्त्रीसारखा फिरवते. ती सर्व कपड्यांचा व्यवस्थित संच करून ठेवते. त्यामुळे सकाळी कपडे वेळेवर मिळतात. तिला कपाटाचे खण अव्यवस्थित झालेले आवडत नाही. ती खणात वस्तूंची उंची आणि क्रमवारी बघून व्यवस्थित लावते. एखाद्या वेळी तिच्या बाबांनी पटल किंवा पलंगाच्या खणात वस्तू नीट ठेवली नाही, तर ती लगेच जाणीव करून देत सांगते, ‘‘बाबा, देवाला असे आवडत नाही.’’
२. आश्रमजीवनाशी समरस होणे
आम्ही आश्रमात रहायला आल्यापासून तिच्यात पुष्कळ पालट जाणवत आहे. सर्व साधकांशी तिने स्वतःहून ओळख करून घेतली. आश्रमात कुणी साधक किंवा साधिका नवीन (स्वयंपाकघरात) आल्यावर ती स्वतःहून बोलते आणि त्यांच्याशी जवळीक वाढवते. मोक्षदा आश्रमातील साधकांना ‘मामा’ आणि साधिकांना ‘मावशी’ म्हणते. ‘मामा आणि मावशी म्हटल्यावर पुष्कळ जवळीक वाटते’, असे तिला वाटते.
३. आवड-निवड अल्प होणे
मोक्षदाला जेवणात कुठलाही पदार्थ दिल्यास ती भावपूर्ण आणि आनंदाने खाते. यापूर्वी भाज्यांमध्ये तिच्या पुष्कळ आवडी निवडी होत्या; पण आता ती मला सांगते, ‘‘आई, आपल्याला एवढ्या आपत्काळात परात्पर गुरु डॉक्टर काय काय देतात !’’ तिला याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.
४. सात्त्विक गोष्टींची आवड
तिला भजने आणि देवाची गाणी म्हणायला पुष्कळ आवडतात. ती सतत भजने गुणगुणत असते. तिला नृत्य करायलाही पुष्कळ आवडते. तिला सुती कपडेच वापरायला आवडतात. ती प्रतिदिन केसांना तेल लावायला सांगते. जेणेकरून ते विस्कटायला नको. वेणी घालतांना स्वतःहून सांगते, ‘‘आई, वेणी पूर्ण घालून केस मोकळे न सोडता तिची गुंडाळी कर.’’ (‘केस मोकळे सोडल्याने केसांतून त्रासदायक शक्ती ग्रहण होते.’ – संकलक)
५. व्यष्टी साधनेचे प्रयत्न
मोक्षदा मला प्रतिदिन चुका विचारते. तिच्या लक्षात आल्यास ती मला दिवसभरातील चुका त्या त्या वेळी सांगते आणि त्यामागील स्वभावदोष विचारून त्यावर प्रायश्चित्त घेते. तिने फलकावर चूक लिहिल्यावर तिला पुष्कळ हलकेपणा जाणवतो. नामजपादी उपायांना बसल्यावर ती नामजप लिहून काढते. नामजप करतांना मोक्षदा पुढील प्रार्थना करते, ‘देवा, ‘नामजप कसा करायचा ?’, हे तूच मला शिकवत आहेस. तूच माझ्याकडून प्रतिदिन नामजप भावपूर्ण आणि परिपूर्ण करवून घे.’
६. नातेवाइकांशी बोलतांना त्यांना नामजपाची आठवण करून देणे
मोक्षदा नातेवाइकांशी भ्रमणभाषवर बोलतांना मायेतील न बोलता साधनेच्या दृष्टीने बोलते. ती सर्वांना नामजपाची आठवण करून देते.
७. संतांप्रती भाव असणे
आता आम्ही रामनाथी आश्रमात पू. दातेआजींच्या खोलीत रहातो. तिला संतांच्या समवेत रहायला मिळाले, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते. खाऊ खायला काढल्यावर ती विचार करते की, पू. दातेआजींना यातील काय आवडेल ? त्या यातील काय खाऊ शकतात, हे ती बघते आणि त्यांना दिल्यावरच ती खायला आरंभ करते.
८. पू. दातेआजींसारख्या संतांचा सहवास लाभल्याने कु. मोक्षदाचे वागणे आणि बोलणे यांत झालेले पालट
जेव्हापासून आम्ही पू. आजींच्या समवेत रहात आहोत, तेव्हापासून तिच्यात पुष्कळ पालट जाणवतो. तिच्या तोंडवळ्यावर पुष्कळ चैतन्य जाणवते. तिच्या वागण्यात आणि बोलण्यातही पालट झाला आहे. पू. आजींनी सेवा सांगितल्यावर ती लगेच तत्परतेने करते.
९. पू. दातेआजींच्या सहवासात आलेल्या अनुभूती
अ. एके दिवशी पू. दातेआजींना खाली भोजनकक्षात घेऊन जातांना मोक्षदाने त्यांचा हात धरला होता. त्या वेळी तिला असे वाटले की, तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हात धरला आहे.
आ. एके दिवशी तिने स्नानगृहात अंघोळ केल्यावर तिला अंघोळीपूर्वी आणि नंतर मोगर्याचा सुगंध येत होता.
१०. मोक्षदाला कविता करायलाही पुष्कळ आवडणे
कुणाचा वाढदिवस असला की, ती त्यांचे गुण पाहून लगेच कवितेच्या रूपात लिहिते. पू. आजींच्या खोलीत असतांना तिला कृष्णाप्रती सुचलेली कविता येथे दिली आहे.
१० अ. श्रीकृष्णा श्रीकृष्णा, माझी हाक ऐक ना ।
श्रीकृष्णा श्रीकृष्णा, माझी हाक ऐक ना ।
कृष्णा, एकदा मला भेट देऊन जा ना ।। १ ।।
तुझे रूप दिसले की, माझे मन भरून जाते ।
हे श्रीकृष्णा, मला भेटायला ये ना ।
श्रीकृष्णा, कधी येशील तू ।
तुझी वाट पाहूनी मी दमले ।। २ ।।
हे लिहितांना ती खोलीत असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे बघत लिहीत होती. तेव्हा मलाही तिच्यातील भाव जाणवत होता.
१० आ. हे श्रीकृष्णा, हा आश्रम म्हणजे तुझे गोकुळ ।
एकदा आम्ही दोघी नामजपाला बसलो होतो. तेव्हा तिने कृष्णाप्रती भाव कवितेच्या ओळीत लिहिला आहे.
कृष्णा, दिसले तुझे रूप, भरले माझे मन ।
हे श्रीकृष्णा, हा आश्रम म्हणजे तुझे गोकुळ ।। १ ।।
या आश्रमात रहायला मला खूप आवडते ।
कारण इथे मला सगळे साधना शिकवत आहेत ।। २ ।।
११. कृतज्ञता
‘हे कृष्णा, आम्ही मोक्षदाला सांगितल्यावर ती प्रार्थना किंवा नामजप करायची; पण आता काही कालावधीपासून ती स्वतःहून प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप करते. मोक्षदा लहान असूनही आम्हाला तिच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते. हे श्रीकृष्णा, तू आम्हाला मोक्षदासारखी गुणी आणि दैवी बालिका दिल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करते.’
‘तिची अजून जलद गतीने आध्यात्मिक स्तरावर प्रगती होवो आणि ती अखंड गुरुचरणी राहो, अशी प्रार्थना करते.’
-सौ. रूपाली पाटील (कु. मोक्षदाची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०२१)
|