शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक !

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक अपहाराचे प्रकरण

विवेक पाटील

मुंबई – कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५२९ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहाराच्या प्रकरणी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांना १५ जूनला अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पनवेल येथून अटक केली. या घोटाळ्यात विवेक पाटील हे मुख्य आरोपी असून त्यांच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

१. कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने सहकार आयुक्तांना अन्वेषणाचा आदेश दिला होता. यामध्ये ६३ कर्ज खात्यांमध्ये ५१२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते.

२. या बँकेतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी ‘पनवेल संघर्ष समिती’चे अध्यक्ष कांतीलाल यांनी वर्ष २०२० मध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडे लेखी तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीमध्ये विवेक पाटील यांच्यावर कारवाई करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

३. तक्रारीमध्ये म्हटले होते की, कर्नाळा नागरी सहकारी बँकेत ५० सहस्र ६८९ ठेवीदारांच्या ५२९ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. शेकापच्या नेत्यांनी स्वत:च्या व्यवसायासाठी बँकेतून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अनधिकृतपणे घेतल्या. लेखापरीक्षणामध्ये हा प्रकार दडपण्यात आला.