भारताला कोरोना काळात साहाय्य करण्याच्या नावाखाली पाकिस्तानी संस्थांकडून कोट्यवधी रुपये गोळा !

गोळा केलेले पैसे भारताच्या विरोधात आतंकवादी कारवायांसाठी खर्च होण्याची शक्यता !

जसा पाक तशा त्याच्या संस्था ! भारत सरकारने जागतिक स्तरावर याविषयी आवाज उठवला पाहिजे आणि अशा संस्थांवर कारवाई करून गोळा केलेले पैसे जप्त करून ते भारताला दिले पाहिजे, अशी मागणी केली पाहिजे !

नवी देहली – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात हाहा:कार माजला असतांना भारताला साहाय्य करण्याच्या नावाखाली अमेरिका आणि पाक येथील काही पाकिस्तानी सेवाभावी संस्थांनी कोट्यवधी रुपये गोळा केले. असे असले, तरी हे पैसे साहाय्य म्हणून खर्च करण्याऐवजी ते भारताविरोधात आतंकवादी कारवायांसाठी वापरले जाण्याची भीती ‘डिसइन्फो लॅब’च्या अहवालामधून व्यक्त करण्यात आली आहे.

१. ‘डिसइन्फो लॅब’च्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानी बिगर अनुदानित सेवाभावी संस्थांनी ‘हेल्प इंडिया ब्रीद’ म्हणजेच ‘भारताला कोरोना काळात श्‍वास घेण्यासाठी साहाय्य करा’, असे आवाहन करत निधी गोळा केला होता. भारतामध्ये ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर्स आणि लस यांसमवेत इतर आरोग्य सुविधा देण्यासाठी साहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पाकिस्तानमधील अनेकांनी या सेवाभावी संस्थांच्या अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात साहाय्य केले होते.

२. या सेवाभावी संस्थांचे पाकिस्तानी सैन्यासमवेत चांगले संबंध असल्याचाही उल्लेख या अहवालात आहे. पाकिस्तानी सैन्याच्या सांगण्यानुसार या संस्था काम करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हेच कोट्यवधी रुपये भारताविरोधात आतंकवादी कारवायांसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे.

३. पैसे गोळा करणार्‍या संस्थांमध्ये ‘इमाना’ म्हणजेच ‘इस्लामिक मेडिकल असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संस्थेचाही समावेश होता. या अभियानामध्ये नक्की किती पैसे साहाय्य म्हणून लोकांनी दिले, याची सविस्तर आकडेवारी संस्थेने दिलेली नाही. तसेच ‘हे पैसे कुठे आणि कसे खर्च केले जात आहेत किंवा केले जाणार आहेत ?’ यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही. हा इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा दावा डिसइन्फो लॅबने केला आहे. वर्ष १९६७ मध्ये स्थापना झालेल्या ‘इमाना’चे कुठेही कार्यालय नाही आणि संस्थेकडून कुठेही कोणतेही काम केले जात नाही, असा दावाही अहवालात करण्यात आला आहे.