डॉक्टरांवर आक्रमणे नकोत !

मनुष्याला सर्वांत प्रिय गोष्ट म्हणजे स्वतःचा जीव ! वैद्य किंवा आधुनिक वैद्य (डॉक्टर) हे मनुष्याला झालेल्या आजारातून बाहेर काढण्याचे महान कार्य करत असतात. कोरोना विषाणूच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढण्यामध्ये वैद्य किंवा आधुनिक वैद्य सर्वांत पुढे आहेत. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र लढाई आणि संघर्ष चालू आहे. असे असतांनाही काही आधुनिक वैद्यांवर आक्रमणे झाली आणि होत आहेत. डॉक्टरांवर होणारी ही आक्रमणे चिंताजनक आहेत; कारण अशा प्रसंगातून डॉक्टरांचा आत्मविश्वास अल्प होऊ शकतो.

शासकीय रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि आरोग्यसेवक स्वत:सह कुटुंबाला विसरून कोरोनाबाधितांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. ते दिवसभर विषाणूच्या विळख्यात असल्याने बाहेर पडल्यावर आपल्यामुळे कुटुंबीय किंवा मित्र यांना संसर्ग तर होणार नाही ना, या विचाराची टांगती तलवार डॉक्टरांच्या डोक्यावर  सतत असते. स्वत:ची लहान मुले, पत्नी, वृद्ध आईवडील यांच्यापासून अलिप्तता ठेवणे अपरिहार्य होते. तरुण आधुनिक वैद्यांनी खासगी आयुष्यापेक्षा कोरोना लढाईला महत्त्व दिले आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांचे कुटुंबच बाधित झाले, तर त्यांच्या परिचयातील मित्रांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णसेवेसाठी आधुनिक वैद्यांनी केलेला हा त्यागच आहे. असे असतांना सामान्य नागरिकांनी आणि सरकारने त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे अपेक्षित आहे. भागवत पुराणात श्रीविष्णूचा अवतार म्हणून धन्वन्तरिचा उल्लेख आहे. भगवान धन्वन्तरि जगत्कल्याण आणि सर्वांना आजारांपासून मुक्त करणे यांसाठी अवतरले. त्यामुळे ‘डॉक्टरांच्या माध्यमातून धन्वन्तरिदेवाचेच तत्त्व कार्यरत आहे’, असा विचार ठेवून डॉक्टरांविषयी समाजाने आदर ठेवायला हवा. काही डॉक्टर मंडळी उपचाराच्या वेळी रुग्णांची आर्थिक लूट करतात. असे असले तरी त्यांच्यावर आक्रमणे करण्यापेक्षा त्यांना वैध मार्गाने कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. डॉक्टरांप्रती कृतज्ञतेची जाणीव आणि लूट करणार्‍यांविरोधात संयत भूमिका ठेवणे आवश्यक आहे !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे