मराठीची गळचेपी !

नुकताच मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा (समृद्ध भाषा) देण्यात आला, तरी राज्यात मराठी भाषेला हाल सोसावे लागत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये मुंब्र्यात एका मराठी माणसावर अन्याय झाला. मुसलमान फळविक्रेत्यांनी मराठी माणसाला मारहाण करून त्याला क्षमा मागायला लावली. तेव्हा मराठी तरुणाने ‘तुम्ही महाराष्ट्रात रहाता, तर मराठी बोलले पाहिजे’, असा आग्रह धरला. तेव्हा फळविक्रेत्यांनी ‘आम्ही हिंदीतच बोलणार’, असे म्हणत एकत्र येऊन मराठी तरुणाला मारहाण केली. पुण्यामध्ये ‘एअरटेल’च्या आस्थापनामध्ये शाहबाज या ‘टीम लिडर’ने (गट प्रमुखाने) आस्थापनांतील इतर कर्मचार्‍यांना हिंदी बोलण्याची सक्ती करणे, मराठी बोलल्यास कामावरून काढण्याची धमकी देणे, हिंदु सणावारांना सुट्टी न देणे, असा प्रकार केला. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला धडा शिकवला. कल्याणमध्येही असाच काहीसा प्रकार घडला. मराठी माणसांविरोधात षड्यंत्र रचणे, मराठी भाषिकांचा अवमान आणि अपमान करणे, हे प्रकार सध्या वाढतच चालले आहेत. याला ठोस प्रत्युत्तर न देता राजकीय लाभ उठवण्याच्या दृष्टीने त्याचे सोयीस्कररित्या राजकारणच केले जाते. महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यांतील लोक कामासाठी येतात आणि कायमस्वरूपी रहातातही. तरीही त्यांच्यात असलेला मराठीद्वेष अशा वेळी प्रकर्षाने दिसून येतो.

प्रत्येक राज्याच्या मातृभाषांनाही त्या त्या ठिकाणी तेवढेच महत्त्व दिले जाते. प्रत्येक राज्यही त्यासंदर्भात तितकेच संवेदनशील असते. भाषेच्या सूत्राकडे पहाण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोनही गंभीर असतो. प्रत्येक जण आपापली मातृभाषा जिवापाड जपत असतो. मराठीच्या संदर्भात मात्र हा अपवाद ठरत आहे. महाराष्ट्रातील मराठीजनांचेच आपल्या मातृभाषेवर किती प्रेम आहे ? हे पडताळण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे. मातृभाषेला रसातळाला नेणारा मराठी माणूसच आहे. त्याची मराठीप्रतीची आत्मीयता अल्प असल्याने मराठीविषयी अमराठींकडून उलटसुलट विधाने केली जातात. मराठीला न्यून लेखले जाते. खरेतर कोणतीही भाषा ही लोकांना जोडणारी असते, तोडणारी नाही; पण ‘मराठी’मुळे महाराष्ट्रात वाद निर्माण होणे अयोग्य आहे. मराठीची अस्मिता आणि बाणा जपल्यास अशा प्रकारांना आळा बसेल. महाराष्ट्रामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि खासगी आस्थापने अशा ठिकाणी मराठी भाषा किती प्रमाणात बोलली जाते ? हे पहायला हवे. मराठी भाषेसाठी देशपातळीवर मोठे केंद्र (विद्यापीठ) निर्माण करण्याची आवश्यकता आहे. अभिजात दर्जा मिळालेली भाषा खर्‍या अर्थाने सक्षम आणि समृद्ध होण्यासाठी प्रत्येकानेच पाऊल उचलायला हवे. महाराष्ट्रात कुणीही मराठीचा अवमान करण्याचे धाडसच करू नये, असा धाक मराठीजनांनी निर्माण केल्यासच भाषारक्षण करणे शक्य होईल !

– श्री. अमोल चोथे, पुणे