
भ्रष्टाचार ही देशाला लागलेली महाभयंकर कीड आहे. सरकारी कार्यालयांत तो विशेषकरून दिसून येतो. आजतागायत अनेक सरकारे आली आणि गेली; मात्र भ्रष्टाचाराच्या उच्चाटन करण्यासाठी कुणीही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. शिपायापासून मोठ्या अधिकार्यांपर्यंत भ्रष्टाचाराची पाळेमुळे पसरलेली असतात. त्यामुळे कारवाई तरी कुणावर करायची ? भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. या विभागाकडून प्रतिवर्षी भ्रष्टाचाराची शेकडो प्रकरणे उघडकीस आणली जातात; मात्र त्यांपैकी किती प्रकरणात कारवाई होते ? ज्या अधिकार्यांना लाच घेतांना पुराव्यानिशी पकडले आहे, अशा १७३ अधिकार्यांवर प्रशासनाने साधी निलंबनाची कारवाईही केली नाही. शासनाच्या २१ विभागांमधील या १७३ अधिकार्यांमध्ये ३० प्रथम श्रेणीचे, तर २८ द्वितीय श्रेणीचे आणि अन्य तृतीय श्रेणीचे अधिकारी आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुराव्यानिशी पकडल्यास आरोपी अधिकार्यांना त्वरित बडतर्फ करणे अपेक्षित असते. उच्च न्यायालयाकडून निर्णय रहित होईपर्यंत संबंधित अधिकार्याला सेवेत रहाता येत नाही; मात्र सद्यःस्थितीत इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकार्यांचे निलंबनच झाले नाही, याचा अर्थ भ्रष्ट अधिकार्यांचे लागेबांधे वरिष्ठ अधिकारी आणि सरकार इथपर्यंत आहेत, हे निश्चित आहे. सरकार आणि वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट अधिकार्यांना संरक्षण का पुरवतात ? तेही शोधून काढायला हवे. जागरूक नागरिक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी परिश्रमाने भ्रष्ट अधिकार्यांना पकडतात, त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करतात आणि वरिष्ठ पातळीवर या अधिकार्यांना अभय दिले जात असेल, तर त्या कारवाईला काय अर्थ आहे ? अशाने भ्रष्टाचाराचे कधीतरी निर्मूलन होईल का ?
राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचारामुळे शासकीय योजना आणि निधी तळागाळापर्यंत येईपर्यंत त्यातील बराचसा मलिदा राजकीय मंडळींकडून लाटला जातो. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी म्हणाले होते, ‘सामान्य लोकांच्या योजनांसाठी देहलीतून निघालेल्या १०० रुपयांपैकी सामान्य लोकांपर्यंत केवळ १० रुपयेच पोचतात.’ शहरांमध्ये शासकीय अखत्यारीतील काही क्षेत्रांत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि ‘डिजिटलायझेशन’ यांमुळे सामान्यांचा सरकारी अधिकार्यांशी थेट संपर्क येत नाही. परिणामी भ्रष्टाचारावर काही प्रमाणात अंकुश आला असला, तरी ग्रामीण भागातील अशिक्षित जनतेची भ्रष्ट अधिकार्यांकडून लुबाडणूक चालू आहे. सामान्य नागरिक वेळ आणि कार्यालयाच्या सुट्या वाचवण्यासाठी भ्रष्टाचाराला खतपाणी घालतो. अध्यात्मशास्त्रानुसार स्वार्थासाठी गैरमार्गाने इतरांकडून धन लुबाडणे, हे मोठे पाप असून त्याच्या फलस्वरूपात लुबाडणार्याची आज ना उद्या कित्येक पटींनी हानी होते, हे लक्षात ठेवावे !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई