हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ऑनलाईन विशेष परिसंवादांतर्गत ‘सेक्युलरवादाच्या नावाखाली हिंदुविरोधी पत्रकारिता !’, या विषयावर विशेष परिसंवाद
पत्रकारितेला लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हटले जाते. याच पत्रकारितेचा उपयोग करून एके काळी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना धूळ चारली होती. आज मात्र पत्रकारितेच्या माध्यमातून सेक्युलरवादाच्या नावाखाली हिंदुविरोधी शक्ती हिंदूंना त्यांच्या धर्मापासून वेगळे करू पहात आहेत. अल्पसंख्यांकांनी आक्रमण केल्यावर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत वार्तांकन केले जाते, तर दुसरीकडे हिंदूंच्या नावाचा त्यांच्या धर्मासहित उल्लेख केला जात आहे. याचे समर्पक उदाहरण म्हणजे देहली आणि बंगाल येथे झालेली दंगल अन् सेक्युलर प्रसारमाध्यमांचा दुटप्पीपणा होय. आजची सेक्युलरवादी प्रसारमाध्यमे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक संबोधतात, तर नक्षलवाद्यांना ‘ॲक्टिव्हिस्ट’ संबोधतात. एकूणच काय, तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणारी ‘सेक्युलर’ पत्रकारिता लोकशाहीचा गळा घोटत आहे. याचा ऊहापोह प्रस्तुत चर्चासत्रातून करण्यात आला.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिंदु राष्ट्राची !’, या विशेष ऑनलाईन परिसंवादात ‘सेक्युलरवादाच्या नावाखाली हिंदुविरोधी पत्रकारिता !’, या विषयावर परिसंवादाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या परिसंवादाला ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, ‘ऑप-इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल रौशन, बेंगळुरू येथील लेखक आणि स्तंभलेखक श्री. आभास मलदहियार आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे सहसंपादक श्री. चेतन राजहंस उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् पुणे येथील श्री. चैतन्य तागडे यांनी केले. हा कार्यक्रम ६ सहस्रांहून अधिक जणांनी पाहिला. |
पुणे – आज देशात ‘मिनी पाकिस्तान’ असलेली १ सहस्र ठिकाणे आहेत. त्यातील काही भाग इतके संवेदनशील आहेत की, जिथे स्थानिक पोलिसही प्रवेश करू शकत नाहीत. तेथे पोलिसांना जायचे असेल, तर निमलष्करी दल समवेत घ्यावे लागते. त्या भागात कोणतीही ऑनलाईन खरेदी घरपोच होत नाही. आज धर्मांधांनी नवी देहलीलाही चहूबाजूंनी घेरले गेले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे २०० धर्मांधांनी यादव समाजातील लोकांवर हिंसक आक्रमण केले. त्या वेळी धर्मांधांनी महिलांवर बलात्कार करण्यापासून ते त्यांच्या हत्येपर्यंतचे सर्व प्रयत्न केले. त्याला ‘सेक्युलरवादी’ (निधर्मी) पत्रकारांनी मात्र कायदा-सुव्यवस्थेचे कारण दिले. पत्रकारितेमध्ये हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. हिंदूंवर झालेल्या अत्याचारांना सेक्युलरवादी प्रसारमाध्यमे ‘कायदा सुव्यवस्थेचे प्रकरण’ असे नाव देतात. देशात धर्मांधांनी गृहयुद्ध आधीच छेडले आहे. भीतीमुळे, गुलामी मानसिकता असलेल्या प्रसारमाध्यमांतील लोकांनी सेक्युलरवादाचा बुरखा घातला आहे. हा बुरखा हटवण्याची आवश्यकता आहे, असे रोखठोक प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले.
माध्यमांद्वारे हिंदूंचा अतिशय सुनियोजितपणे बुद्धीभेद करण्यात आला ! – राहुल रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘ऑप-इंडिया’ वृत्तसंकेतस्थळ
१. आजच्या पिढीला कोणत्याच सत्य परिस्थितीची जाणीव नाही. देशासमोर सत्य बाजू समोर यावी यासाठी आम्ही ‘ऑप इंडिया’ नावाचे एक ‘वेब पोर्टल’ (वृत्तसंकेतस्थळ) उघडले. अनेक वृत्तसंकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या विरोधात अतिशय नकारात्मक चित्र समोर मांडण्यात आले. यामुळे ‘ऑप इंडिया’ने ठाम भूमिका घेत हिंदुत्वाची आणि भारतीय हिंदु संस्कृतीची बाजू परखडपणे मांडण्याचा प्रयत्न चालू केला.
२. देहलीमध्ये दंगलीच्या वेळी धर्मांधांनी प्रथम हिंसाचार चालू करून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. या घटना मुख्य प्रवाहातील सेक्युलर माध्यमांनी हेतूपुरस्सर दाखवल्या नाहीत; मात्र आम्ही या घटना देशासमोर मांडल्या. त्यामुळे देहलीतील भाजपचे नेते श्री. कपिल मिश्रा यांना मुख्य आरोपी बनवण्याचा त्यांचा कट फसला.
३. ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया (एन्.आर्.सी.) आणि नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) लागू झाल्यावर मुसलमानांना देशाबाहेर काढले जाईल’, असे सांगून दंगली घडवल्या जात असल्याचेही माध्यमांनी दाखवले नाही.
४. ऑक्टोबर २०१९ च्या काळातच धर्मांधांनी हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमणे चालू केली होती. हिंदुत्वाला दडपण्याचे हे षड्यंत्र मागील ७४ वर्षांपासून चालू आहे आणि या कालावधीत हिंदूंचे अतिशय सुनियोजितपणे ‘ब्रेनवॉश’ (बुद्धीभेद) करण्यात आले.
५. आपल्या भोवती घडणार्या घटनांमध्ये असलेले सत्य सर्वांपर्यंत पोचवणे, हे कार्य प्रत्येक हिंदूने करायला हवे.
हिंदूंनी प्रसारमाध्यमांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता वस्तूस्थितीचा अभ्यास करावा ! – आभास मलदहियार
साम्यवादी पत्रकारांची मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे. साम्यवाद्यांनी मुसलमानांचा सर्वाधिक छळ केला आहे. साम्यवाद्यांच्या राष्ट्रविरोधी विचारसरणीमागे हिंदुविरोधी विचारसरणी लपलेली आहे; कारण भारतासाठी हिंदूच ठामपणे उभे राहून कार्य करू शकतात, हे साम्यवाद्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच ते भारतविरोधी बातम्या दाखवत आहेत आणि साम्यवादी विचारधारा देशावर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुत्व म्हणजे साम्यवाद्यांच्या वाटेतील एक अडथळा आहे आणि म्हणूनच त्याला विरोध होत आहे. आताची हिंदुविरोधी परिस्थिती पहाता हिंदूंनी जागृत व्हायला हवे. हिंदुविरोधी प्रसारमाध्यमांवर बहिष्कार घालायला हवा. सेक्युलर माध्यमांनी मांडलेल्या विचारांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता सामाजिक माध्यमांमध्ये येणार्या बातम्यांचा अभ्यास करून आणि माहिती मिळवून सत्य परिस्थिती लक्षात घ्यायला हवी.
राष्ट्र आणि हिंदु द्रोही षड्यंत्राच्या विरोधात राष्ट्रनिष्ठ पत्रकारांनी संघटित व्हायला हवे ! – चेतन राजहंस, सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह
१. नास्तिकतावादी आणि डाव्या विचारसरणीचे पत्रकार यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेचा शब्दच्छल करून हिंदूंची दिशाभूल केली. हिंदु समाजाला अतिशय कलंकित करण्यात आले. अशा वेळी हिंदु समाजात स्वाभिमान जागृत करण्याचे आणि हिंदुत्वाची सत्य बाजू मांडण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने चालू केले. याचे फलित म्हणून आमच्या संपादकांना ५ वेळा अटक करण्यात आली, तसेच आमच्या कार्यालयावर धर्मांधांनी आक्रमण केले.
२. सोव्हिएत संघात प्रसारमाध्यमांचे ‘नेहमी धनाढ्य वर्गाला विरोध करणे आणि कामगार वर्गाचे तुष्टीकरण करणे’, हे साम्यवादी धोरण आहे. हीच शिकवण घेऊन आलेल्या लोकांनी भारतात पंथाच्या आधारे संघर्ष असल्याचे जाणून त्याच धोरणानुसार हिंदूंना विरोध आणि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले.
३. यंदा हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यात ११ मार्च या दिवशी ३२ लाख भाविक पवित्र स्नान करण्यास आले. त्यानंतर ३१ मार्चपर्यंत उत्तराखंड राज्यात केवळ २९२ जणांनाच कोरोनाचा संसर्ग झाला. वस्तूतः शासकीय आकडेवारीनुसार कुंभक्षेत्री कोरोना संसर्ग अतिशय कमी प्रमाणात होता. तरीही कुंभमेळ्याला ‘कोरोनाचे केंद्रस्थान’ असे संबोधून हिंदुविरोधी प्रसारमाध्यमांनी अपप्रचार केला. दुसरीकडे रमझान ईदच्या वेळी देशभरात अनेक ठिकाणी मुसलमानांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. त्याविषयी माध्यमांनी बातम्या का दाखवल्या नाहीत ? यातून कुंभमेळ्याची व्यवस्था करणार्या शासनाला अपकीर्त करण्याचे माध्यमांचे षड्यंत्र स्पष्टपणे दिसून आले.
४. या आणि अशा प्रत्येक राष्ट्र आणि हिंदु द्रोही षड्यंत्राच्या विरोधात सर्वच देशभक्त पत्रकारांनी संघटित व्हायला हवे.
वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
|