‘३.७.२०२६ या दिवशी रत्नागिरी येथील नामवंत वैद्य मंदार भिडे (वय ५१ वर्षे) यांचे हृदयविकाराने मुंबई येथील सायन रुग्णालयात निधन झाले. १५.७.२०२६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त रत्नागिरी येथील साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. जयश्री संजय कदम
१ अ. साधेपणा : ‘वैद्य मंदार भिडे हे आयुर्वेदाचार्य असूनही त्यांचे वागणे-बोलणे यात पुष्कळ साधेपणा होता.
१ आ. सेवाभाव : वैद्य भिडे यांच्यात पुष्कळ सेवाभाव होता.
१ इ. स्वीकारण्याची वृत्ती : रत्नागिरी येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेशी संबंधित दायित्व त्यांनी त्वरित स्वीकारले. काही मासांपूर्वी छपाईचे ठिकाण (प्रेस) पालटल्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात गठ्ठा ‘एस्.टी. स्टँड’वरून आणावा लागणार होता. ती सेवाही त्यांनी त्वरित स्वीकारली. ज्या भागात त्यांचे चिकित्सालय होते, त्या भागातही ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत असत.
१ ई. निरपेक्षता : रात्री अपरात्री कधीही वैद्य भिडे यांना भ्रमणभाष केला, तरीही ते घाई न करता सावकाश औषधोपचार सांगायचे. त्यांनी कधीही त्रासून किंवा थोडक्यात उपचार सांगितले नाहीत. त्यांना भ्रमणभाष करून त्रासाविषयी सांगितले, तरीही त्यांना कधी राग येत नसे. तेव्हाही ते योग्य तो वेळ देऊन उपचार सांगत असत. ते कधीकधी विनामूल्य औषधे देत असत; मात्र मी त्यांच्या चिकित्सालयात गेल्यावर त्यांना आग्रहपूर्वक पैसे देत होते.
१ उ. आधार देणे
१. मला कोरोनाच्या कालावधीत १० दिवस पुष्कळ ताप येत होता. तेव्हा ते मला भेटण्यासाठी ३ वेळा स्वत:हून घरी आले. त्यांनी सांगितलेले पथ्य पाळल्यामुळे मी बरी झाले, तसेच ‘मला माझ्या शारीरिक त्रासांमुळे सतत भीती वाटते’, हे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘काही घाबरू नका. तुम्हाला काही होणार नाही. तुम्हाला ‘भीती वाटते’, यासाठी तुम्ही सद्गुरु सत्यवान कदम (वय ६३ वर्षे) यांना नामजपादी उपाय विचारून घ्या.’’
२. माझ्या मुलीच्या पोटात आणि छातीत दुखत होते. त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सामान्य होते. वैद्य भिडे यांनी दिलेल्या औषधोपचाराने ती बरी झाली. माझ्या यजमानांच्या पोटात दुखत असतांना आधुनिक वैद्यांनी त्यांना रुग्णालयात भरती होण्यास सांगितले; मात्र वैद्य भिडे यांचे औषध आणि त्यांनी सांगितलेले पथ्य पाळल्यामुळे यजमानांची पोटदुखी बरी झाली. प्रत्येक वेळी वैद्य भिडे यांचा आम्हाला आधार वाटत असे.’
२. श्री. संजय कदम, रत्नागिरी
२ अ. मनमोकळेपणा : ‘वैद्य मंदार भिडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी अगदी मोकळेपणाने बोलत असत.
२ आ. नम्रता : त्यांच्या बोलण्यात कधीही कठोरपणा नव्हता.
२ इ. अनेक कुटुंबाचा आधार असणे : ते आम्हा कुटुंबियांच्या प्रकृतीची स्वत:हून आपुलकीने विचारपूस करायचे. आमच्याप्रमाणेच ते इतर अनेक कुटुंबांचाही आधार होते. वैद्य भिडे यांनी केलेले उपचार आणि मार्गदर्शन याचा अनेक व्यक्तींना लाभ झाला.
२ ई. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. कीर्तीभाई पटेल यांना वैद्य मंदार भिडे आणि सनातन संस्था यांच्याप्रती वाटणारा आदरभाव ! : रत्नागिरीतील एक प्रतिष्ठित व्यावसायिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. कीर्तीभाई पटेल यांना वैद्य भिडे यांचे निधन झाल्याचे समजल्यावर त्यांनी मला भ्रमणभाष केला. ते म्हणाले, ‘‘आम्हाला आधी कळले असते, तर आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो असतो. मुंबई येथे आमच्या संप्रदायाचे बरेच ओळखीचे आहेत. आताही काही साहाय्य हवे असेल, तर सांगा.’’ त्यांना पुष्कळ वाईट वाटत होते. वैद्य भिडे यांच्या उपचारांचा त्यांच्या कुटुंबियांना पुष्कळ लाभ झाला होता. वैद्य कै. मंदार भिडे यांच्याविषयी बोलतांना श्री. कीर्तीभाई पटेल म्हणाले, ‘‘असे वैद्य मी कुठे पाहिले नाहीत. असे वैद्य केवळ सनातन संस्थेतच असू शकतात.’’
३. श्रीमती मंजिरी बेडेकर (वय ६६ वर्षे)
३ अ. ‘वैद्य कै. मंदार भिडे रुग्णावर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर उपचार करत असत.
३ आ. रुग्णांशी मनमोकळेपणाने बोलून त्यांना आधार देणे : वैद्य भिडे प्रत्येक रुग्णाशी मोकळेपणाने बोलत असत. ते रुग्णाचे बोलणे ऐकून त्याला धीर देत असत. ‘आयुर्वेदीय उपचार पद्धतीत औषधे पुष्कळ महाग असून जुनी व्याधी असल्यास बरे होण्यास वेळ लागतो’, असे त्यांनी रुग्णांना कधी भासवू दिले नाही.’
४. सौ. रोहिणी ताम्हनकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६३ वर्षे)
४ अ. ‘वैद्य मंदार भिडे यांनी पैशांसाठी कधीच वैद्यकीय व्यवसाय केला नाही. ‘रुग्ण पूर्ण बरा व्हावा’, हेच त्यांचे ध्येय असायचे.
४ आ. तत्परता : वैद्य भिडे यांना कुणीही आवश्यकता भासल्यास संबंधित व्यक्तीच्या घरी बोलावल्यास ते त्वरित घरी येत असत.
४ इ. इतरांचा विचार करणे : आपत्काळाच्या दृष्टीने काही साधकांना औषधे संग्रहित करून ठेवण्यात अडचण होती. त्या वेळी त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. मी भरपूर औषधे घेऊन ठेवली आहेत.’’
४ ई. ‘रुग्ण आनंदी आणि सकारात्मक रहावा’, यासाठी प्रयत्न करणे : वैद्य भिडे यांनी अनेक वेळा रुग्णाला औषधे न देता केवळ नुसते पाणी पिण्यास सांगून काही व्याधी बर्या केल्या आहेत. ‘रुग्ण आनंदी आणि सकारात्मक कसा राहील ?’, यासाठी ते वेगवेगळी उदाहरणे देऊन प्रयत्न करत असत.
४ उ. व्यापकता : त्यांच्यात पुष्कळ प्रेमभाव होता. गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी त्यांनी स्वतः समवेत वेगवेगळ्या प्रकारची पुष्कळ औषधे आणली होती. ‘महोत्सवस्थळी कुणी रुग्णाईत झाले, तर औषधे असावीत’, असा त्यांचा व्यापक विचार होता.
४ ऊ. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व अन् त्याचा शरिरावर होणारा परिणाम’ याविषयी वैद्य भिडे यांचा सत्संग अनुभवणे : वैद्य भिडे यांची बुद्धीमत्ता अफाट होती. ते आमच्याकडे अनेक वेळा येत असत. त्या वेळी आमचे आध्यात्मिक बोलणे पुष्कळ व्हायचे. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व आणि त्याचा शरिरावर होणारा परिणाम’ याविषयी ते उदाहरण सांगायचे. ते आमच्या घरी आल्यावर आमचा सत्संग होत असे.
४ ए. कोणतीही सेवा मनापासून करणे : ते ज्या घरी रविवारचे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करायचे. तेथील कुटुंबियांशी त्यांची जवळीक झाली होती. संस्थेच्या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रम संपायला उशीर झाल्यास ते साधकांना घरी पोचवत असत. कोणतीही सेवा असली, तरीही ते ती सेवा मनापासून करायचे.
४ ऐ. सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता : पू. (कै.) मंगला खेरआजी (सनातनच्या ५४ व्या संत) रुग्णाईत असतांना वैद्य भिडे यांनी पू. आजींची सेवा केली. पू. आजींनी वैद्य भिडे यांची आठवण काढली, की त्यांना आपोआप समजायचे आणि ते पू. आजींना भेटायला यायचे. आम्हा कुटुंबियांना वाटायचे, ‘आम्ही त्यांना कळवले नाही, तरी ते कसे आले ?’ यातून त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमताही आमच्या लक्षात आली.
४ ओ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर त्यांची पुष्कळ श्रद्धा होती. गुरुदेवांना अपेक्षित अशी कृती करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ९.७.२०२६)
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !