स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडे द्रष्टेपणा होता. त्यांच्या विचारांनी देश चालला असता, तर अमेरिकाही मागे पडली असती’, असे विश्वासदर्शक विधान मौलाना आझाद यांचे वंशज आणि भाग्यनगर येथील आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापिठाचे कुलगुरु फिरोज अहमद बख्त यांनी नुकतेच केले. सिंहावलोकन म्हणून याचा विचार करणे राष्ट्राच्या उन्नतीला निश्चितच पूरक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वर्ष १९०९ मध्ये लंडन येथे विजयादशमीचा उत्सव साजरा करतांना ‘श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहेत, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती होत रहाणारी आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला’, असे म्हटले होते. दुर्दैवाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे विधान सत्य ठरते कि काय ? अशी स्थिती सध्या काही अंशी निर्माण झाली आहे. तथाकथित ‘सेक्युलरवादा’ने (धर्मनिरपेक्षतेने) देशातील धर्माचे अधिष्ठान डावलले. त्यामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु देवतांचे खालच्या स्तरावर जाऊन विडंबन केले जात आहे.
स्वातंत्र्यानंतर साम्यवादाचा पगडा असलेली शिक्षणपद्धती अवलंबली गेली. तत्कालिन नेहरू सरकारने समाजवाद आणि साम्यवाद विचारसरणी देशावर थोपवली. भारतीय उन्नतीचा कणा असलेली प्राचीन शिक्षणव्यवस्था निकामी करण्याचा प्रयत्न केला गेला. ‘शिक्षणात रामायण, महाभारत, भगवद्गीता आदींचा समावेश असावा’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मत होते. याचा पुरस्कार केला असता, तर नीतीसंपन्न, राष्ट्र-धर्मप्रेमी पिढी निर्माण झाली असती; मात्र विद्यार्थ्यांना स्वार्थांध, हिंदुद्वेषी बनवणारी आणि भोगवादाकडे नेणारी शिक्षणव्यवस्था माथी मारण्यात आली. या चुकलेल्या निर्णयांची फळे आज भारतीय समाजासमोर उभ्या ठाकलेल्या भयावह संकटांच्या रूपाने भोगावी लागत आहेत. नैतिकतेचे कमालीचे अध:पतन झाल्याने महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढत आहे.
सावरकर यांचे विचार कृतीत आणा !
वर्ष १९६५ च्या भारत-पाक युद्धापूर्वी पाकिस्तानच्या फौजा भारतीय प्रदेशावर आक्रमणे करून आत घुसत. त्यानंतर ‘आमच्या फौजा चुकून भारतीय प्रदेशात गेल्या’, असे समर्थन पाकिस्तानकडून केले जायचे. त्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मेजर जनरल य.श्री. परांजपे यांना ‘पाकिस्तानचे सैनिक चुकून आपल्या इथे येतात, मग आपल्याही सैनिकांनी चुकून पाकिस्तानमध्ये जाऊन आक्रमणे करायला काय हरकत आहे ?’, असा प्रश्न करून ‘शत्रूवर कठोर कारवाईच करायला हवी’, असे गर्भित विधान केले होते. स्वातंत्र्यानंतर पूरक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कृतीत आणण्याची अजूनही संधी आहे ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंना त्यांच्या हक्काचे ‘हिंदु राष्ट्र मिळाले पाहिजे’, असे ठामपणे म्हटले होते. अर्थात्च त्यांनाही या राष्ट्रात सर्वांचा उत्कर्ष आणि सर्व घटकांचे हित अन् समाधान अभिप्रेत होते. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्रा’च्या निर्मितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारधन अनुसरण्यासाठी देशात प्रयत्न व्हायला हवेत. ‘शुभस्य शीघ्रम्’या उक्तीप्रमाणे केंद्र सरकारने या दिशेने वाटचाल करावी, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !