बांदा येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे लोकार्पण

‘हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभा’चे लोकार्पण श्री. अर्जुन उपाख्य बाबा चांदेकर आणि इतर

सावंतवाडी – भगवा ध्वज हा सनातन हिंदु धर्माचे प्रतीक आहे. शौर्य, पराक्रम, त्याग म्हणजेच हा भगवा ध्वज आहे. या ध्वजाला सहस्रो वर्षांची परंपरा आहे. या भगव्याला नतमस्तक होऊन त्याचे पावित्र्य जपा. मानवजातीच्या विकासाचे आणि कल्याण करण्याचे सामर्थ्य केवळ हिंदु धर्मात असून हिंदूंनी यासाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे उद्गार रा.स्व. संघाचे कोकण विभागाचे प्रांत संघचालक श्री. अर्जुन उपाख्य बाबा चांदेकर यांनी काढले. हिंदु एकता मंचच्या वतीने बांदा बसस्थानकासमोरील महामार्गावर ‘हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभा’चे लोकार्पण चांदेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

या वेळी सावंतवाडी तालुका प्रचारक निखिल गावण, सिंधुसेवा सहयोगचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, स्वयंसेवक सतीश घोटगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मंगेश पाटील, रश्मी आठलेकर, हिंदु एकता मंचचे नीलेश सावंत-पटेकर, गुरु कल्याणकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर यांच्यासह हिंदु धर्मप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी श्री. चांदेकर म्हणाले की, भगव्या ध्वजाच्या या परंपरेचे संवर्धन करून ती पुढील पिढीकडे हस्तांतर करणे आवश्यक आहे. संपूर्ण जगाला हिंदु धर्माकडून अपेक्षा असून मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य केवळ हिंदु धर्मातच आहे.

या वेळी बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, माजी अध्यक्ष नीलेश मोरजकर, संदेश पावसकर, मंदार केसरकर, स्वागत नाटेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रीना मोरजकर यांनी केले. आभार नीलेश सावंत यांनी मानले.