अनधिकृतरित्या मासेमारी करणारी गोवा राज्यातील नौका मालवण समुद्रात पकडली !

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई

मालवण – महाराष्ट्र जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर ११ सागरी मैल अंतरात अनधिकृतरित्या ‘एल्.ई.डी.’ दिव्यांद्वारे मासेमारी करणार्‍या गोवा येथील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. पुढील कारवाई चालू आहे.

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य खात्याचा पदभार घेतल्यानंतर मागील ३ महिन्यांपासून अनधिकृत ‘एल्.ई.डी.’ लाईट (दिवे) असलेल्या नौकांवर धडक कारवाई केली जात आहे. ३० मार्चच्या रात्री सिंधुदुर्ग मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर, तसेच मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी हे समुद्रात नियमित गस्त घालत होते. या वेळी गोवा राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नौका ‘बलाका जेजू नों. क्र. आय.एन्.डी. जी.ए. ५ एम्.एम्. २३५१’द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर ११ सागरी मैल अंतरात अनधिकृतरित्या ‘एल्.ई.डी.’ दिव्यांद्वारे मासेमारी करत असतांना दिसून आली. ही नौका मत्स्य विभागाने कह्यात घेतली आहे. या नौकेवर तांडेलसह ३० खलाशी होते. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१  आणि सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असून या नौकेस मोठा दंड होण्याची शक्यता आहे.