धर्मध्वज स्थापनाविधीच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भाव, चैतन्य आणि आनंद यांच्या स्तरावर आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार १४.५.२०२१ या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या   आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. महर्षींनी सांगितल्यानुसार या कापडी धर्मध्वजावर एका बाजूला प्रभु श्रीरामाचे चित्र, तर दुसर्‍या बाजूला प्रभु श्रीरामाच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चित्र आहे. या विधीच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती आणि त्या संदर्भात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहूया.

ध्वजपूजन करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ. मंत्रपठण करतांना श्री. अमर जोशी आणि श्री. चैतन्य दीक्षित (गोलात आकाशात फडकणारा ध्वज दाखवला आहे.)

१. आल्हाददायक वातावरणातून निसर्गदेवतेने जणू ‘यापुढे मंगलमय घटना घडणार आहेत’, असा शुभसंकेत देणे

‘अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी ६ वाजता धर्मध्वजाच्या स्थापनेच्या विधीचा संकल्प करण्यात आला. त्या वेळी वातावरण एवढे आल्हाददायक होते की, जणू निसर्गदेवता ‘यापुढे सगळे मंगलमय घडणार आहे’, असा शुभसंकेतच देत आहे’, असे मला जाणवले.

२. धर्मध्वजाला स्पर्श करतांना ‘साक्षात् श्री गुरुचरणांना स्पर्श करत आहे’, असे जाणवणे

धर्मध्वजाची स्थापना करतांना ध्वज अभिमंत्रण विधी चालू होता. त्या वेळी धर्मध्वजाला स्पर्श केल्यानंतर ‘तो अगदी सजीव आहे आणि मी जणू ‘श्री गुरूंच्या चैतन्यमय चरणांनाच मी स्पर्श करत आहे’, असे मला जाणवले. ध्वजाचा स्पर्श अत्यंत मऊ आणि हलका जाणवला.

३. वातावरणातील भाव, चैतन्य आणि आनंद यांच्या तरंगामुळे स्थळ-काळ, तसेच स्वतःचे अस्तित्व यांचीही जाणीव न होणे

धर्मध्वज स्थापनेचा विधी आणि त्या संदर्भातील सेवा साधारण पावणेदोन घंटे चालू होत्या. तेवढा वेळ मी उभी होते; पण ‘मी एवढा वेळ उभी आहे’, असे मला जाणवलेच नाही. ध्वजस्थापनेच्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होत होती. त्या वेळी वातावरणात इतका भाव, चैतन्य आणि आनंद जाणवत होता की, मला स्थळ-काळ, तसेच स्वतःचे अस्तित्व यांची जाणीवच राहिली नाही.

४. धर्मध्वजाची पूजा करतांना ध्वजाला पडलेल्या घड्यांमुळे श्रीरामाच्या चरणांचा भाग समोर येणे, त्यामुळे ‘प्रत्यक्ष श्रीरामाच्या चरणांवरच पूजा करत आहे’, असे वाटणे

ध्वजस्तंभावर धर्मध्वज तळातील भागात असतांना त्यावर प्रोक्षण करणे, अक्षता वहाणे आदी विधी करण्यात आले. त्या वेळी स्तंभावर असलेल्या ध्वजाला आपोआपच अशा घड्या पडल्या की, माझ्यासमोर ध्वजावरील प्रभु श्रीरामाच्या चित्रातील चरणांचा भाग आला. त्यामुळे ‘मी प्रत्यक्ष श्रीरामाच्या चरणांचीच पूजा करत आहे’, असे मला जाणवले.

५. नादघोषात ध्वजारोहण झाल्याने वातावरणातील वाईट शक्ती नष्ट होणे आणि ध्वज फडकवल्याने सर्वत्र चैतन्य पसरणे

ध्वजाचे पूजन झाल्यानंतर शंखनाद आणि घंटानाद यांच्या घोषांत ध्वजारोहण करण्यात आले. नादघोषामुळे वातावरणातील वाईट शक्ती नष्ट झाल्या आणि त्यानंतर ध्वज फडकवला. त्यामुळे वातावरणात चैतन्य पसरले. त्या वेळी ऊन असूनही वातावरणात शीतलता जाणवत होती.

६. ध्वजारोहण करतांना ध्वज आपोआप एकसमान गतीने आणि अत्यंत सहजतेने वर जाणे अन् त्या वेळी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न होणे

ध्वजारोहण विधी चालू झाल्यानंतर धर्मध्वज आपोआप एकसमान गतीने आणि अत्यंत सहजतेने वर गेला. त्या वेळी मला स्वतःचे अस्तित्वच जाणवले नाही. ‘धर्मध्वज इतक्या सहजतेने आपोआप वर जाणे’, हे दैवी आहे. ‘श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व असलेला रामनाथी आश्रम हे वैकुंठच आहे आणि त्यामुळे  श्रीमहाविष्णूच्या वैकुंठात जे घडते, ते सर्व दैवीच असते’, याची दिव्य अनुभूती या निमित्ताने पुन्हा एकदा मला घेता आली.

७. ‘धर्मध्वजावर देवतांनी सूक्ष्मातून पुष्पवृष्टी केली’, असे जाणवणे

ध्वजारोहण झाल्यानंतर ‘धर्मध्वजावरील प्रभु श्रीराम आणि श्रीरामरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चित्रांवर देवतांनी आकाशातून सूक्ष्मातून पुष्पवृष्टी केली’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘धर्मध्वजाच्या स्थापनेच्या माध्यमातून धर्मध्वजाने ईश्‍वरी कार्य करण्याच्या प्रक्रियेला आता शुभारंभ झाला आहे’, असे मला जाणवले.

८. वारा वहात नसतांनाही ध्वजारोहण झाल्यानंतर थंड वारा वाहू लागणे आणि धर्मध्वज फडकून त्यावरील प्रभु श्रीराम आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चित्रांचे सुंदर दर्शन घडणे

ध्वजस्थापना विधी चालू असतांना वातावरण आल्हाददायक असले, तरी जराही वारा नव्हता. त्यामुळे ‘ध्वज फडकेल ना ?’, अशी शंका उपस्थित काही साधकांना आली. प्रत्यक्षात जेव्हा ध्वजारोहण झाले, त्या वेळी थंड वारा वाहू लागला. त्यामुळे धर्मध्वज फडकून त्यावरील प्रभु श्रीराम आणि श्रीरामरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आम्हाला सुंदर दर्शन घडले.

९. धर्मध्वजाची स्थापना केल्यानंतर जाणवलेली अन्य सूत्रे

अ. ‘या ध्वजाच्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी होऊन सर्वत्र ईश्‍वरी चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. या ध्वजाच्या माध्यमातून सर्व साधकांचे रक्षण होणार आहे.
आ. धर्मध्वजाची स्थापना केल्यानंतर ‘हिंदु राष्ट्र शीघ्रतेने समीप येत आहे’, असे मला वाटले.’

– (श्रीसत्‌शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०२१)

धर्मध्वज स्थापनेचा विधी चालू असतांना मला पूर्ण वेळ परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते. त्यांच्या सूक्ष्मातील उपस्थितीतच ही धर्मध्वजस्थापना झाली.  – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘धर्मध्वजाची स्थापना होणे’, ही सूक्ष्मातील महायुद्धाची नांदी आहे’, असे जाणवणे

​‘प्रत्येक धर्मयुद्धापूर्वी धर्मध्वजाची स्थापना होत असते. महर्षींच्या आज्ञेने रामनाथी आश्रमात या धर्मध्वजाची स्थापना होत असतांना मला जाणवले की, युद्धापूर्वीच्या धर्मध्वजाची आता स्थापनाच होत आहे. धर्मध्वजाची स्थापना केल्याने एक प्रकारे सूक्ष्मातील महायुद्धच घोषित झाले आहे. धर्मध्वजाच्या स्थापनेद्वारे सूक्ष्मातील या महायुद्धाला आरंभ झाला आहे, हे निश्‍चित !

युद्धाच्या ध्वजाची स्थापना असूनही भीतीची स्पंदने न जाणवता भाव, चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने जाणवणे : ही धर्मध्वजस्थापना सूक्ष्मातील महायुद्धाशी संबंधित असली, तरी सामान्य मानवाला जाणवणारी युद्धाशी संबंधित भीती, चिंता, काळजी किंवा अनिश्‍चितता यांची स्पंदने मला जाणवली नाहीत. धर्मध्वज स्थापनेच्या वेळी वातावरणात भाव, आनंद आणि चैतन्य यांचा जणू सागरच निर्माण झाला होता. हा देवासुर लढा रामराज्याच्या स्थापनेसाठीच असल्यामुळे युद्धापूर्वीच्या धर्मध्वजाची स्थापना करतांनाही सामान्य मानवाला जाणवणारी युद्धाशी संबंधित नकारात्मक स्पंदने न जाणवता रामराज्याचीच दिव्य स्पंदने मला जाणवली.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

महर्षींच्या आज्ञेने केलेला ध्वजस्थापनेचा विधी इतका आनंददायी वातावरणात झाला की, मला वाटले, ‘सूक्ष्मातील युद्धाच्या धर्मध्वजाची स्थापना करतांना इतकी आनंदाची स्थिती अनुभवता येते, तर हिंदु राष्ट्राची विजयपताका फडकावतांना परमानंदच होईल !’
– (श्रीसत्‌शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ

धर्मध्वजाची स्थापना करण्यासाठी स्थळाची निवड करतांना लक्षात आलेले दैवी योग !

१. युद्धात सैन्याचे रक्षण करणारी देवी श्री तनोटमातेच्या शिळेची स्थापना केलेल्या आश्रमातील भागात ‘धर्मध्वजाची स्थापना होणे’, हा ‘तिसर्‍या महायुद्धात साधकांचे रक्षण होणार’, याचा शुभसंकेत !

​‘महर्षींनी धर्मध्वजाची स्थापना करण्यास सांगितल्यानंतर ‘त्यासाठी आश्रम परिसरातील कोणते स्थळ निवडायचे ?’, यासंदर्भात विचार चालू होता. तेव्हा विविध पर्यायांचा अभ्यास करून एक स्थळ निश्‍चित करण्यात आले.

त्या स्थानी धर्मध्वजाची स्थापना केल्यानंतर ‘तेच स्थळ का निवडले गेले ?’, याचा कार्यकारणभाव लक्षात आला. वर्ष २०१७ मध्ये महर्षींनी सांगितल्याप्रमाणे या परिसरात आपण जैसलमेर (राजस्थान) येथील श्री तनोटमातेच्या शिळेची एका घुमटीत स्थापना केली आहे. श्री तनोटमातेचे मंदिर हे भारत-पाकिस्तान सीमारेषेच्या जवळ आहे. वर्ष १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी या ठिकाणी लढत असलेल्या भारतीय सैनिकांचे देवीने रक्षण केले होते. त्या परिसरात भारतीय सैन्याला अनुभूती येते की, शत्रूराष्ट्राचे ‘बॉम्ब’ मंदिराच्या परिसरात आले की, निष्प्रभ होऊन पडतात. त्या मंदिरात अशा निकामी झालेल्या ‘बॉम्ब’चे प्रदर्शनच लावले आहे. श्री तनोटमाता सैनिकांचे रक्षण करणारी देवी आहे आणि तिच्याच परिसरात या धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली आहे. ‘तिसर्‍या महायुद्धात देवी साधकांचे रक्षण करणारच आहे’, याचा हा शुभसंकेत आहे.

२. ईश्‍वरी नियोजनानेच श्रीरामचित्रांकित धर्मध्वज आणि सेतूरक्षक हनुमान मंदिर यांची रचना ‘श्रीरामाच्या चरणांशी हनुमान’, अशा प्रकारे होणे

आश्रमातील श्री तनोटमाता मंदिराच्या परिसरात धर्मध्वजस्थापना झाल्यानंतर लक्षात आले की, प्रभु श्रीराम आणि श्रीराम रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चित्रे असलेला धर्मध्वज आश्रम परिसरात वरच्या बाजूला आहे, तर काही काळापूर्वी महर्षींच्या आज्ञेने स्थापन करण्यात आलेले सेतूरक्षक हनुमानाचे मंदिर त्याच्या खालच्या बाजूला आहे. सेतूरक्षक हनुमान मंदिराची स्थापना करतांना महर्षींनी धर्मध्वजाविषयी काही सांगितले नव्हते, तरीही हनुमंतानेच आपले स्थान प्रभु श्रीरामाच्या चरणांशी निवडले.
​या प्रसंगांतून ‘या वैकुंठात प्रत्येक गोष्ट दैवीच घडते आणि सर्व नियोजन ईश्‍वराने आधीच केलेले असते’, हे लक्षात आले.’

– (श्रीसत्‌शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०२१)

धर्मध्वज स्थापनेच्या विधीपूर्वी ध्वजाला स्पर्श करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली सूत्रे  

१. ‘या धर्मध्वजातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे.

२. धर्मध्वजाच्या कापडाच्या मूळ वजनापेक्षा ध्वज पुष्कळ हलका असल्याचे जाणवत आहे.’

– श्री. अमर जोशी, सनातन पुरोहित पाठशाळा (२२.५.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवालासाहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेककथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचाप्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांतसांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहूनअधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहूनअल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिकस्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. हीपंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदनाजाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजेत्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार सद्गुरूंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक