रुग्णवाहिकेसाठी दीड सहस्र ते ४ सहस्र रुपये, तर शववाहिकेसाठी दीड सहस्र रुपये शुल्क निर्धारित
पणजी, २० मे (वार्ता.) – रुग्णांना ने-आण करण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेचे चालक किंवा ही सेवा पुरवणार्या संस्था भरमसाठ शुल्क आकारत असल्याच्या वाढत्या तक्रारींवरून गोवा शासनाने २० मे या दिवशी नव्याने आदेश काढून रुग्णवाहिका, ‘बेसिक लाईव्ह सपोर्ट’ रुग्णवाहिका, ‘अॅडव्हान्स लाईव्ह सपोर्ट’ रुग्णवाहिका आणि शववाहिका यांच्यासाठी शुल्क निर्धारित केले आहे. रुग्णवाहिकेसाठी दीड सहस्र ते ४ सहस्र रुपये, तर शववाहिकेसाठी दीड सहस्र रुपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.
शासनाने नव्याने काढलेल्या आदेशानुसार सर्वसाधारण रुग्णवाहिका रुग्णांना ने-आण करतांना पहिल्या १० कि.मी.साठी १ सहस्र ५०० रुपये, ‘बेसिक लाईव्ह सपोर्ट’ रुग्णवाहिकेला पहिल्या १० कि.मी.साठी २ सहस्र रुपये आणि ‘अॅडवान्स लाईव्ह सपोर्ट’ रुग्णवाहिका पहिल्या १० कि.मी.साठी ४ सहस्र रुपये शुल्क आकारू शकते, तसेच त्यानंतरच्या प्रत्येक कि.मी.साठी प्रति कि.मी. ५० रुपये शुल्क आकारता येणार आहे. शववाहिका १ सहस्र ५०० रुपये आणि प्रत्येक कि.मी.साठी २५ रुपये शुल्क आकारू शकते.