‘डी.एस्. कुलकर्णी ग्रुप’च्या ठेवीदारांच्या वतीने निर्णय
पुणे, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – वर्ष २०१७ पासून आम्ही (डी.एस्. कुलकर्णी ग्रुपचे ठेवीदार) सातत्याने सर्व राजकीय नेत्यांकडे आमचे म्हणणे मांडत आहोत. सर्वच राजकीय पक्षांनी आमची निराशा केली आहे. आमचे म्हणणे ऐकूनही घेतले जात नाही. त्यामुळे २० नोव्हेंबरला होणार्या विधानसभा निवडणुकींमध्ये आम्ही १ लाख ५० सहस्रांहून अधिक ठेवीदार मतदानावर बहिष्कार घालू किंवा ‘नोटा’चा (नकाराधिकार) वापर करू, अशी चेतावणी ‘हिंदु महासभे’चे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिली आहे. ते ‘चैतन्य सेवाभावी संस्थे’च्या माध्यमातून ‘असोसिएशन ऑफ डी.एस्.के. व्हिक्टिम्स’कडून १८ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
‘डी.एस्. कुलकर्णी ग्रुप’ची १६ सहस्र कोटी रुपयांची मालमत्ता केवळ ८२८ कोटी रुपयांना काही बांधकाम व्यावसायिकांनी ७ वर्षांच्या मुदतीसह घेतली आहे. त्यात ठेवीदारांनी गुंतवलेल्या रकमेचा कोणताही उल्लेख केला नाही. हा सर्व व्यवहार संशयास्पद आहे. डी.एस्. कुलकर्णी ग्रुपमध्ये ३२ सहस्र कुटुंबांनी १ सहस्र २०० कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली आहे. त्या गुंतवणूकदारांचा ना सरकार ना राजकीय नेते विचार करत नाहीत.
…नाही तर सामूहिक आत्मदहन करू ! – दवे
येत्या काही दिवसांमध्ये आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास आम्ही पुण्ो येथे मोठ्या प्रमाणावर सामूहिक आत्मदहन करू, अशी चेतावणीही दवे यांनी दिली.
आम्हाला विचारून गुंतवणूक केली का ?
ठेवीदार राजकीय नेत्यांना भेटल्यावर एका मोठ्या नेत्याने ‘आम्हाला विचारून गुंतवणूक केली का ?’, असे म्हणत निरुत्तर केले.