काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी तरुणांना सट्टा आणि वाळूचोरीचा रोजगार दिला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सावनेर (जिल्हा नागपूर) – काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी तरुणांना सट्टा आणि वाळू चोरीचा रोजगार दिला आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी येथे केली. सुनील केदार इतकी वर्षे या मतदारसंघाचे आमदार राहिले. त्यांच्या कार्यकाळात सावनेर मतदारसंघाची काय अवस्था आहे, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, असेही फडणवीस म्हणाले. भाजपचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,

१. २३ नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे; पण या सरकारमध्ये सावनेर येथील आमदार असणार कि नाही ? परिवर्तनाची यापेक्षा मोठी संधी तुम्हाला या जन्मात मिळणार नाही.

२. आता चुकलात, तर पश्चातापाविना काहीही हातात रहाणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा पालटला आहे; मात्र नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघापैकी सावनेर मतदारसंघ मागास राहिला आहे.

३. आपण विकास केला, तर लोक प्रश्न विचारतात, हे येथील आमदारांना ठाऊक होते, त्यामुळे विकास करण्याऐवजी लोकांना दडपण्याचे काम त्यांनी केले.

४. या ठिकाणी विकासाचे नाही, तर दादागिरीचे राजकारण झाले.

५. माझ्या पोलिसांना अवैध धंद्यांमुळे सावनेर मतदारसंघात सर्वांत अधिक त्रास आहे. या अवैध धंद्यांना लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळते.