पूर्वी गौरीअम्मा आता शैलजा !

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाची घोषणा केली. नवीन आणि तरुण रक्ताच्या उमेदवारांना मंत्रीमंडळात संधी देणार असल्याचे सांगत त्यांनी माजी आरोग्यमंत्री आणि या वेळी भरघोस मतांनी निवडून आलेल्या के.के. शैलजा यांना मंत्रीमंडळातून वगळले. विजयन् यांच्या मागील मंत्रीमंडळात शैलजा यांना प्रथमच आरोग्यमंत्री म्हणून संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी निपाह विषाणूचा संसर्ग रोखण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी केेरळमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले. या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी अनेक राज्यस्तरीय प्रसारमाध्यमांनी ‘के.के. शैलजा या राज्याच्या मुख्यमंत्री होऊ शकतात’, अशा आशयाची वृत्ते दिली. शैलजा या नेहमीच विजयन् यांच्या ‘प्रामाणिक मंत्री’ म्हणून कार्यरत राहिल्या; मात्र पक्षांतर्गत स्वतःला स्पर्धक निर्माण होत असल्याचे पाहून विजयन् यांची मती फिरली आणि त्यांनी पद्धतशीरपणे शैलजा यांचा काटा काढला. केरळमधील सत्ताधारी साम्यवादी पक्ष हा पक्षाच्या ‘पॉलिट ब्युरो’प्रमाणे कार्य करतो, हे केवळ बोलण्यासाठीच आहे. राज्यात विजयन् यांचीच एकाधिकारशाही चालते. ‘पॉलिट ब्युरो’ काय सांगतो ? याला विजयन् यांच्या लेखी किंमत शून्य. शैलजा यांना वगळल्यामुळे टीका होऊ लागल्यावर पक्षाने ‘मागील मंत्रीमंडळात कार्यरत असलेल्या केवळ शैलजाच नव्हे, तर अनेक मंत्र्यांना वगळले आहे. पक्षाच्या दुसर्‍या फळीतील पिढीला सिद्ध करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे’, असे सांगितले गेले. हे स्पष्टीकरण किती हास्यास्पद आहे ! जर पक्षातील दुसर्‍या फळीतील नेत्यांना सिद्ध करायचे असेल, तर हा नियम विजयन् यांना का लागू नाही ? याचे उत्तर कुणाकडेही नाही. येथे साम्यवादी पक्षाच्या अंतर्गत काय गोंधळ चालू आहे ? हे सांगण्यात आम्हाला स्वारस्य नाही. आम्हाला साम्यवाद्यांचा स्त्रीवाद किती भंपक आहे, हे हिंदूंना दाखवून द्यायचे आहे. ‘हिंदु धर्मात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते’, असे सांगणारे साम्यवादी स्वपक्षातील होतकरू स्त्री राजकारण्यांचे पाय कशा प्रकारे खेचतात ? याचे हे उत्तम उदाहरण होय. अशांनी हिंदूंना स्त्रीवाद शिकवण्याचे दुःसाहस करू नये !

माजी आरोग्यमंत्री के.के. शैलजा व मुख्यमंत्री पिनराई विजयन्

साम्यवाद्यांचा भंपक स्त्रीवाद !

या निवडणुकीच्या प्रचारकाळात मातृभूमीच्या पत्रकाराने शैलजा यांचे पती भास्करन् यांना ‘तुमच्या पत्नी मंत्री आहेत, तरी त्या घरात स्वयंपाक बनवतात का ?’, असा प्रश्‍न विचारला. त्या वेळी शैलजा यांनी मध्येच हस्तक्षेप करत ‘मला स्वयंपाक बनवता येतो किंवा नाही, हे निवडणुकीतील महत्त्वाचे सूत्र असू शकत नाही’, असे सांगत त्याला फटकारले. त्या वेळी पत्रकाराने विषय पालटण्याचा प्रयत्न केला असता, ‘तुम्ही विषय पालटू नका. तुम्हाला महिला स्वयंपाक करते किंवा नाही, यात स्वारस्य असते. आमच्या घरात सर्वांना स्वयंपाक येतो. मी स्वयंपाकघरात दबून राहिले असते, तर इथपर्यंत पोचले नसते’, असे त्यांनी सांगितले. शैलजा यांचा कडवा स्त्रीवाद यातून दिसून येतो; मात्र ज्या तडपेने त्यांनी पत्रकाराला फटकारले, त्याच तडपेने त्या पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात उभ्या राहू शकल्या नाहीत, हे येथे सांगावेसे वाटते. ‘मला वगळल्यामुळे विरोध होणे, हे भावनात्मक आहे’, असे सांगून त्या गप्प बसल्या. प्रचलीत साम्यवादी व्यवस्थेला विरोध करून फारसे काही पदरात पडणार नाही, हे बहुदा त्यांना ज्ञात असावे. शैलजा या साम्यवाद्यांच्या स्त्रीविरोधी राजकारण्याच्या बळी पडलेल्या काही पहिल्या राजकारणी नाहीत. याआधी केरळमध्ये साम्यवाद रुजवणार्‍या के.आर्. गौरी (गौरीअम्मा) या वर्ष १९८७ मध्ये मुख्यमंत्री होता होता राहिल्या. प्रशासनावर उत्तम पकड असलेल्या आणि आक्रमक नेत्या म्हणून त्या लोकांना परिचित होत्या; मात्र शेवटच्या मिनिटाला त्यांना डावलून इ.के. नयनार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. ‘गौरीअम्मा यांना मुख्यमंत्री बनवल्यास त्या डोईजड होतील’, अशी भीती पक्षातील नेत्यांना होती; म्हणून त्यांना डावलण्यात आल्याचे बोलले जाते. थोडक्यात साम्यवाद्यांच्या ‘पुरुषसत्ताक’ राजकारण्यात स्त्री राजकारण्यांना स्थान नाही, हेच खरे !

केरळमध्ये साम्यवाद रुजवणार्‍या के.आर्. गौरी (गौरीअम्मा)

‘हिंदूंना स्त्रीवर अन्याय करण्याची ‘प्रेरणा’ मनुस्मृतीतून मिळते. हिंदूंच्या धर्मग्रंथात स्त्रीला दुय्यम स्थान दिल्यामुळेच ते स्त्रियांवर अत्याचार करतात’, असे तुणतुणे साम्यवादीधार्जिण्या स्त्रीवादी ऐकवतांना दिसतात. ‘साम्यवाद्यांनी स्त्रियांवर अत्याचार करण्याची, त्यांना डावलण्याची प्रेरणा ‘दास कॅपिटल’मधून घेतली कि ‘मॅनिफेस्टो ऑफ कम्युनिस्ट पार्टी’मधून घेतली ?’ याचे उत्तर त्यांनी आता द्यायला हवे. हिंदूंना शहाणपण शिकवणारे हे साम्यवादी त्यांच्याच पक्षातील एका महिला राजकारण्यावर अन्याय होत असतांना ‘पक्षाचा निर्णय’ असे सांगून गप्प आहेत. नाही म्हणायला वृंदा करात यांनी दबक्या आवाजात याला विरोध केला; मात्र त्यांच्या विरोधाला धार नक्कीच नव्हती.

हिंदूंना शहाणपणा शिकवू नये !

जगात साम्यवाद्यांनी जेथे सत्ता गाजवली, तेथे महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले, हा इतिहास आहे. सोव्हिएत रशियाचा हुकूमशहा स्टॅलिन याने महिलांवर केलेले अत्याचार सर्वज्ञात आहेत. चीनमध्ये तर ‘मी टू’सारख्या आंदोलनांविषयी बोलणे किंवा स्त्रियांवरील अत्याचारांना वाचा फोडणे यांस मज्जाव आहे. स्त्रियांच्या अधिकारांविषयी भारतातील साम्यवादीही याहून वेगळे नाहीत. केरळमधील माकपचे नेते पी.के. ससी यांच्यावर डी.वाय.एफ्.आय. या साम्यवादी पक्षाच्या युवा संघटनेतील महिला सदस्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला. हे प्रकरण ज्या प्रकारे साम्यवाद्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला, त्यावरून सत्ताधारी साम्यवाद्यांना स्त्रियांविषयी किती कणव आहे, हे दिसून येते. नक्षलवादी संघटनांमध्ये महिला नक्षलवाद्यांचे लैंगिक शोषण होते; मात्र त्याविषयी साम्यवादी ‘ब्र’ही काढत नाहीत.

अशा साम्यवाद्यांनी स्त्रीसमानतेविषयी बोलणे, हा मोठा विनोद होय. केरळमधील शबरीमला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी सत्ताधारी साम्यवाद्यांनी पाठिंबा दिला. येथे ‘स्त्रियांना समान अधिकार हवा’, हे सूत्र त्यांनी लावून धरले. हिंदूंच्या प्रथा-परंपरांमध्ये नाक खुपसून त्या स्त्रीविरोधी असल्याचे सांगणारे साम्यवादी त्यांच्याच ‘कॉम्रेड’ महिलांना न्याय मिळवून देऊ शकत नाहीत. अशा साम्यवाद्यांनी धारण केलेला स्त्रीसमानतेचा, तसेच मानवतावादाचा बुरखा कधीच फाडला गेला आहे. या सत्याची पुन्हा उजळणी व्हावी, यासाठीच हा लेख प्रपंच !