राजस्थानमधील संवित् सोमगिरी महाराज यांचा देहत्याग !

जोधपूर (राजस्थान) – बिकानेर येथील शिवबाडी मठाचे महंत संवित् सोमगिरी महाराज यांनी १८ मेच्या रात्री बीकानेर येथे देहत्याग केला. संवित् सोमगिरी महाराज हे अभियंता होते. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार करण्याचे मोठे कार्य केले. राजस्थानसहित देशातील विविध भागांत त्यांचे अनुयायी आहेत. बिकानेर व्यक्तीरिक्त माऊंट अबू येथेही त्यांचा एक मठ आहे. संवित् सोमगिरी महाराज यांच्या देहत्यागानंतर बिकानेर येथील मंदिर, मठ, आश्रम येथील महंत आणि पुजारी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

२०१६ मध्ये हिन्दू जनजागृती समितीच्या वतीने बिकानेर येथे आयोजित हिंदु राष्ट्र विषयक प्रवचनाला मार्गदर्शन करतांना संवित् सोमगिरी महाराज
उज्जैन येथील गुरुकुल संमेलनात संवित् सोमगिरी महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे वार्तालाप करतांनाचा क्षण ! ( वर्ष २०१८)
बिकानेर येथील शिवबाडी शिवमंदिरात लावलेल्या धर्मशिक्षा प्रदर्शनीला भेट देतांना  संवित सोमगिरी महाराज आणि त्यांच्याशी वार्तालाप करतांना समितिचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे

संवित् सोमगिरी महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी असलेले ऋणानुबंध !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला भरभरून आशीर्वाद देणे

वर्ष २०१६ मध्ये जेव्हापासून संवित् सोमगिरी महाराज यांच्याशी संपर्क झाला, तेव्हापासून हिंदुजागृती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या कार्यासाठी त्यांचे निरंतर आशीर्वाद प्राप्त झाले. राजस्थानच्या बिकानेर येथे धर्मप्रसारासाठी जाणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या पूर्णकालीन कार्यकर्त्यांचा निवास आणि भोजन यांची व्यवस्था महाराजांच्या शिवबाडी मठातच असायची. गोवा येथे होणार्‍या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनासाठीही महाराज आवर्जून उपस्थित होते. शिवबाडी येथील शिवमंदिरात होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमाला समितीचे धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स प्रदर्शन असो वा सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन, ते लावण्यासाठी त्यांचे आमंत्रण असायचे. कोटा येथे धर्मप्रसारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांची ही त्यांनी तेथील आपल्या साधकांकडे पूर्ण व्यवस्था केली. वेळोवेळी कार्यासाठी उपयुक्त संपर्क ते उपलब्ध करून देत असत.

हिंदूमध्ये चेतना जागृत ठेवणारे ते आगळेवेगळे संत !

गीता परीक्षेद्वारे अनेक विद्यार्थ्यांना गीताज्ञान देणे असो, संवित् शुटिंग संस्थेच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षित करणे असो वा शिवबाडी मंदिराचा कायापालट करून बिकानेरवासियांना एक धर्मपीठ उपलब्ध करून देणे असो, असे अनेक कार्य करून हिंदूमध्ये चेतना जागृत ठेवणारे ते आगळेवेगळे संत होते. त्यांचा धर्मासाठी कार्य करणार्‍या सर्वांनाच आधार होता.

संवित् सोमगिरी महाराज करत असलेले धर्मकार्य पुढे चालू ठेवणे, हीच धर्माभिमान्यांची साधना !

अभियांत्रिकी प्राध्यापकपदावरून संन्यासाकडे वळलेले संवित् सोमगिरी महाराज यांना आधुनिकतेचा उपयोग करून धर्म समाजापर्यंत पोेचवण्याची तळमळ होती. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे विविध आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून सनातन धर्माची महती विश्‍वापर्यंत पोेचवण्याचे कार्य त्यांना विशेष आवडले. त्यांच्या देहत्यागाने अनेक हिंदूंचा, भक्तांचा स्थूलातील आधार गेला आहे. मरगळ आलेल्या हिंदूमध्ये नवचेतना निर्माण करून आध्यात्मिक दिशादर्शन करणार्‍या महाराजांनी देहत्याग केला असला, तरी त्यांचे कार्य भविष्यात पुढे वाढवणे, ही प्रत्येक धर्माभिमानी हिंदूची साधना असणार आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

– श्री. आनंद जाखोटिया, समन्वयक, राजस्थान आणि मध्यप्रदेश, हिंदु जनजागृती समिती.