कोरोनाच्या विरोधातील लढ्यात शासनाकडून ‘फॅमिली डॉक्टरां’ना सहकार्याचे आवाहन !
मुंबई – कोरोना विरोधातील लढाईत ‘माझा डॉक्टर’ म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या ‘फॅमिली डॉक्टरां’नी शासनासमवेत यावे. कुटुंबप्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य आपण उचलावे. तुम्ही लढाईत उतरलात, तर कोरोनाला महाराष्ट्रातून हद्दपार करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. १६ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कोरोनाच्या विरोधातील राज्य टास्क फोर्सच्या प्रतिनिधींनी राज्यातील ‘फॅमिली डॉक्टरां’समवेत ‘ऑनलाईन’ संवाद साधला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी ‘फॅमिली डॉक्टरां’ना कोरोनाच्या विरोधातील लढ्यात शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या बैठकीला राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘जगभरात प्रत्येक घराचा किंवा कुटुंबाचा डॉक्टर असतो. त्याच्यावर त्या कुटुंबाचा पुष्कळ विश्वास असतो. या डॉक्टरांनाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती असते. आज मला तुमच्या अनुभवाची आवश्यकता आहे. कोरोनाबाधित ७० ते ७५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. अशा रुग्णांना आपण रुग्णालयात भरती करून घेत नाही किंवा कोणता सल्ला देत नाहीत. रुग्ण काही गोष्टी घरी अंगावर काढतात आणि विलंबाने रुग्णालयात भरती होतात. गृहविलगीकरणात रहाणार्या रुग्णांचे उत्तम उपचार व्यवस्थापन होण्याची आवश्यकता आहे. अशा रुग्णांवर उपचार होणे आवश्यक आहेत. ‘फॅमिली डॉक्टरां’नी हे दायित्व स्वीकारल्यास मृत्यूदर न्यून करता येऊ शकेल. पावसाळ्याच्या उंबरठ्यावर साथीच्या रोगांना रोखण्यासाठीही ‘फॅमिली डॉक्टर’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सर्व डॉक्टर स्वत:ची आणि कुटुंबाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सैनिकाप्रमाणे या युद्धात उतरला आहात. शासन तुमच्या समवेत आहे. तुम्हाला आवश्यक असलेले सर्व सहकार्य शासन करील. तुमच्या अडचणींची जाणीव आम्हाला आहे, त्या सोडवायला शासन प्राधान्य देत आहे.’’