संहिता बनवतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ती सूक्ष्मातून सांगितल्याची दोन साधकांना आलेली अनुभूती

‘१८.९.२०२० या दिवशीपासून चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ राष्ट्रीय समिती शिबिरासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती आणि सुराज्य अभियान उपक्रम’ यांची संहिता मला बनवायची होती. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे मला यासाठी मार्गदर्शन करणार होते.

‘सनातनचे प्रत्येक कार्य देव कसे करतो, याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. संहिता बनवतांना ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे सूत्रे सांगत असून ती ऐकू येत आहेत’, असे जाणवणे

मी संहितेतील सूत्रांचे टंकलेखन चालू केल्यावर मला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे विषय सांगत असल्याचे दिसू लागले. त्या वेळी ते सांगत असलेली सूत्रे मला ऐकू येत होती आणि मी त्याचे टंकलेखन करत होते. सद्गुरु पिंगळेकाका जशी सूत्रे सांगतात, ते जसे प्रश्‍न विचारतात, तसेच मला ऐकू येत होते. त्यामुळे मी टंकलेखन करत असलेली संहिता पूर्णपणे सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितल्याप्रमाणे झाली. माझ्यासाठी ही मोठी अनुभूती होती.

२. ही अनुभूती सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना सांगितल्यावर त्यांनी ‘आता ही मला अनुभूती झाली’, असे सांगणे

संहिता सिद्ध झाल्यावर मी ती सद्गुरु पिंगळेकाकांना पाठवली. त्यांनी ती संहिता छान झाल्याचे आणि आवडल्याचे कळवले. तेव्हा मी त्यांना माझी वरील अनुभूती सांगितली आणि ‘ती संहिता, म्हणजे त्यांनी सांगितलेली सूत्रेच आहेत’, असे सांगितले. त्यावर सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘आता ही मला अनुभूती झाली.’’

अश्‍विनी कुलकर्णी

३. अन्य एका सहसाधकाला अनुभूतीविषयी सांगितल्यावर त्याने ‘संहिता बनवतांना अशीच अनुभूती स्वतःला आली’, असे सांगणे

मला आलेली अनुभूती मी श्री. चेतन राजहंस यांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘वर्ष २०१३ मध्ये मलाही अशीच अनुभूती आली होती. मी संहिता बनवत असतांना सद्गुरु पिंगळेकाका मला दिसत होते आणि ते सांगत असलेली सूत्रे ऐकून मी त्यांचे टंकलेखन करत होतो. गुरुकृपेने तुम्हाला ही अनुभूती पुष्कळ लवकर आली.’’

४. शिबिरात ही सूत्रे सांगिल्यावर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘त्याचा सूक्ष्म स्तरावर पुष्कळ मोठ्या प्रमाणात परिणाम झाला’, असे सांगणे

शिबिरात हा विषय सांगितल्यावर ‘विषय ऐकून उत्साह वाटला, त्यात सहभागी व्हावेसे वाटले’, असे अनेक जणांनी सांगितले. तेव्हा ‘स्थुलापेक्षा या विषयाचा सूक्ष्म स्तरावर पुष्कळ मोठा परिणाम झाला’, असे सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितले.

सद्गुरु पिंगळेकाकांनी असे सांगितल्यावर ‘संतांच्या केवळ संकल्पाने आणि अस्तित्वानेच सेवा होते. त्यांच्यातील चैतन्यामुळेच एवढा मोठा परिणाम साध्य होतो’, याचीही मला अनुभूती आली.

– अश्‍विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०२०)