सावंतवाडी – कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी आणि कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना खनिकर्म विभागाकडून अत्याधुनिक ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला-बालकल्याण समिती सभापती सौ. शर्वाणी गांवकर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मळेवाड, रेडी आणि कासार्डे या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त होत आहेत. तसेच सध्याच्या कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अत्यवस्थ रुग्णांना सेवा देतांना अडथळे निर्माण होत आहेत. ही तीनही गावे प्रमुख खनिज उत्खनन प्रभावित क्षेत्रात येतात; मात्र प्रशासकीय आदेशात या तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्याविषयी समावेश नाही. तरी सदर वस्तूस्थितीचा विचार करता अत्याधुनिक सोयींनी युक्त प्रत्येकी एक ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका मळेवाड, रेडी आणि कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.