|
आरोग्य अधिकार्यांना शिवीगाळ करणारे काँग्रेसचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी !
वर्धा – येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ. डवले यांनी तक्रार दिली होती. कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती; मात्र या पत्रकार परिषदेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकार्यांच्या निगराणी पथकाने दिलेल्या तक्रारीवरून तडस यांच्यासह आयोजकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
वर्धा जिल्ह्यात ९ मे या दिवशी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी आरोग्य शिबीर पार पडलेे. शिबिराची छायाचित्रे काढून स्थानिक पदाधिकार्यांनी राजकीय ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’वरून ती प्रसारित केली होती. आमदार कांबळे यांनी डॉ. डवले यांना दूरभाष करून अपशब्द वापरले, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तालुका अधिकार्यांनाही कांबळे यांनी धमकावले आहे, असा आरोप डॉ. डवले यांनी केला होता.
या घटनेनंतर कांबळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेने केली होती. ‘संबंधित आमदाराविरुद्ध गुन्हा नोंद करावा आणि नियमानुसार कारवाई करावी; अन्यथा राज्यातील आरोग्य सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल’, अशी विनंती वजा चेतावणी संघटनेने दिली होती. त्यानंतर कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.