रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर धाराशिव जिल्हा आणि सोलापूर शहरात संचारबंदीत शिथिलता !

प्रशासनाच्या दुटप्पी धोरणामुळे हिंदूंमध्ये संताप !

सध्या सोलापूर जिल्हा कोरोना हॉटस्पॉट आहे, तर काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची गंभीर स्थिती होती. असे असूनही केवळ अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी रमजान ईदच्या निमित्ताने नियम शिथील का केले जातात ? हिंदूंचा अक्षय्य तृतीया हा सण साडेतीन मूहूर्तांपैकी एक असल्याने हिंदू त्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी किंवा गृहप्रवेश, वास्तूशांती आदी धार्मिक विधींचे आयोजन करतात. यासाठी प्रशासन नियम शिथील करणार का ? या आदेशातून प्रशासनाचा दुजाभाव दिसून येतो ?

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

धाराशिव – जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ८ मे ते १३ मे या कालावधीत संचारबंदी लागू केली होती. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या होत्या; मात्र १४ मे या दिवशी रमजान ईद असल्याने १२ मे पासून जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू रहातील, असा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढला आहे.

अशाच प्रकारे सोलापूर येथेही ११ आणि १२ मे या दिवशी सकाळी ७ ते ११ या वेळेत शहरात संचारबंदीत अत्यावश्यक सेवेसाठी सवलत देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी ‘संचारबंदी शिथिल करा’, अशी मागणी शहरातील काझी अमजद अली यांनी पालकमंत्र्यांना भेटून केली होती, तसेच या संदर्भात माजी आमदार नरसय्या आडम आणि आम आदमी पक्ष यांनीही पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते.

लातूर येथेही रमजान ईदनिमित्त कठोर निर्बंधांमध्ये शिथिलता

लातूर – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी ८ ते १३ मे या कालावधीत जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले होते; मात्र रमझान ईदच्या पार्श्‍वभूमीवर हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. येथे ११ आणि १२ मे या दिवशी सकाळी ७ ते दुपारी १२ या कालावधीत किराणा दुकान, सुकामेवा, भाजीपाला, फळविक्री, मांसविक्री, बेकरी, अंडी, मासे, दूध विक्री करणारी दुकाने चालू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे.

यासमवेतच १२ मे या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत हातगाड्यांवर फिरून फळांची विक्री, दूध विक्री, मांसविक्री करता येणार आहे. ‘ईदनिमित्त एकाच ठिकाणी गर्दी करू नये. आपल्या घराजवळच्या दुकानांतून खरेदी करावी’, असेही आदेशात म्हटले आहे.

या आदेशाचा निषेध करावा तेवढा अल्पच ! – ह.भ.प. हनुमंत वीर महाराज, राष्ट्रीय प्रवक्ते, वारकरी संप्रदाय पाईक संघ

भारतीय राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना समान वागणूक देणे, हे प्रशासकीय अधिकारी  आणि लोकप्रतिनिधी यांचे कर्तव्य आहे; मात्र अल्पसंख्यांक या नावाखाली लांगूलचालनाची परंपरा दुर्दैवाने राजकीय तसेच प्रशासकीय स्तरावर आजकाल पहायला मिळते. हा आदेश हे त्याचेच ठळक उदाहरण आहे. त्यामुळे या आदेशाचा निषेध करावा तेवढा अल्पच आहे.

प्रशासनाला रमझान सणाविषयी पुष्कळ आस्था असेल, तर त्या सणासाठी लागणारे साहित्यही शासनाने त्यांना घरपोच करावे, म्हणजे यथार्थ लांगूलचालन केल्याचे समाधान तरी प्राप्त होईल. हा प्रकार हिंदूंच्या धार्मिक भावनांना शून्य किंमत असल्याचे दर्शवतो, असे मानायला हरकत नाही.

रमझान ईदसाठी सवलत, हे उघड उघड अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन ! – प्राध्यापक दादासाहेब जाधव, दासबोध अभ्यासक, तुळजापूर

रमझान ईदसाठी संचारबंदीतून सरकार सवलत देत आहे, हे उघड उघड अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आहे; मात्र हिंदूंच्या यात्रा, सण, उत्सव, मंदिर प्रवेश यांवरील निर्बंध कायम आहेत. केवळ विशेष धर्मियांना अशा प्रकारे मोकळीक देणे, हा सरकारचा पक्षपात आहे. सरकार अल्पसंख्यांकांना घाबरते, हेच यातून स्पष्ट होते. अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी हे सगळे चालले आहे. हिंदूंनी संघटित होऊन स्वतःची मतपेढी निर्माण केल्यासच हे लांगूलचालन थांबेल. जय श्रीराम !

एकाला एक नियम, तर दुसर्‍याला एक नियम करणे, हा धर्मनिरपेक्षतेचा अवमान ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

श्री. राजन बुणगे

प्रशासनाला अल्पसंख्य सोडून अन्य धर्मियांच्या जिवाची काळजी नाही का ? या शिथिलतेमुळे होणार्‍या कोरोनाच्या संसर्गाला हिंदू बळी पडणार नाहीत का ? जिल्हाधिकारी या सर्वांचे दायित्व स्वत: घेणार का ? धर्मनिरपेक्ष भारतात समान कायदा हवा; पण याऐवजी एकाला एक नियम, तर दुसर्‍याला एक नियम करणे, हा धर्मनिरपेक्षतेचा अवमान आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर आणि धाराशिव जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी व्यक्त केली.

प्रशासनाचा आदेश