संतांना शरण जाऊन त्यांचे भावपूर्ण आज्ञापालन केल्यावर अंतरंगातील ईश्वराचे अस्तित्व अनुभवता येणे

सानपाडा येथील हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते वैद्य उदय धुरी यांना ठाणे येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत वक्ता म्हणून बोलण्यास सांगितले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ३ सभांत बोलतांना त्यांना पुष्कळ शारीरिक त्रास झाला होता. त्यामुळे ‘या सभेत वक्ता म्हणून सेवा स्वीकारायला नको’, असे त्यांच्या मनाने ठरवले होते. तसे त्यांनी समितीच्या सेवकांना कळवलेही होते; पण ‘त्यांनीच या सभेला मार्गदर्शन करावे’, अशी ईश्वराची इच्छा होती. त्यामुळे नकारात्मक मानसिकतेत त्यांनी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर (सद्गुरु अनुताई) यांना संपर्क केला. सद्गुरु अनुताईंनी त्यांना दिलेले चैतन्य आणि केलेली मनाची सकारात्मक स्थिती यांमुळे त्यांनी सद्गुरु अनुताईंचे आज्ञापालन करण्याचे ठरवले; तरीही मन अजूनही कुठेतरी थोडे अस्वस्थ होते. तेव्हा त्यांच्या अंतरंगातील ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देतांना ईश्वराने त्यांना दिलेली अद्भुत अनुभूती त्यांच्या शब्दांत पाहूया !

१. शारीरिक अस्वास्थ्यामुळे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत विषय मांडण्यासाठी असमर्थता दर्शवणे

वैद्य उदय धुरी

‘१३.१.२०१९ या दिवशी ठाणे येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विषय मांडण्यासाठी मला श्री. नरेंद्र सुर्वे यांचा भ्रमणभाष आला. त्या वेळी मी सुर्वे यांना ‘शारीरिक अस्वास्थ्यामुळे विषय मांडतांना पुष्कळ त्रास होतो’, असे सांगून स्पष्टीकरणार्थ अनेक कारणे सांगितली. मागील ३ सभांत मला प्रत्येक ५ मिनिटांनी पाणी प्यावे लागत होते. मधुमेह, रक्तदाब आणि हायपोथॉयरॉईड यांवर गोळ्या घेतल्यावर माझे संपूर्ण शरीर सुकल्यासारखे व्हायचे अन् घसा सतत कोरडा पडायचा. त्यामुळे बोलतांना शब्दही फुटायचे नाहीत. या सर्व त्रासांमुळे मन पुष्कळ अस्थिर व्हायचे. त्यामुळे ‘मला ही सेवा जमणार नाही’, असे मी त्यांना कळवले. त्यावर श्री. सुर्वे यांनी सद्गुरु अनुताईंशी (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याशी) बोलून घेण्यास सुचवले; परंतु मी सद्गुरु अनुताईंना संपर्क केला नाही आणि मी अन्य साधिकेला मला होत असलेला त्रास सांगून मला ही सेवा जमणार नसल्याचा निरोप दिला.

२. सद्गुरु अनुताईंना संपर्क केला नसला, तरी साधकाच्या माध्यमातून त्यांनी उपायांसाठी नामजप आणि मुद्रा शोधून सांगणे; पण मनाची सिद्धता होत नसल्यामुळे नामजप मनापासून भावपूर्ण न करणे

सभेच्या आदल्या दिवशी श्री. बळवंत पाठक यांनी मला भ्रमणभाष करून ‘सद्गुरु अनुताईंनी उपायासाठी नामजप आणि मुद्रा सांगितली आहे’, असे सांगितले आणि त्याप्रमाणे उपाय करून सभेच्या सेवेसाठी जाण्यास सांगितले. मी त्याप्रमाणे सांगितलेला नामजप करायला आरंभ केला; मात्र माझ्या मनाची सिद्धता नसल्यामुळे माझ्याकडून नामजप भावपूर्ण होत नव्हता. सभेच्या दिवशी सकाळी मला कामावरही जावे लागले. सराव करतांना घसा सुकत होता. स्पष्टपणे शब्द उच्चारले जात नव्हते. त्यामुळे एकूणच मन अप्रसन्न होते.

३. समितीसेवक श्री. नरेंद्र सुर्वे यांनी सद्गुरु अनुताईंशी बोलून घेण्यास सांगणे आणि सद्गुरु अनुताईंशी बोलल्यावर त्यांच्याकडून चैतन्य मिळून मन सकारात्मक होणे

दुपारी ३ वाजता श्री. नरेंद्र सुर्वे यांचा पुन्हा भ्रमणभाष आला. तेव्हा मी त्यांना पुन्हा वरील कारणे सांगितली. त्यांनी सकारात्मक राहून सद्गुरु अनुताईंशी बोलून घेण्यास सांगितले. या वेळी क्षणाचाही विलंब न करता मी सद्गुरु अनुताईंना भ्रमणभाष केला. मी शारीरिक अस्वास्थ्यामुळे मला होत असलेले सर्व त्रास सद्गुरु अनुताईंना सांगितले. सद्गुरु अनुताईंनी प्रेमाने विचारपूस करून नामजप आणि मुद्रा सांगितली. त्यांनी माझी नकारात्मकता घालवून मला सकारात्मक केले. सभास्थळी पोचेपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात सराव करण्याऐवजी सद्गुरु अनुताईंच्या संकल्पाने सातत्याने त्यांनी सांगितलेली मुद्रा करत मनातल्या मनात नामजप केला. त्यामुळे मन पुष्कळ शांत होऊन मी सभास्थळी पोचलो.

४. परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर आणि भगवंत यांनी अंतरातील त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे, त्या वेळी पुष्कळ हलके वाटून सहजतेने अन् शांत मनाने नामजप होणे

अधून-मधून ‘ॐ’कार म्हटल्यावर ‘तोंडात लाळ येत आहे’, असे जाणवायला लागले. त्यामुळे घशाचा कोरडेपणा न्यून झाला, तरीही थोडी मानसिक अस्वस्थता जाणवत होती. सभेची वेळ ५.३० वाजताची होती. सरावानंतर पुन्हा मी सद्गुरु अनुताईंनी दिलेला नामजप आणि मुद्रा करण्यास आरंभ केला. तेव्हा ‘जणू काही माझ्या शरिरातून असंख्य शक्ती बाहेर पडत आहे’, असे मला जाणवत होते. त्यानंतर मला संपूर्ण शरीर हलके वाटू लागले. ‘असंख्य शक्तींसह साक्षात् श्री गणेश माझ्या शरिरामधून बाहेर आला असून माझ्यासमोर उभा आहे’, असे मला जाणवले. माझ्या मनात कृतज्ञताभाव दाटून आला. पुन्हा ‘शरिरातून काहीतरी बाहेर पडत आहे’, असे जाणवले. तेव्हा साक्षात् भगवान श्रीविष्णु आणि श्रीकृष्ण माझ्याभोवती उभे राहिले. मी नतमस्तक झालो. माझे हात जोडले गेले. माझा नामजप अधिकच भावपूर्ण होऊ लागला. आता शरीर पुष्कळच हलके झाले होते. अकस्मात् ‘माझ्या शरिरातून पुष्कळ दिव्य चैतन्य निघत आहे आणि मी ते पहात आहे’, असे मला दिसले. ‘माझ्या संपूर्ण शरिराभोवती चैतन्य पसरले आहे’, असे मला जाणवले. ‘हे चैतन्य माझ्या ओळखीचे असून ते परब्रह्माचे आहे’, असेही मला जाणवले. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्गुण स्वरूपात ओळख दिली. तेव्हा माझा भाव जागृत झाला आणि प्रगाढ शांती अनुभवता आली. एकाच वेळेला साक्षात भगवंताचे दर्शन आणि परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व अनुभवता आले. माझा देह पुष्कळ हलका झाला होता. मी त्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केल्यावर मला ‘चैतन्यस्वरूपाने वेढले आहे’, असे जाणवले. तेव्हा माझा नामजप पुष्कळ शांतपणे चालू होता.

५. भाषणाला उभे राहिल्यावर पहिल्या वाक्यापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत कुठेही ताण न येणे आणि संपूर्ण भाषणात एकही घोट पाणी प्यावे न लागणे

सनातन संस्थेच्या वक्त्यांचे भाषण चालू होते. त्या वेळी मी सतत आनंदाची आणि प्रगाढ शांततेची अनुभूती घेत होतो. मनाला जराही ताण जाणवत नव्हता. समोर पाण्याचा ग्लास दिसत होता; परंतु ‘पाणी प्यावे’, असे वाटत नव्हते. उगीचच भाषणापूर्वी दोन घोट पाणी प्यालो.  भाषणाला उभे राहिल्यावर पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत मला कुठेही ताण आला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण भाषणात एकही घोट पाणी प्यालो नाही. उपाय म्हणून खडीसाखर जवळ ठेवली होती. केवळ तिचाच वापर केला. इतर सभांच्या भाषणांच्या वेळी खडीसाखर खाऊनही घसा सुकत असे.

६. कृतज्ञता

या प्रसंगातून देवाने मला पुष्कळ शिकवले. ‘मनानुसार साधना करण्याने उपाय आणि प्रगती होत नाही. संतांना शरण गेलो आणि प्रत्येक गोष्टीत भावपूर्ण आज्ञापालन केले, तर साक्षात् ईश्वराच्या चैतन्याची अनुभूती येते. केवळ तो आपल्यासमवेत असतो, असे नसून तोच आपल्या माध्यमातून कार्य करतो’, याची त्या क्षणांनी निश्चिती दिली. ही अनुभूती दिल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु अनुराधाताई यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’ – वैद्य उदय धुरी, सानपाडा केंद्र, नवी मुंबई. (१३.१.२०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक