सांगली, ६ मे – माझे श्री अमरनाथ १०८ शिवलिंग देवालय आश्रम (भाळवणी, ता. खानापूर) येथे शेतभूमी, आश्रम, पर्णकुटी, घर आहे. ही जागा माझी स्वत:ची असतांना संपत जाधव हा मला आणि माझा सख्खा भाऊ कृष्णदेव पाटोळे (गेली २० वर्षे मौनावस्था) यांना वरचेवर त्रास देत आहे. आम्हा दोघांच्या अंगावर येणे, धाक दाखवणे, जिवे मारण्याची धमकी देतो. तरी या घटनेची चौकशी करून मला पोलीस संरक्षण मिळावे आणि धमकी देणार्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन पू. ईश्वरबुवा रामदासी तथा ईश्वर महादेव पाटोळे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २७ आणि २८ एप्रिल या दिवशी संपत याने मला ‘इथून पुढे इथे राहिलात, इथे दिसलात, तर तुमच्यावर विनयभंग, बलात्कार प्रयत्नाचा खोटा गुन्हा नोंद करून तुम्हाला आयुष्यभरासाठी कारागृहात घालवीन’, अशी धमकी दिली. संपतने मला देवालयात जाणे, पूजा करणे, वैयक्तिक नामजप, तप करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आमचे जगणे कठीण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे षड्यंत्र असून मला तात्काळ न्याय मिळावा.’’