आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही, गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्‍या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहित आहे. ४ मे या दिवशी आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाची वैशिष्ट्ये पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

भाग ३

भाग २ पहाण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/473901.html


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वैयक्तिक गुण

पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी यांचे मार्गदर्शन लिहून घेतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

७. प्रेमभाव

७ अ. आपल्या छोट्या-छोट्या कृतींतूनही सर्वांना प्रेम देणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निवासस्थान असलेल्या मुंबई येथील सदनिकेत साधक त्यांना भेटायला येत. साधक परत निघाले की, प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना सोडायला उद्वाहनापर्यंत (लिफ्टपर्यंत) जात आणि उद्वाहन (लिफ्ट) दृष्टीआड होईपर्यंत ते हात हलवत तिथे थांबत. त्यांच्या प्रेमाच्या या अशा प्रकारच्या सहज, छोट्या कृतींमधून अनेक साधक आणि हितचिंतक संस्थेशी जोडले गेले.

७ आ. भेदभाव न करता सर्वांवर प्रीतीची उधळण करणे : श्रीकृष्णाच्या कृपेने वर्ष १९९३ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अगदी जवळून पहाण्याचे भाग्य मला लाभले. त्यांनी कधीही साधकांमध्ये गरीब-श्रीमंत, उच्चशिक्षित-अशिक्षित, स्त्री-पुरुष, साधक कार्यासाठी देत असलेला वेळ आणि घेत असलेले दायित्व, पातळी इत्यादी कोणत्याच निकषावर भेदभाव केलेला नाही. सर्व साधकांवर त्यांचे एकसारखेच आणि अगदी विपुल प्रेम आहे. हे प्रत्येक साधकाने सातत्याने अनुभवले आहे. कित्येक साधक केवळ त्यांच्यातील ‘प्रीती’ या गुणामुळेच साधनेत आले, अनेक अडथळ्यांतही टिकून राहिले आणि अनेक स्वभावदोष अन् अहं यांनी जर्जर असूनही उन्नती करू शकले. साधकच नव्हे, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या समाजातील अनेक जणांनी, अगदी त्यांच्या विरोधकांनीही हे अनुभवले आणि उघडपणे व्यक्त केले आहे.

७ इ. साधकांना सहजतेने वेळ देणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील ‘प्रीती’ या गुणाची लक्षात आलेली अजून एक अभिव्यक्ती, म्हणजे पूर्वी ते साधकांना वेळ देत असत. त्यांच्याशी बोलतांना सूक्ष्मातून ते चालवत असलेल्या ब्रह्मांडाच्या कारभाराचे सोडाच, स्थुलातूनही ते सांभाळत असलेल्या विविधांगी अती महत्त्वाच्या दायित्वांचा दबाव त्यांच्यावर कधीच जाणवत नाही. ते नेमकेपणाने; परंतु एवढ्या सहजतेने बोलतात की, त्यांचा व्याप ठाऊक नसलेल्या नवीन व्यक्तीला जणू ‘ते निवांतच आहेत’, असे वाटावे !

परात्पर गुरु डॉ. आठवले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना गुरुस्थानी मानून कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतांना

८. लीनता

८ अ. संतांशी लीनतेने वागणे आणि त्यांनी सांगितलेले उपाय करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात जाणवलेला एक मोठा गुण म्हणजे कमालीची लीनता ! ते नेहमी आश्रमात आलेल्या सर्व संतांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करतात. ते प्रत्येक जण जे सांगतात, ते पूर्ण जिज्ञासेने ऐकतात आणि महत्त्वाची सूत्रे लिहूनही घेतात, तसेच त्यांनी सांगितलेले उपाय इत्यादी लगेच करतात.

८ आ. सर्वाेच्च पातळीचे संत असूनही देहाची यथायोग्य काळजी घेण्याविषयी साधकांना स्वतःच्या उदाहरणातून आदर्श घालून देणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देहाची किंचितही आसक्ती नाही, तरीही ते योग्य आहार आणि दैनंदिन व्यायाम यांविषयी दक्ष असतात. त्यांची प्राणशक्ती अल्प असूनही ते भिंतीला धरून चालणे, जिना चढ-उतार करणे यांसारखे व्यायाम नित्य नेमाने करतात. त्यांना अनेक पथ्ये आहेत आणि ते ती सर्व पथ्ये अगदी कटाक्षाने पाळतात. त्यांना अधिक व्यायाम शक्य नसल्याने वजन अकारण वाढू नये, यासाठी ते अत्यल्प आहार घेतात. त्यांचा दिवसभराचा एकूण आहार छोट्या साडेतीन वाट्या एवढाच असतो, तरीही त्यांचे वजन वाढत चालले होते, त्या वेळी त्यांनी या आहारातही घट केली.

८ इ. सर्वाेच्च पातळीचे संत असूनही सर्वकाही महर्षि आणि संत यांना विचारून करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सर्व कार्य ईश्वरेच्छेनेच चाललेले आहे. असे असूनही ते प्रत्येक गोष्ट महर्षि आणि संत सांगतील तशी तंतोतंत करतात. ‘मला सर्व कळते’, ‘मला ठाऊक आहे’, असे त्यांच्या वागण्यात कधीही दिसून आलेले नाही. ‘विचारून करणे’, ‘सांगितलेले पूर्ण ऐकणे’, याचा ते सर्वाेच्च आदर्श आहेत.

९. जागेचा योग्य आणि कमाल वापर करणे

त्यांनी पहिल्यापासूनच उपलब्ध जागेचा अधिकाधिक वापर कसा करायचा, हे स्वतः कृती करून साधकांना शिकवले आहे. या दृष्टीने खोल्यांमध्ये पोटमाळे करणे, सामान ठेवण्यासाठी भिंतींना फळ्या लावणे, मांडण्या ठेवणे, अशी अनेक उदाहरणे देता येतील.

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

१०. सतत शिकत रहाणे

परात्पर गुरु डॉ. आठवले शिक्षणाने एक आधुनिक वैद्य (डॉक्टर) आहेत. ते वैद्यकशास्त्रासह, स्थापत्य, बांधकाम, शिल्पकला, संगीत, नृत्य, ग्रंथलेखन अशा असंख्य विद्या अन् कला यांविषयी त्या क्षेत्रातील पदवीधर आणि अनुभवी व्यक्तींनाही मार्गदर्शन करू शकतात. असे असूनही ते आजही सतत शिकत असतात. ‘मला सर्वकाही येते’, असे त्यांना कधीच वाटत नाही, याची प्रचीती त्यांच्या सहवासात सतत येते.

११. जे स्वतःला कळले, ते सर्वांपर्यंत पोचवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात १०० टक्के जिज्ञासा असल्याने प्रत्येक क्षणी ते जिज्ञासेच्या दृष्टीने सर्वत्र पहातात. त्यामुळे ज्या छोट्या-छोट्या गोष्टी सामान्य व्यक्तींच्या नजरेतून सुटतात अथवा त्या किरकोळ मोलाच्या समजल्या जातात, अशा गोष्टींकडेही ते अत्यंत अप्रूपतेने पहातात. या दृष्टीने त्यांना जे काही वैशिष्ट्यपूर्ण आढळेल, ते आश्रमातील सर्वांना पहायला मिळावे, यासाठी आश्रमातील भोजनकक्षात ठेवायला सांगतात. यात साधकांनी बनवलेल्या सुबक वस्तूंपासून अगदी छोट्या; परंतु वैशिष्ट्यपूर्ण किड्यापर्यंत अनेकविध गोष्टींचा समावेश असतो.

१२. लहानांसह लहान, मोठ्यांसह मोठे होऊन वागणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते लहानांसमवेत लहानांसारखे वागू शकतात. ते आजही बालकांच्या भावविश्वात सहज सामावून जातात. लहान मुलांप्रमाणेच त्यांना सर्व गोष्टींची अखंड जिज्ञासा असते. त्यांना कधीही ‘आता मला सर्वकाही किंवा निदान बर्‍यापैकी ठाऊक आहे’, या भूमिकेत पाहिलेले नाही. आजही त्यांची जिज्ञासा एखादा शिशूप्रमाणेच आहे. त्याच वेळी मोठ-मोठे संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख इत्यादींसह ते त्यांच्या स्तरावर संवाद साधतात.

सर्व काही ईश्वरेच्छेने करत असल्याने सर्व कृतींमध्ये सहजता असणे

‘अखिल भारतीय संत समिती’ चे अध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांच्याशी झालेली चर्चा

खोलीत भूमीवर (जमिनीवर) पडलेला एखादा कागदाचा छोटा तुकडा उचलणे असो, एखाद्या साधकाची सहज चौकशी करणे असो, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या एखाद्या नेत्याशी चर्चा करणे असो किंवा एखाद्या संतांशी बोलणे असो, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एखाद्या छोट्या बालकाप्रमाणे सहजता जाणवते. त्यांच्या कोणत्याही कृतीमध्ये जडत्व, घाई, दाब किंवा तणाव जाणवत नाही; कारण ते स्वेच्छेने काही करतच नाहीत. प्रत्येक गोष्ट ते ‘ईश्वरेच्छेने’च करत असल्याचे जाणवते.

(क्रमशः वाचा उद्याच्या अंकात)

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)

पुढील भाग पहाण्याठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/474399.html