सध्या सगळ्यांनाच कळून चुकले की, या ना त्या पद्धतीने संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे दिवस गेले. सध्या एकच तत्त्व सगळ्यांनी पाळले पाहिजे की, संसर्ग आपल्याला होऊ शकतो; पण आपले आरोग्य पूर्वस्थितीला येण्याची गती (रिकव्हरी रेट) उत्तम असली पाहिजे. संसर्ग कुठल्याही पद्धतीने फुफ्फुसांकडे जायला नको. कुठेही प्राणवायूची शोधाशोध करायला नको आणि या सर्व गोष्टींसाठी औषधांपेक्षाही एकच गोष्ट सर्वांत महत्त्वाची ठरणार आहे ती म्हणजे ‘चयापचय’ (मेटाबॉलिझम) ! तुमचे चयापचय जितके उत्तम तितकी तुमचे आरोग्य पूर्वस्थितीला येण्याची गती उत्तम.
१. चयापचय उत्तम कसे राखायचे ?
चयापचय उत्तम राखण्यासाठी काही महत्त्वाचे नियम देत आहे. –
अ. हलका आहार : भूक लागल्याखेरीज काहीही खाऊ नये. औषधे घेत असतांना बर्याचदा असे होते की, भूक नाही; पण औषध घ्यावे लागते म्हणून आधी खावे लागते. आयुर्वेदाच्या औषधांना असा काही नियम नसतो; पण जर तुम्ही इतर औषधे घेत असाल आणि भूक लागलेली नाही, अशा वेळी तांदुळाची पातळ पेज घ्यावी. ती पचायला हलकी असल्यामुळे भूक लागलेली नसतांना खाल्ली तरी फारसे बिघडत नाही.
आ. ऋतूनुसार आहार : आहार ऋतूनुसार असावा. सध्या ऋतूनुसार मिळणार्या गोष्टींचे ज्ञान अभावानेच बघायला मिळते. एक सोपे उदाहरण बघायचे झाल्यास द्राक्ष, कलिंगड ही फळे वेळेच्या आधीच बाजारात उपलब्ध होतात. निसर्गाची रचना अतिशय समर्पक असते. मागणी येईल (म्हणजे आवश्यकता असेल), तेव्हाच तो पुरवठा करतो. ग्रीष्मऋतू जसा जवळ येत जातो आणि पाण्याने तहान भागत नाही, तेव्हा शरिरातील पाण्याची उणीव भरून काढण्यासाठी या रसाळ फळांचा ऋतू येतो; पण हे साधे तत्त्व न वापरता वसंतऋतूतच म्हणजे जेव्हा कफ निसर्गत:च वाढलेला असतो अन् शरिराला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता नसते, तेव्हाच ही फळे बाजारात येतात आणि खाल्ली जातात. मागणीखेरीज पुरवठा झालेले हे अतिरिक्त जल कफात रुपांतरित होत जाते आणि अशा रितीने फुफ्फुसांवरचा कफाचा लोड वाढवण्याचा पाया रचला जातो.
इ. दही, अंडी आणि प्रथिने (प्रोटीन) संकल्पना : तुम्ही बाधित झाला आणि घरी वा रुग्णालयात असाल, तर लगेचच प्रथिनांचा (‘प्रोटीन’चा) आहार सुचवून दिला जातो. (अर्थात् रुग्णाला भूक आहे कि नाही, याचा काहीही विचार न करता.) याविषयी बघायचे झाल्यास दह्यात भरपूर प्रथिने असतात, ही एक बाजू झाली; पण त्याची दुसरी बाजू बघितल्यास ते उष्ण आहे (दह्याचा स्पर्श थंड; पण पचन झाल्यावर उष्णता निर्माण करते), पचायला जड आहे, शरिरात कफ वाढवण्याचे काम उत्तमरित्या करते. ही दुसरी बाजू लक्षात घेतल्यास तापाच्या आणि न्यूमोनियाच्या प्रकारात केवळ प्रथिनांसाठी दह्याचा विचार करणे परिस्थिती अधिकच बिघडवते. ज्यांना आपले आरोग्य टिकवायचे आहे, त्यांनीही या ऋतूत दही वर्ज्य करावे.
घरी असलेल्याला व्यक्तीसह अतीदक्षता विभागात असलेल्या रुग्णालाही अंडी दिली जातात. अंडी प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे; पण प्रथिनांचे पचन आणि शोषण यांविषयी आपण सोयीनुसार विसरतो का ? मुळात आजारपणात भूक मंदावलेली असते आणि काहीही खावेसे वाटत नाही. त्यात अंडी पचायला जड असल्याने कधी पचतील ? आणि पचली नाहीत, तर त्याचे शरिरात शोषण तरी कसे होईल ? पण हा काहीही विचार न करता प्रथिने म्हणून अंडी खात रहायची आणि मग त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो अन् परिस्थिती अधिकच खालावते.
ई. फळे, फळांचा रस आणि शहाळे : आजारपणात जेव्हा भूक फारशी लागत नाही, काही खावेसे वाटत नाही, त्या वेळी शक्ती टिकून रहाण्यासाठी फळांचे रस अथवा शहाळे देण्याची पद्धत आहे. या प्रकारच्या तापात तर खूपच अशक्तपणा येतो. अशा वेळी रुग्णालयात असणार्या किंवा घरी राहून चिकित्सा घेणार्या रुग्णाला फळांचा रस आवर्जून दिला जातो. येथे एक महत्त्वाचे सूत्र लक्षात घेण्यासारखे आहे की, कुठलेही फळ मग ते चावून खा अथवा रस काढून घ्या, त्यामुळे कफ पातळ होतो, वाढतो आणि पर्यायाने फुफ्फुसांना धोका वाढू शकतो. (जे आजारी नसतील, त्यांनी ऋतूनुसार फळे चावून खायला हरकत नाही.) शहाळ्याविषयीही हेच सूत्र आहे.
उ. कडधान्ये : कडधान्ये पचायला जड असतात. दिवसभर अंग मेहनतीचे काम करणार्या लोकांना किंवा इतरांना हिवाळा या ऋतूत ते पचू शकते. आजारपणात कडधान्ये नकोच. तसेच ज्यांना ‘स्वस्थ’ रहायचे असेल, त्यांनीही या ऋतूत कडधान्ये टाळावीतच.
ऊ. ड्रायफ्रूटस (सुकामेवा) : सुकामेवा खाण्याचा योग्य ऋतू तसा हिवाळा असतो; पण नियमित मेहनत किंवा व्यायाम करणारे सुकामेवा कुठल्याही ऋतूत पचवू शकतात. आजारपणात भूक मंदावलेली असतांना पचायला जड असा सुकामेवा (अपवाद – काळ्या मनुका) आजारपण वाढवण्याच्या भूमिकेत जाऊ शकतो.
थोडक्यात सांगायचे झाल्यास तुम्हाला स्वस्थ रहायचे असेल वा तुम्हाला पूर्वस्थिती लवकर प्राप्त करायची असेल, तर मासांहार (अंडी वगैरे), फळे आणि फळांचा रस, शहाळे, कडधान्ये, दही आणि आंबवलेले पदार्थ आदी खाणे टाळावे.
२. रुग्णाने काय खावे ?
अ. तांदुळाची पेज : लहानपणी अन्नप्राशनापासून तांदुळाचे चालू झालेले पोषण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मोलाची साथ देत असते. ‘भात चिकट आणि थंड म्हणून तो कफ वाढवतो’, या समजामुळे ‘आजारपणात भात बंद करा’, असे सल्ले दिले जातात. तांदुळाचे अगणित प्रकार आणि त्या प्रकारानुसार त्यांचे गुणधर्म आहेत, तसेच तो नवा किंवा जुना यानुसारही त्याचे गुणधर्म पालटतात. जुन्या तांदुळाच्या कण्या थोड्याशा तुपावर परतून त्यात भरपूर पाणी टाकून पातेल्यात उकळत ठेवले की, छान पेज सिद्ध होते. चवीनुसार मीठ, जिरे पूड, किंचित सुंठ आणि गुळ घालून गरम गरम वाढावी. पचायला हलकी असल्यामुळे रुग्णाच्या पचनशक्तीवर ताण येत नाही आणि आवश्यक ते पोषणही होते.
आ. मूगाच्या तांदुळाची पातळ खिचडी : ही पोषणासाठी अत्यंत उत्तम, पचायला हलकी आणि बळ देणारी आहे.
इ. साळीच्या लाह्या : चुरमुरे आणि साळीच्या लाह्या यात खूप तफावत आहे. चुरमुरे पचायला जड – वातूळ, तर साळीच्या लाह्या पचायला हलक्या आणि शक्ती देणार्या असतात. थोड्याशा तुपावर जिरे, हिंग, हळद, आवश्यकतेनुसार लाल तिखट-मीठ टाकून चांगल्या खरपूस भाजल्या की, अतिशय चांगला आणि पौष्टिक चिवडा सिद्ध होतो. रुग्णाच्या चवीतही पालट होतो.
ई. लाजा मंड : २ ग्लास पाण्यात २ मूठ साळीच्या लाह्या टाकून ५ मिनिटे उकळत ठेवायचे. यात चवीनुसार मीठ जिरेपूड टाकून गाळून घ्यायचे. हे सिद्ध झालेले मंड दिवसभर थोडे थोडे घ्यायचे. यामुळे लवकरात लवकर शक्ती भरून येते.
उ. काळ्या मनुका : आरोग्याची पूर्वस्थिती लवकर प्राप्त व्हावी, यासाठी जसे अग्नीला म्हणजे चयापचयाला महत्त्व आहे, तसेच ‘अनुलोमानला’ही महत्त्व आहे. शरिरातील मल वेळच्या वेळी शरिराने स्वत:हून बाहेर ढकलला पाहिजे. मल शुद्धी जितकी अधिक तितकी पूर्वस्थिती लवकर होते. यासाठी सौम्यपणे काम करणारी द्रव्ये लागतात. मनुका हे त्यापैकीच एक. भिजवलेल्या काळ्या मनुका दिवसभरात थोड्या थोड्या करून खाव्यात किंवा त्यांचा काढा करून घ्यावा. मल शुद्धी होण्यासह शक्तीही येते.
ऊ. राजगिरा : पौष्टिक आणि पचायला हलका असा राजगिर्याचा लाडू किंवा त्याच्या लाह्या दोन्ही खाण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
आपल्याला लक्षणे जाणवू लागली आणि तुम्ही कुठल्याही वैद्यकीय शाखेची चिकित्सा घेत असाल अन् खाण्यासंबंधीचे हे नियम तुम्ही पाळले, तर तुमच्या आरोग्याची स्थिती लवकर पूर्वपदावर येते.
– वैद्य ज्योत्स्ना पेठकर