आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

आध्यात्मिक क्षेत्रातील एखाद्या अधिकारी व्यक्तीची वैशिष्ट्ये समजता येण्यासाठी त्यांच्या पातळीच्या किमान २० टक्के जवळ असणे आवश्यक असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात माझी तशी अवस्था नसल्यामुळे त्यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही, गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्‍या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. त्यांचे अलौकिक कार्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यापेक्षाही या प्रदीर्घ कालावधीत त्यांच्या विलक्षण आणि अद्वितीय कार्यपद्धतीविषयी माझ्या लक्षात आलेली काही गुणवैशिष्ट्ये मी येथे कृतज्ञतापूर्वक मांडत आहे. जे लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेनेे लिहित आहे. हे लिखाण म्हणजे प्रत्यक्ष जे आहे, त्याचे केवळ हिमनगाचे टोक आहे. ३ मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रथम भेट आणि नामजप साधना’ याविषयी माहिती घेतली. आज त्यापुढील भाग पाहूया.

३ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखातील सूत्रे वाचण्यासाठी या लिंक वर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/473656.html


२. व्यापक प्रसाराला गती देऊन आध्यात्मिक स्तरावरच्या कार्यास आरंभ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मप्रसाराच्या सार्वजनिक सभांना श्रोत्यांची लाभलेली उदंड उपस्थिती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कार्याची सूत्रे स्वतःकडे केंद्रित न ठेवता अनेक साधकांच्या हाती सोपवून व्यापक प्रसाराला गती दिली आणि या योगे त्यांनी अनेक प्रचारक घडवून ते अल्प कालावधीत स्थूल कार्यातून मुक्त झाले आणि आध्यात्मिक स्तरावरचे कार्य करायला स्वतः मोकळे झाले. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

२ अ. प्रसारकार्यात वाढ आणि अननुभवी साधकांवर दायित्व सोपवणे

२ अ १. केवळ ४ पूर्ण दिवसीय अभ्यासवर्गांनंतर ‘त्या अभ्यासवर्गाचे दायित्व स्थानिक साधकांनी घ्यायला हवे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगली येथे ७.११.१९९३ या दिवशी ‘अध्यात्मशास्त्र’ या विषयावरील पहिला पूर्ण दिवसीय अभ्यासवर्ग घेतला. या अभ्यासवर्गाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ५ अशी होती. त्यानंतर त्यांनी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या मासांत प्रत्येकी एक, असे एकूण ३ अभ्यासवर्ग घेतले. फेब्रुवारी मासातील अभ्यासवर्गाच्या शेवटी काहीही पूर्वकल्पना नसतांना त्यांनी अभ्यासवर्गात घोषित केले, ‘‘पुढील मासापासून ते पुणे येथे प्रसारकार्य आरंभ करणार असल्याने सांगलीतील पूर्ण दिवसीय अभ्यासवर्गांचे दायित्व सांगलीतील अभ्यासवर्गातील कुणीतरी घ्यायला हवे.’’

२ अ २. पूर्ण दिवसीय अभ्यासवर्गाचे दायित्व घेण्यास कुणीही सिद्ध नसल्याने वयाने लहान असलेल्या आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या साधिकेवर हे दायित्व सोपवून तिला अन्य ठिकाणीही प्रसारकार्य नव्याने चालू करण्यास सांगणे : अभ्यासवर्गांचे दायित्व घ्यायला अन्य कुणी सिद्ध न झाल्याने त्यांनी हे दायित्व माझ्यावर सोपवले. इतरांच्या तुलनेत मी वयाने लहान (वय २८ वर्षे) होते आणि सांगलीसारख्या पुष्कळ आध्यात्मिक परंपरा असलेल्या ठिकाणी पूर्ण दिवसीय अभ्यासवर्ग घेणे सोपे नव्हते. त्यात माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले असल्याने सर्व वाचन पाश्‍चात्त्य विचारसरणीचे आणि इंग्रजी भाषेतील होते. माझे काहीही आध्यात्मिक वाचन झाले नव्हते. त्या वेळी सनातनचे ग्रंथही अस्तित्वात नव्हते. होता तो केवळ चक्रमुद्रांकित (सायक्लोस्टाईल) केलेला एक मूळ संक्षिप्त ग्रंथ ! अशा परिस्थितीत ‘केवळ ४ अभ्यासवर्गांनंतर आणि एका संक्षिप्त ग्रंथाच्या आधारे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती असलेला ७ घंट्यांचा अभ्यासवर्ग सतत घेत रहाणे’, हे माझ्यासाठी आव्हानच होते. हे सर्व ठाऊक असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हे दायित्व माझ्यावर सोपवले. त्याच वेळी त्यांनी मला सांगलीसह कोल्हापूर, कराड आणि सातारा येथेही नव्याने प्रसारकार्य चालू करायला सांगितले. या प्रातिनिधिक उदाहरणावरून परात्पर गुरु डॉ. आठवले ‘मी नाही, देवच कर्ता आहे’, हे प्रत्यक्ष जगत असल्याचे लक्षात येते.

२ आ. अन्य उपक्रमांस आरंभ आणि ‘देव कर्ता आहे’, हा भाव ठेवणे

२ आ १. सनातनच्या अन्य उपक्रमांच्या संदर्भातही परात्पर गुरु आठवले यांनी अननुभवी साधकांवर दायित्व सोपवलेले असणे आणि यातून त्यांच्यातील ‘देव कर्ता आहे’ हा भाव लक्षात येणे : सनातनच्या अन्य उपक्रमांच्या विषयीही त्यांनी असेच केले आहे, उदा. ४.४.१९९९ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा शुभारंभ झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘साप्ताहिक आणि दैनिक सनातन प्रभातचे समूह संपादक’ होते; परंतु प.पू. बेजन देसाई यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी ते ७.४.१९९९ या दिवशी नाशिकला जाऊ शकले. नाशिकहून ते एक सप्ताहाने परतले. दैनिकासारखा उपक्रम प्रथमच आणि त्या क्षेत्रातील काहीही अनुभव नसलेल्या साधकांना घेऊन करत असतांना ते असे करू शकले आहेत. यात त्यांच्यातील ‘देव कर्ता आहे’, या भावासह दैनिक त्यांच्या नावाने प्रसिद्ध होत असतांना अननुभवी आणि नवशिक्या साधकांच्या हाती ते पूर्णपणे सोपवतांना ‘काही कमी-अधिक झाले, तर माझे नाव खराब होईल’, असा अहंप्रेरित विचार त्यांच्या मनाला शिवला नाही, हे लक्षात येते !

२ आ २. देश-विदेशातील अनेक ठिकाणी नव्याने प्रसारकार्य आरंभ होऊनही परात्पर गुरु डॉ. आठवले अद्याप एकदाही अनेक ठिकाणी गेलेले नसणे : ‘अध्यात्मशास्त्राचा काही अभ्यास नसलेल्या नवीन साधकाकडे नवीन ठिकाणच्या प्रसारकार्याचे दायित्व देणे’, हे असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केवळ माझ्या बाबतीत केले, असे नसून भारतभर सर्वच ठिकाणी प्रसारकार्यात त्यांनी हेच तत्त्व अवलंबले. विदेशातीलच नाही, तर भारतातीलही अनेक ठिकाणच्या प्रसारकार्याचा आरंभ अन्य साधकांनी केला आहे आणि त्यांपैकी अनेक ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले अद्याप एकदाही गेलेले नाहीत.

२ आ ३. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अन्य आवृत्त्यांचे शुभारंभ अथवा वर्धापनदिन कार्यक्रम यांसाठी स्वतः न जाणे : दैनिक ‘सनातन प्रभात’ची पहिली आवृत्ती चालू केल्यानंतर पुढील वर्षभरातच गोवा आणि रत्नागिरी वगळता ‘सांगली-कोल्हापूर, तसेच मुंबई-ठाणे-रायगड या आवृत्त्याही चालू झाल्या. पुढे पुणे, जळगाव यांसाठीही आवृत्ती चालू झाली; परंतु यांपैकी एकाही आवृत्तीच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला किंवा वर्धापनदिन सोहळ्याला ते स्वतः गेले नाहीत. असे त्यांनी सनातनच्या सर्व महत्त्वाच्या उपक्रमांच्या संदर्भात सातत्याने केले आहे.

वाफेवर अन्न शिजवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणे सोयीचे आहे ना, हे पहातांना परात्पर गुरु डॉ. आठवले

३. आध्यात्मिक मार्गदर्शनाचे वैशिष्ट्य

३ अ. आध्यात्मिक पातळी जाणणे, ती आधुनिक शास्त्रीय परिभाषेत नेमकेपणाने सांगू शकणे आणि अशी क्षमता साधकांमध्ये निर्माण करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘प्राणी आणि व्यक्ती यांची आध्यात्मिक पातळी जाणू शकणे आणि ती आधुनिक शास्त्रीय परिभाषेत नेमकेपणाने सांगू शकणे.’ साधनामार्गात असणार्‍या साधकांना फारतर त्यांची उन्नती होत आहे किंवा नाही आणि ती मंद, मध्यम कि द्रुतगतीने होत आहे, एवढेच मार्गदर्शन मिळते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मात्र आध्यात्मिक उन्नतीचे ० ते १०० टक्के (१०० टक्के म्हणजे मोक्ष) हे परिमाण ठरवून त्यात साधकांची नेमकी आध्यात्मिक पातळी किती आहे, प्रत्येक वर्षी त्यांनी किती टक्के उन्नती केली, हे सूक्ष्मातून जाणण्याचे शास्त्र सिद्ध केले. यात ६० टक्के अध्यात्मिक पातळी म्हणजे जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होणे, ७० टक्के पातळी म्हणजे संतपद, ८० टक्क्यांच्या पुढे सद्गुरुपद आणि ९० टक्क्यांच्या पुढे परात्पर गुरुपद, हे स्पष्ट केले. पुढे त्यांनी आध्यात्मिक पातळी जाणण्याची ही क्षमता अनेक साधकांमध्येही निर्माण केली.

३ आ. अध्यात्मातील संज्ञांची व्याख्या करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अध्यात्मातील सर्व संज्ञांची आवर्जून व्याख्या करणे, उदा. ‘सुख’ आणि ‘आनंद’ हे शब्द बर्‍याचदा समान अर्थाने वापरले जातात; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या दोन्ही शब्दांची व्याख्या केली आणि त्यांतील भेद उलगडून दाखवला. या व्याख्येनुसारच त्यांनी या शब्दांचा प्रत्येक ठिकाणी वापर केला, तसेच ‘आध्यात्मिक पातळी म्हणजे नेमके काय ? आध्यात्मिक उन्नतीचे महत्त्वाचे टप्पे कोणते ? संतपद म्हणजे काय ? जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होणे म्हणजे काय ? मोक्ष म्हणजे काय ?’, या आणि अशा संज्ञांची व्याख्या करून त्यांचा अर्थ स्पष्ट केला.

४. ‘समाजाला आवडते’ ते न देता ‘समाजाला आध्यात्मिक स्तरावर काय आवश्यक आहे ?’, हे जाणून तेच देणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रयत्न प्रत्येकाला साधनेला लावणे, हाच आहे. त्यामुळे प्रत्येक कृतीतून ‘समाजाला काय हवे किंवा काय आवडते ?’, ते न देता ‘समाजाला आवश्यक काय आहे ?’, हे जाणून ते देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याची काही उदाहरणे येथे देत आहे.

४ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून विविध संत आणि राष्ट्रपुरुष यांच्या विषयीची माहिती प्रसिद्ध करणे : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधून वाचकांना काय आवडेल, यापेक्षा त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या काय आवश्यक आहे, या अनुषंगानेच अगदी आरंभापासून आतापर्यंतचे लिखाण (मजकूर) असते, उदा. दैनिकात विविध खेळ, नाट्य-चित्रपट सृष्टीशी संबंधित वार्ता इत्यादी नसतात. त्याऐवजी विविध संत आणि राष्ट्रपुरुष यांचे कार्य, त्यांच्याशी संबंधित पवित्र स्थाने, तीर्थक्षेत्रे इत्यादींच्या विषयीच्या वार्ता आणि लेख प्रसिद्ध केले जातात.

४ आ. नियतकालिकांमध्ये दारु, गुटखा आणि समाजाला हानीकारक अशी तत्सम कोणत्याही गोष्टींची विज्ञापने (जाहिराती) घेतली जात नाहीत.

४ इ. समाजातील जिज्ञासूंसाठी केलेली सार्वजनिक प्रवचनेही आध्यात्मिक स्तरावर करणे : वर्ष १९९६-९७ या कालखंडात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधना’ या विषयावर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक इत्यादी राज्यांत अनेक जाहीर प्रवचने केली. ही सर्व प्रवचने समाजातील जिज्ञासूंसाठी होती. असे असूनही ते प्रत्येक प्रवचनात शांतपणे आणि एका लयीत बोलायचे. ‘समाजातील लोकांसाठी प्रवचने असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ती भावनिक स्तरावर न करता आध्यात्मिक स्तरावरच केली’, असे जाणवले.  वर्ष १९९६-९७ या कालखंडात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधना’ या विषयावर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक इत्यादी राज्यांत अनेक सार्वजनिक प्रवचने केली.

५. पुढील पिढ्यांसाठी सर्व नोंदी आणि वस्तू जतन करून ठेवणे

काचेच्या बरणीतील कांस्यवाटीत आपोआप बनलेल्या अत्तराचे संशोधन करण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन घेतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ (१.१.२०१०)

सनातन संस्थेच्या संदर्भात जे काही घडत आहे, ते एक प्रकारे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेचा इतिहासच आहे आणि पुढील पिढ्यांसाठी अध्यात्मशास्त्राचा जिवंत, प्रत्यक्ष अभ्यासच आहे. या दूरदृष्टीने त्यांनी अगदी आरंभापासून प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीची नोंद आणि वस्तू जतन करून ठेवल्या आहेत.

वर्ष २००९ पर्यंत वापरलेले अन् नंतर जतन केलेल्या बंद डब्यात वर्ष २०१३ मध्ये   रव्यासारखा पदार्थ निर्माण झाला

६. ‘साधक’ हाच प्रत्येक उपक्रमामागचा हेतू असणे

प्रत्येक गोष्ट करतांना तिचा ‘साधकाला कसा लाभ होईल ?’, या दृष्टीनेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विचार असतो, उदा. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघराचे नूतनीकरण करतांना ‘स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या साधकांना सुविधा व्हावी, त्यांना अल्पतम कष्टांमध्ये परिपूर्ण सेवा करता यावी, त्यांचा वेळ आणि त्यांचे श्रम वाचावेत’, हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विचार होता.

(क्रमश: वाचा उद्याच्या अंकात)

भाग ३ पहाण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/474150.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक