१. संगणकावर लिखाणाच्या संकलनाची बौद्धिक सेवा करतांना मन एकाग्र होऊन ध्यान लागणे
‘मी ‘साधकांना साधनेत येणार्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, साधक आणि संत यांचे साधनाप्रवास’ इत्यादी विषयांवरील लेखांचे संकलन करण्याची सेवा करते. गेल्या काही मासांपासून संगणकावर ही सेवा करत असतांना माझे ध्यान लागते. त्या वेळी माझे मन त्या सेवेशी पूर्णपणे एकरूप झालेले असते. ‘एखाद्या धारिकेच्या संकलनाची सेवा कधी संपली ?’, हेही माझ्या लक्षात येत नाही. ‘बौद्धिक सेवा करतांना ध्यान लागणे’, अशा प्रकारची अनुभूती केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मी घेऊ शकत आहे.
२. शारीरिक सेवा करतांनाही ध्यान लागणे
नंतर माझ्या लक्षात आले की, स्वच्छता, अल्पाहार बनवणे इत्यादी सेवा करतांनाही माझे ध्यान लागते. तेव्हाही माझे मन पुष्कळ एकाग्र झालेले असते. त्या वेळी मला आतून पुष्कळ शांत आणि स्थिर वाटत असते.
३. लिखाणाच्या संकलनाची सेवा करत असतांना सहस्रारातून चैतन्याचा प्रवाह आत जाऊन सेवा आपोआप होत असल्याचे जाणवणे
संगणकावर लिखाणाच्या संकलनाची सेवा करत असतांना मला जाणवते, ‘माझ्या सहस्राराकडे वरच्या दिशेने एक प्रवाह येतो. तो सहस्रारातून आत जाऊन आज्ञाचक्रापर्यंत येतो आणि त्यानंतर तो माझ्या हातांच्या बोटांत येऊन माझ्याकडून लिखाणाचे टंकलेखन केले जाते.’ ‘तो चैतन्याचा प्रवाह आहे’, असे मला वाटते. त्या वेळी ‘मी केवळ बसले आहे आणि संगणकाच्या कळफलकावरून (किबोर्डवरून) माझी बोटे आपोआप फिरत आहेत’, असे मला जाणवते.
४. मराठी अक्षरांविषयी प्रेम वाटून देवाने निर्माण केलेल्या अक्षरब्रह्माची सेवा मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होणे आणि सेवेतून मिळणार्या आनंदात वाढ होणे
माझे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. मला मराठी भाषा प्रथमपासूनच आवडते; पण अलीकडे मला मराठी भाषेतील अक्षरांविषयी पुष्कळ प्रेम वाटू लागले आहे. मी संगणकावर एकेक अक्षर मोठे करून त्यातील वळणे, गोल आकार, रेषा इत्यादी एकाग्रतेने पहात असते. त्या वेळी ‘देवाने किती सुंदर अक्षरे निर्माण केली आहेत आणि आपल्याला अक्षरब्रह्माची सेवा दिली आहे’, असे वाटून माझा कृतज्ञताभाव जागृत होतो. त्यामुळे संकलनाची सेवा करतांना मिळणार्या आनंदात वाढ झाली आहे.
‘परम पूज्य, वरील अनुभूती येण्यासाठी माझी तेवढी पात्रता नाही आणि साधनाही नाही. केवळ तुमच्या कृपेने माझ्यासारख्या सामान्य साधिकेला वरील उच्च स्तराच्या अनुभूती येत आहेत. ‘त्या माध्यमातून तुम्ही मला सेवेशी, म्हणजे तुमच्या निर्गुण रूपाशी एकरूप करून घेत आहात आणि साधनेतील आनंदही देत आहात’, याबद्दल तुमच्या चरणी कृतज्ञता !
‘वरील अनुभूतींच्या माध्यमातून माझी तुमच्यावरील श्रद्धा वृद्धींगत होऊन माझ्याकडून परिपूर्ण सेवा आणि साधना करून घ्या’, अशी तुमच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |