आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

वर्ष १९८७ मध्ये म्हापसा, गोवा येथे ‘संमोहनशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र’ या विषयावर व्याख्यान देतांना डॉ. जयंत आठवले (वय ४५ वर्षे)

आध्यात्मिक क्षेत्रातील एखाद्या अधिकारी व्यक्तीची वैशिष्ट्ये समजता येण्यासाठी त्यांच्या पातळीच्या किमान २० टक्के जवळ असणे आवश्यक असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात माझी तशी अवस्था नसल्यामुळे त्यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही, गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्‍या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. त्यांचे अलौकिक कार्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यापेक्षाही या प्रदीर्घ कालावधीत त्यांच्या विलक्षण आणि अद्वितीय कार्यपद्धतीविषयी माझ्या लक्षात आलेली काही गुणवैशिष्ट्ये मी येथे कृतज्ञतापूर्वक मांडत आहे. जे लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहित आहे. हे लिखाण म्हणजे प्रत्यक्ष जे आहे, त्याचे केवळ हिमनगाचे टोक आहे.

व्याख्यानाला उपस्थित जिज्ञासू, डॉक्टर्स आणि मानसोपचारतज्ञ

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम संपर्क आणि नामजपास आरंभ

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पशक्तीने नामजप आपोआप चालू होऊन त्यानंतर ४ वर्षे त्यांची भेट किंवा पाठपुरावा नसतांनाही तो चालू रहाणे

१ अ १. साधिका संमोहन कार्यशाळेत सहभागी होणे, कार्यशाळेच्या शेवटी डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्राचे आणि कुलदेवतेचा नामजप करण्याचे महत्त्व सांगणे अन् तेव्हापासून साधिकेचा कुलदेवतेचा नामजप आपोआप चालू होणे : ‘मी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एम्.बी.बी.एस्.) पूर्ण केल्यानंतर लगेच वर्ष १९८९ मध्ये गोव्यात एका संमोहन कार्यशाळेत सहभागी झाले होते. तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आणि माझी प्रथम भेट झाली. त्या वेळी त्यांची आध्यात्मिक पार्श्वभूमी किंवा त्या क्षेत्रातील अधिकार यांविषयी मला काहीही ठाऊक नव्हते. कार्यशाळेच्या शेवटी त्यांनी सांगितले, ‘‘संमोहन शास्त्रापेक्षाही एक पुष्कळ मोठे शास्त्र आहे, जे आपल्या सर्व समस्यांवर उत्तरे देते. ते म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र’ होय. या शास्त्राचा लाभ घेण्याच्या दृष्टीने पहिली पायरी, म्हणजे आपल्या कुलदेवतेच्या नावाचा जप करणे.’’ असे सांगून त्यांनी ‘कुलदेवतेचा नामजप कसा करायचा ?’, हे विविध देवतांच्या नामजपांच्या उदाहरणांतून समजावले. त्या वेळी माझ्यावर या सूत्राचा बुद्धीच्या स्तरावर परिणाम झाल्याचे मला जाणवले नाही, तरीही माझा कुलदेवतेच्या नावाचा जप मात्र चालू झाला. त्यानंतर त्यात खंड न पडता तो होत राहिला. ‘मी हे जे करत आहे, ते म्हणजे साधना आहे’, हे मला तेव्हा ज्ञात नव्हते.

अभ्यासवर्गांतून प.पू. डॉक्टरांनी अध्यात्मप्रसार करू शकणारे साधक सिद्ध केले. सांगली येथील अध्यात्मवर्ग घेणारे साधक डावीकडून आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत आणि श्री. अशोक लिमकर

१ अ २. विवाहानंतर सासरच्या कुलदेवतेचा नामजप करण्यास डॉ. आठवले यांनी पत्राद्वारे सांगणे आणि पतीच्या गळ्यात वरमाला घालताच सासरच्या कुलदेवतेचा नामजप आपोआप चालू होऊन तो होत रहाणे : गोव्यातील कार्यशाळेनंतर काही मासांतच माझा विवाह ठरला. मी परात्पर गुरु डॉक्टरांना माझ्या विवाहाची निमंत्रण पत्रिका पाठवली. त्याला उत्तर म्हणून त्यांनी मला अभिनंदनपर पत्र पाठवले. त्यात ‘लग्नानंतर सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा’, असे त्यांनी मला सांगितले. १३.५.१९९० या दिवशी माझा विवाह झाला. विवाहाच्या वेळी मी पतीच्या गळ्यात वरमाला घालताच मला कोणतीही जाणीव नसतांना किंवा माझ्याकडून जाणीवपूर्वक कोणताच प्रयत्न न होता माझा आतून आपोआपच सासरच्या कुलदेवतेच्या नामजप चालू झाला आणि पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होईपर्यंत तो अखंड चालू राहिला.

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

१ अ ३. चार वर्षांच्या कालावधीत जीवनातील विविध स्थित्यंतरे होऊनही कोणत्याही आध्यात्मिक पोषणाविना नामजप अखंड होत रहाणे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पशक्तीनेच शक्य असणे : माझ्या विवाहानंतर परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांची आणि माझी भेट ७ .११.१९९३ या दिवशी झाली आणि तेव्हा ‘ते आध्यात्मिक क्षेत्रातील एक अधिकारी व्यक्ती आहेत’, हे मला समजले. या मधल्या कालखंडात माझा विवाह झाल्यानंतर मी गोव्यातून सांगलीला स्थलांतरित झाले. त्यानंतर सोलापूरला माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आणि सांगलीत स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायही चालू झाला. १९८९ ते १९९३ या प्रदीर्घ कालावधीत आणि जीवनातील महत्त्वाच्या एवढ्या स्थित्यंतरांतही एका तरुण व्यक्तीचा नामजप काहीही सत्संग किंवा अन्य आध्यात्मिक पोषण नसतांना चालू रहाणे, हे सहजासहजी शक्य आहे का ? केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्प शक्तीनेच हे शक्य झाले !

१ आ. पहिल्या अभ्यासवर्गाला उपस्थित रहाणे : वर्ष १९९३ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘अध्यात्मशास्त्र’ या विषयावरील पहिला पूर्ण दिवसाचा अभ्यासवर्ग घेतला. या अभ्यासवर्गाला मी उपस्थित राहिले. त्या वेळी ‘मी करत असलेला नामजप हा आध्यात्मिक साधनेचा एक भाग आहे’, हे मला प्रथमच समजले. त्यानंतर देवाच्या कृपेने मी सनातनच्या कार्यात उत्तरोत्तर सहभागी होत गेले.

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कार्याच्या संदर्भात केलेल्या पत्रांना तत्परतेने उत्तर देणे आणि यातून त्यांची अध्यात्मप्रसाराची तळमळ दिसून येणे : त्या काळी सर्वांकडे दूरभाष नव्हते. त्यामुळे पत्रव्यवहार हेच संवादाचे साधन असायचे. त्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी कार्याच्या संदर्भात माझा पुष्कळ पत्रव्यवहार व्हायचा. प्रत्येक वेळी पत्र पाठवले की, त्यांचे उलट टपाली उत्तर यायचे. असे एकदा-दोनदा नाही, तर अगदी प्रत्येक वेळी हाच अनुभव माझ्याप्रमाणेच प्रत्येक साधकाने घेतला आहे. साधकांना त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेत सहकार्य करण्यातील त्यांच्या या तत्परतेतून त्यांच्या अध्यात्मप्रसाराच्या तळमळीची जाणीव झाली.

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)

(क्रमश ः वाचा उद्याच्या अंकात)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक